पश्चिम बंगालमध्ये सागरदिघी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला. येथे काँग्रेसच्या उमेदवाराचा साधारण २४ हजार मताधिक्याने विजय झाला. विशेष म्हणजे उमेदवाराच्या पराभवासह येथे तृणमूल काँग्रेसच्या मतांची टक्केवारीदेखील घटली. या मतदारसंघात ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदार मुस्लीम समाजातील आहे. या निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी ममता बॅनर्जी यांना पाठ दाखवल्याचे आढळून आले आहे. याच कारणामुळे पराभवाचे कारण शोधण्यासाठी तसेच पक्ष नेमका कोठे चुकला यासाठी ममता बॅनर्जी यांनी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
हेही वाचा >>> ‘देशातील सर्वात भ्रष्ट सरकार’ अशी टीका करणारा भाजप संगमांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये सहभागी
सागरदिघीमधील पराभव तृणमूलसाठी चिंतेची बाब
ममता बॅनर्जी यांनी सागरदिघी येथील पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी पक्षातील सात सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती पक्षाच्या सागरदिघी येथील पराभवाची कारणे काय आहेत? मुस्लीम मतदार दूर होत आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. पश्चिम बंगालमध्ये २०२१ साली विधानसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत तृणमूलला मिळालेल्या मतांची टक्केवारी ५०.९५ एवढी होती. मात्र सागरदिघी येथील पोटनिवडणुकीत तृणमूलला फक्त ३४.९४ टक्केच मते मिळाली आहेत. येणाऱ्या एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. असे असताना सागरदिघीमधील पराभव तृणमूलसाठी चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >>> भाजपाची तिन्ही राज्यांत चांगली कामगिरी, जनाधार मात्र घटला! नागालँड, त्रिपुरा, मेघालयच्या निकालाचा अर्थ काय?
पराभवाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना
मुर्शिदाबाद जिल्ह्यात असलेल्या सागरदिघी या मतदारसंघावर २०११ सालापासून तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. अगोदर हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २६.२३ टक्के मते मिळाली होती. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत हाच आकडा ५०.९५ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र आता पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये घट झाली आहे. सागरदिघी मतदारसंघात साधारण ६३ टक्के मतदार हे मुस्लीम समाजाचे आहेत. मात्र याच मतदारसंघात तृणमूलच्या मतांची टक्केवारी घटल्यामुळे अल्पसंख्याक मतदार ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचाच ऊहापोह पाच सदस्यीय समितीकडून केला जाईल. या समितीमध्ये सिद्दिकुल्लाह चौधरी, साबिना यास्मीन, आमदार झाकीर हुसैन या सदस्यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> नागालँडच्या निवडणुकीत घडला इतिहास, पहिल्यांदाच विधानसभेत दिसणार महिला आमदार!
तृणमूलवर मुस्लीम मतदार नाराज?
या समितीविषयी तृणमूलच्या एका नेत्याने अधिक माहिती दिली आहे. “अल्पसंख्याकांचा आमच्यावरील विश्वास उडाला आहे का? हे तपासण्यासाठीच पक्षातर्फे पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुस्लीम समाज आमच्यावर का नाराज आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या समितीने काढलेल्या निष्कर्षांच्या मदतीने आम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करता येईल,” असे तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने सांगितले आहे.
हेही वाचा >>>‘आप’ची कर्नाटकमध्ये एंट्री; पहिल्याच जाहीर सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करत हल्लाबोल
दरम्यान, या विजयामुळे पश्चिम बंगालमधील विरोधकांचे मनोबल वाढले आहे. येथे काँग्रेस, डाव्या पक्षांची आघाडी यशस्वी होऊ शकते, असा संदेश सागरदिघी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून गेला आहे. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमधील जनता कोणाच्या पाठीमागे उभी राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.