West Bengal Students Election: कोलकाताच्या जाधवपूर विद्यापीठात १ मार्च रोजी घडलेल्या घटनेमुळे गेल्या चार दिवसांपासून, पश्चिम बंगालचे राजकारण तापले आहे. यामुळे राज्यातील प्रमुख विद्यापीठातील तसेच महाविद्यालयीन कॅम्पसमधील रखडलेल्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ मार्च रोजी, पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू, तृणमूल काँग्रेसशी संलग्न पश्चिम बंगाल महाविद्याल आणि विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जाधवपूर विद्यापीठात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी घेराव घातला आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे सीपीआय(एम) ने आरोप केला की, मंत्र्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने एका विद्यार्थ्याला जखमी केले. सीपीआय(एम) च्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि इतर डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या सदस्यांनी मंत्र्यांच्या गाडीला घेराव घालत विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात अशी मागणी केली होती.

या घटनेसंदर्भात नुकतेच स्थानिक पोलीस ठाण्यात सात एफआयआर दाखल करण्यात आले असून, नंतर झालेल्या जाळपोळीच्या घटनेसाठी जाधवपूर विद्यापीठाच्या एका माजी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. यानंतर एसएफआयने बसू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर टीएमसीने, निदर्शकांनी मंत्र्यांवर हल्ल्या करण्याची योजना आखल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान तृणमूल काँग्रेसने तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पुढे जाधवपूर विद्यापीठ प्रशासनाने १ मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्याबाबत चर्चा केली. तसेच विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्याबाबत उच्च शिक्षण विभागाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

बंगालमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका कधी थांबल्या?

बंगालमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या नाहीत. जाधवपूर विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका यापूर्वी २०२० मध्ये झाल्या होत्या, परंतु राज्यातील बहुतेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये त्या सुमारे दशकापूर्वी, २०१३ मध्ये झाल्या होत्या.

विद्यार्थी निवडणुकांवेळी पोलिसाची हत्या

फेब्रुवारी २०१३ मध्ये, कोलकाताच्या गार्डन रीच परिसरात एका पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. विद्यार्थी संघटना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना हरिमोहन घोष कॉलेजच्या बाहेर ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर तृणमूल सरकारने विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका सुरुवातीला सहा महिन्यांसाठी स्थगित केल्या होत्या.

या घटनेनंतर दोन महिन्यांतच विद्यार्थी संघटना निवडणुकांवर बंदी उठवावी यासाठी एसएफआय रस्त्यावर उतरली होती. पोलिसांनी आंदोलकांना पांगवताना रवींद्र भारती विद्यापीठाचा विद्यार्थी एसएफआयचा कार्यकर्ता सुदीप्तो गुप्ता याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. २२ वर्षीय गुप्ता याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप सीपीआय(एम) ने केला, तर पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याचा दावा केला होता.

विद्यार्थी निवडणुकांचे राजकीय परिणाम?

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने जोरदार तयार सुरू केली आहे. पण तृणमूल काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या अशांततेचा फटका बसू नये असे वाटत आहे. मात्र, टीएमसीचे प्रदेशाध्यक्ष तृणांकुर भट्टाचार्य म्हणाले की, “विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांची प्रामाणिकपणे मागणी करणारी आम्ही एकमेव संघटना आहोत. इतर संघटना फक्त नाटक करत आहेत. त्यांची महाविद्यालयांमध्ये १०% ही उपस्थिती नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला पाहिजे.”

जर आता महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू झाल्या आणि टीएमसी प्रमुख महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पराभूत झाला, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.