रामनवमीच्या सणानिमित्त पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये दंगली उसळल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या मुस्लीम समाजापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. ६७ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात तृणमूलचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम समाजाचा विश्वास संपादन करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण तृणमूल काँग्रेसच्या (TMC) राज्यात दंगली उसळत असल्याचा संदेश सर्वदूर गेल्यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. रामनवमीच्या दिवशी जेव्हा ठिकठिकाणी दंगली उसळत होत्या, तेव्हा ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलनला बसल्या होत्या. केंद्राकडून बंगालचा निधी रोखणे आणि तृणमूलमधील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई होत असल्याच्या विरोधात ममता बॅनर्जी आंदोलन करत होत्या.
बंगालमधील हिंसेनंतर भाजपा आणि टीएमसी दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपाने दंगली भडकविण्यासाठी चिथावणी दिली, असा आरोप टीमसीने केला आहे. तर राज्य सरकार हिंदूविरोधात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बाळगून परिस्थिती हाताळत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. “राज्यात दंगली घडविण्यासाठी त्यांनी (भाजपाने) राज्याबाहेरून गुंड आणले. त्यांच्या मिरवणुकीला कुणीही रोखले नव्हते. पण त्यांना मिरवणुकीत तलवारी आणि बुलडोझर घेऊन येण्याचा अधिकार नाही. हावडासारख्या शहरात ते अशा प्रकारचा उन्माद कसा दाखवू शकतात? तसेच मिरवणुकीचा मार्ग ऐनवेळी बदलून एका समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला.”, असा आरोप करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला.
हे वाचा >> पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठा झटका, पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय
रामनवमी उत्सवाच्या एक दिवस आधीच ममता बॅनर्जी यांनी कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार असणाऱ्या घटकांना माफ केले जाणार नाही, असा इशारा दिला होता. तरीही रामनवमीला हिंसा भडकल्यामुळे आता प्रशासनावरदेखील दबाव आहे. पोलीस प्रशासनाने योग्य वेळी योग्य ती कार्यवाही केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हावडा शहरात गतवर्षीच्या रामनवमी मिरवणुकीतही गोंधळ उडाला होता, त्या ठिकाणी या वर्षीही गडबड होऊ शकते, अशी शक्यता असतानाही पोलिसांना उपाययोजना करता आल्या नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
टीएमसीच्या नेत्याने मान्य केले की, पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याकांचा पक्षाला असलेला पाठिंबा पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. जर राज्य सरकार अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले, तर सागरदिघीच्या पोटनिवडणुकीत घसरली तशी मतदानाची टक्केवारी आणखी घसरू शकते. याउलट २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने भाजपाच्या भीतीपोटी टीएमसीला भरभरून मतदान केले. ज्या ठिकाणी सीपीआय (एम) आणि काँग्रेस पक्षाचा वरचष्मा होता, त्या ठिकाणीदेखील टीएमसीचे उमेदवार विजयी झाले. तृणमूलच्या नेत्यांवर एकापाठोपाठ झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि नेत्यांच्या अटकेमुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होत आहे. विशेषतः सागरदिघीमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर ममत बॅनर्जी यांनी पक्षातील प्रमुख पदांवर मुस्लीम नेत्यांना संधी दिली आणि अल्पसंख्याकांच्या विकासासाठी वेगळ्या विकास महामंडळाची घोषणा केली.
“बंगालमध्ये हिंसाचार भडकल्यामुळे अल्पसंख्याकांना भाजपा आणि दंगलींची भीती वाटत आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याकांमधील शिक्षित वर्ग पुन्हा एकदा सीपीआय (एम) पक्षाची भलामण करू लागला आहे. डाव्यांच्या हातात राज्य असताना दंगली उसळत नव्हत्या, असे त्यांचे मत होत असेल तर तृणमूल काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे”, अशी प्रतिक्रिया तृणमूलमधील नेत्याने दिली.
रामनवमीनिमित्त उसळलेल्या दंगलीमुळे भाजपा आणि डाव्यांना सत्ताधारी तृणमूल पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी आयता मुद्दा सापडला. हावडा येथील शिबपूर हिंसाचारात बळी पडलेल्या पीडितांची भेट घेण्यापासून सत्ताधाऱ्यांनी भाजपा आणि डाव्या पक्षातील नेत्यांना रोखल्यामुळे दोन्ही पक्षांनी तृणमूलवर जोरदार टीका केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार म्हणाले की, मुख्यमंत्री बॅनर्जी या संपूर्ण राज्यासाठी काम न करता केवळ एका समुदायासाठी काम करत आहेत.
तर सीपीआय (एम) पक्षाचे नेते सुजान चक्रवर्ती म्हणाले, “ही दंगल एकतर गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे किंवा भाजपा आणि तृणमूलने एकत्र येऊन केलेले दोन समाजांमधील ध्रुवीकरण आहे. पण आम्ही याविरोधात आवाज उठवू. बंगालमध्ये सांप्रदायिक राजकारण आम्ही चालू देणार नाही.”