लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (४ जून) जाहीर होत आहे. सत्ताधारी एनडीए आघाडीला इंडिया आघाडीने दिलेले आव्हान भाजपाची सत्ता डळमळीत करताना दिसत आहे. कारण, सुरुवातीच्या कलांनुसार, सध्या एनडीए आघाडीला २९६ तर इंडिया आघाडीला २२९ जागा मिळताना दिसत आहेत. अर्थात, हे अंतिम निकाल नसले तरीही साधारण विजयाचे चित्र यातून स्पष्ट होत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे वाढते वर्चस्व रोखण्यात तृणमूल काँग्रेसला यश मिळताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : इंदिरा गांधींच्या मारेकर्‍याचा मुलगा आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल आघाडीवर; कारणं काय?

भाजपाच्या विजयी अश्वमेधाला लगाम

निवडणूक आयोगाने दिलेल्या सध्याच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २९ जागांवर तर भाजपा १२ जागांवर आघाडीवर आहे. तर डाव्यांबरोबर निवडणूक लढवत असलेला काँग्रेस पक्ष एका जागावर आघाडीवर आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, तृणमूल काँग्रेसला २२ जागा प्राप्त झाल्या होत्या तर भाजपाला पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश प्राप्त होऊन १८ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीमध्ये, ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांबरोबर जागावाटप न करता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता.

निलंबित खासदार महुआ मोईत्रा आघाडीवर

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी सध्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून तब्बल ७० हजार मताधिक्याने आघाडीवर आहेत. जादवपूर मतदारसंघामध्ये तृणमूलच्या सयानी घोष या २० हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे उमदेवार अनिर्बन गांगुली दुसऱ्या तर माकपचे सृजन भट्टाचार्य तिसऱ्या स्थानी आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार पार्थ भौमिक हे बॅरकपूर मतदारसंघामध्ये तब्बल ५४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अर्जुन सिंह दुसऱ्या तर माकपचे देबत घोष तिसऱ्या स्थानी आहेत. कृष्णनगर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा तब्बल ५७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपाच्या अमृता रॉय दुसऱ्या स्थानावर तर एस. एम. सादी तिसऱ्या स्थानावर आहेत.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा व क्रिकेटर युसूफ पठाण आघाडीवर

मतमोजणीच्या आठ फेऱ्यांनंतर कोलकाता उत्तर मतदारसंघामध्ये सुदीप बॅनर्जी आणि बारासातमध्ये काकाली घोष दस्तीदार आघाडीवर आहेत. आसनसोल मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा ६० हजार मतांनी आघाडीवर आहेत. बनगाव मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार शंतनु ठाकूर आघाडीवर आहेत. बिष्णूपूर मतदारसंघातून भाजपाचे सौमित्र खान तर पुरुलिया मतदारसंघातून ज्योतिर्मय सिंग महतो आघाडीवर आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधिर रंजन चौधरी तब्बल ६४ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या ठिकाणी क्रिकेटर युसूफ पठाण आघाडीवर असून त्याला तृणमूल काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडीची दमदार कामगिरी पाहता एक्झिट पोल्समधील आकडेवारी फोल ठरतेय?

काँग्रेस एका जागेवर आघाडीवर तर माकपच्या फक्त मतांमध्ये वाढ

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस डाव्या पक्षांबरोबर निवडणूक लढवत आहे. मात्र, मालाड दक्षिण या एकाच मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचे इशा खान चौधरी आघाडीवर आहेत. बाकी कोणत्याही मतदारसंघामध्ये काँग्रेस आघाडीवर नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधिर रंजन चौधरीही पिछाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये माकपच्या मतांमध्ये घसघशीत वाढ झालेली असली तरीही त्यांना अद्याप एकाही ठिकाणी आघाडी मिळालेली नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal loksabha election results 2024 tmc bjp congress cpm vsh