लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. आता सातवा टप्पा शनिवारी (१ जून) पार पडणार आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील काही मतदारसंघांचे मतदान पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पार्टी (TMC) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) हे दोन मुख्य प्रतिस्पर्धी असून काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) यांची आघाडीदेखील मैदानात एकजुटीने उतरली आहे. मात्र, पहिल्या सहा टप्प्यांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही मुख्य प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांवरच लक्ष केंद्रित केले होते. मात्र, सातव्या टप्प्यामध्ये या दोन्हीही पक्षांनी डाव्या पक्षाविरोधातील प्रचारावर जोर दिला असून त्यांच्यावर भरपूर तोंडसुख घेतले आहे.

माकपचे आव्हान

सातव्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमधील नऊ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या नऊपैकी एखादी तरी जागा पदरात पाडून घेण्यासाठी माकप प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे कधीकाळी पश्चिम बंगालच्या राजकीय आखाड्यातील प्रमुख पक्ष असलेला माकप आता काँग्रेसबरोबरच्या युतीमुळे पुनरुज्जिवीत होताना दिसत आहे. मात्र, माकप तृणमूलची मते खाईल की भाजपाची? असा प्रश्न निवडणुकीच्या रिंगणातील दोन्हीही प्रमुख पक्षांना पडला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसने राज्यातील ४२ पैकी २२ मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. दुसऱ्या बाजूला भाजपानेही अनपेक्षितपणे अत्यंत चमकदार कामगिरी करत १८ जागा जिंकल्या होत्या. राज्यातील उर्वरित दोन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. दुसरीकडे, माकपला एकही जागा जिंकता आलेली नव्हती. अगदी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीमध्येही माकपला आपले खाते उघडता आले नव्हते.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
girish mahajan chhagan bhujbal l
छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? गिरीश महाजन म्हणाले…
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

हेही वाचा : केंद्रात कुणीही असो, निवडणुकीत पंजाब राहतो नेहमी विरोधातच; काय आहे हा इतिहास

२०१९ मध्ये पश्चिम बंगालमध्ये दिमाखदार कामगिरी केल्यामुळे या निवडणुकीतही अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा भाजपाला आहे. राज्यातील हिंदू मतदारांना आपलेसे करण्यात यश प्राप्त झाल्यामुळेच २०१९ च्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त झाल्याचे विश्लेषण करण्यात आले. परिणामत: राज्यातील मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक मतदार तृणमूल काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन्ही मतदारांना आपलेसे करण्यात फारसे यश आले नव्हते. मात्र, पश्चिम बंगालमधील गेल्या वर्षी झालेल्या पंचायत निवडणुकीमध्ये डाव्यांना चांगले यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे डाव्यांचे पारंपरिक मतदार माकपबद्दल पुनर्विचार करत असल्याचे दिसत आहे.

माकपची अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी

तृणमूल काँग्रेस आणि भाजपा या दोन्हीही पक्षांनी या निवडणुकीमध्ये माकपला फारसे गृहीत धरले नव्हते. मात्र, दोन्हीही पक्षांनी माकप अपेक्षेपेक्षा अधिकच चांगली कामगिरी करत असल्याचे उशिरा का होईना मान्य केल्याचे दिसत आहे. सातव्या टप्प्यातील ज्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे, त्या मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. यातील नऊपैकी दोन मतदारसंघांमध्ये माकपकडून अत्यंत तगडे उमेदवार रिंगणात उभे करण्यात आले आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांसमोर दमदम लोकसभा मतदारसंघामध्ये सुजन चक्रवर्ती तर जादवपूर मतदारसंघामध्ये सृजन भट्टाचार्य यांचे कणखर आव्हान आहे.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील बारासात आणि बारुईपूरमध्ये प्रचारसभा घेतली. त्यांनी या दोन्ही प्रचारसभांमध्ये माकपवर टीका केली. ते म्हणाले की, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच अशी घोषणा केली आहे की, त्या इंडिया आघाडीला नवी दिल्लीमध्ये मदत करतील. हा सगळा खेळ पडद्यामागे सुरू आहे.” पुढे पंतप्रधान मोदींनी मतदारांना सावध करत म्हटले की, “माकपला मत देणे म्हणजे तृणमूल काँग्रेसलाच मत दिल्यासारखे आहे. हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, मात्र त्यांची दुकाने एकसारखीच असून विक्रीसाठी लावलेल्या वस्तूही एकसारख्याच आहेत. तृणमूल काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे राजकारण एकच आहे, ते म्हणजे भ्रष्टाचार आणि व्होट बँकेचे तुष्टीकरण करणे. तृणमूल काँग्रेस आणि डावे पक्ष इंडिया आघाडीचेच घटकपक्ष आहेत. हे पक्ष लोकशाहीविरोधी असल्यानेच पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये नेहमी हिंसाचार पहायला मिळतो.” ते पुढे म्हणाले की, “आधी काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये लूट केली, त्यानंतर माकपनेही तेच केले आणि आता तर तृणमूल काँग्रेसने लूट करण्याच्या सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत.”

माकप-भाजपाची हातमिळवणी – तृणमूल काँग्रेसची टीका

दुसरीकडे तृणमूल काँग्रेसनेही माकपवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “दमदम लोकसभा मतदारसंघामध्ये माकप आणि भाजपाची हातमिळवणी झाली आहे. या मतदारसंघामधील भाजपाची मते माकपचे उमेदवार सुजन चक्रवर्ती यांना मिळतील; तर दुसरीकडे, बारानगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माकपकडून भाजपा उमेदवाराला मदत केली जाईल.” बारानगर विधानसभा मतदारसंघ दमदम लोकसभा मतदारसंघाअंतर्गतच येतो. या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या मतदारसंघाचीही पोटनिवडणूक होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानेही माकप-काँग्रेस युतीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, माकप-काँग्रेसच्या युतीमुळे त्यांच्या मतांची टक्केवारी वाढेल, असे दिसते आहे. मात्र प्रश्न असा आहे की, नेमक्या कुणाची मते ते हिरावून घेतील, याबाबत संदिग्धता आहे. पुढे ते म्हणाले की, “जर त्यांनी अल्पसंख्यांकाची मते मिळवली तर तो आमच्यासाठी फटका असेल. जर त्यांनी हिंदू मतांना मिळवण्यात यश मिळवले तर तो भाजपासाठी धक्का असेल.”

हेही वाचा : ओडिशातील आदिवासीबहुल भागात ‘द्रौपदी मुर्मू’ प्रचाराचा मुद्दा का झाल्या आहेत?

माकपचे उमदेवार सुजन चक्रवर्ती यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, “असे आरोप त्यांनी दमदम लोकसभा मतदारसंघात न करता जादवपूरमध्ये का केले? मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आधी ही गोष्ट लक्षात घ्यावी की, डाव्यांची सत्ता असताना पश्चिम बंगालमध्ये भाजपाला डोकंदेखील वर काढता आलेले नव्हते. तृणमूल काँग्रेसच्या सत्ताकाळातच भाजपाची सरशी होत आहे.” दुसऱ्या बाजूला राज्यातील भाजपाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार समिक भट्टाचार्य यांनीही ममतांच्या विधानांना आधार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, “दमदम लोकसभा मतदारसंघामध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव स्पष्टपणे दिसत असल्यामुळेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अगदी शेवटच्या घटकेला अशाप्रकारचे विधान केले आहे.”

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, माकप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांनी मिळून फक्त सहा ते सात टक्केच मते मिळवली होती. मात्र, माकपने तरुण चेहऱ्यांना संधी देऊन आणि काँग्रेसबरोबर प्रत्यक्ष मैदानात चांगल्या प्रकारे काम करून गेल्या वर्षी झालेल्या पंचायतींच्या निवडणुकांमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील जवळपास २० टक्के मते मिळवण्यात त्यांना यश आले आहे. मुर्शीदाबाद, मालदा आणि बीरभूमसारख्या जिल्ह्यांमध्ये हेच प्रमाण २६ टक्क्यांपर्यंत अधिक आहे. लोकसभा निवडणुकीतही आपल्या मतांचा टक्का चांगल्या प्रकारे वाढेल, अशी अपेक्षा माकप आणि काँग्रेसला आहे. यावेळीही माकपने अनेक तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. माकपचे जादवपूर मतदारसंघाचे उमेदवार सृजन भट्टाचार्य म्हणाले की, “आम्ही नेहमीच आमच्या मुद्द्यांवर निवडणुकीचा प्रचार व्हावा, यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळेच तृणमूल काँग्रेस आणि भाजपा काय आरोप करत आहे, याबद्दल आम्ही भाष्य करत नाही. आम्ही बेरोजगारी, महागाई यांसारख्या मुद्द्यांवरच भाष्य करत राहू.”

Story img Loader