नाशिक – कुठलीही मागणी न करता, विशिष्ट काही हवे, अशी अपेक्षा न बाळगता माजीमंत्री बबन घोलप हे शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे गटातील उपनेतेपद व प्राथमिक सदस्यत्वाचा घोलप यांनी फेब्रुवारीत राजीनामा दिला होता. ठाकरे गटाकडून मनधरणी केली जाईल, मातोश्रीवरुन बोलावणे येईल, असे काहीही न घडल्याने अखेर दोन महिने थांबून घोलप हे शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले. पक्षांतराने स्वत: घोलप, त्यांचे कुटुंबिय आणि शिंदे गटाला कितपत लाभ होईल, हा प्रश्नच आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदे गटाच्या गळाला लागला. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे माजीमंत्री बबन घोलप आणि नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करताना घोलप यांनी कुठलीही अपेक्षा ठेवली नसल्याकडे मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने लक्ष वेधले. घोलप हे सुमारे ३० वर्षांपासून सेनेत सक्रिय आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा त्यांनी विजय मिळवला. त्यांचे पुत्र योगेश घोलप हे एकदा सेनेच्या तिकीटावर विधानसभेत पोहोचले. घोलप यांची कन्या नयना या नाशिकच्या महापौर राहिल्या होत्या. त्यांच्या दोन्ही मुलींना पक्षाने महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी दिली होती. घोलप यांची ठाकरे गट सोडल्यानंतर काही मागणी राहिली नसेल, असा बहुदा विचार शिंदे गटाने केला असावा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोलप यांच्यावर चर्मकार समाजाचे राज्यासह देश पातळीवरील संघटन करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
प्रवेश सोहळ्याआधी घोलप यांनी खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर आगपाखड केली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ नये म्हणून या दोघांनी आडकाठी आणल्याचा आरोप केला. नाशिकमधून ठाकरे गटातून जे कुणी बाहेर पडले, त्या प्रत्येकाचे मुख्य लक्ष्य राऊत होते. घोलप यांनी वेगळे काहीच केले नाही. घोलप हे शिंदे गटात सामील झाले असले तरी त्यांचे पुत्र योगेश यांनी अद्याप कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. घोलप यांची एक मुलगी मार्चमध्ये भाजपमध्ये दाखल झाली. सध्या घोलप कुटुंबिय शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजप या तीन पक्षांत विभागले आहे. घोलप हे स्वत: ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक होते. या जागेवर भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव निश्चित झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. शिंदे गटाने शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांचे नाव आधीच जाहीर केले आहे. म्हणजे घोलप यांच्यादृष्टीने शिर्डीचा विषय संपला आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघात घोलप कुटुंबाला संधी मिळण्याची शक्यता नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांनी एकसंघ शिवसेनेचे योगेश घोलप यांना पराभूत केले होते. आगामी काळात विद्यमान आमदाराची जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता नाही. भविष्यातील राजकारण पाहून योगेश हे ठाकरे गटात थांबले आहेत. ठाकरे गटाने थांबविण्याचे प्रयत्न न केल्यामुळे बबन घोलप यांना शिंदे गटात जाण्याशिवाय पर्यायही नव्हता. परंतु, एकाच घरात पक्षाने मंत्रिपद, आमदारकी, महापौरपद, असे सर्व दिले असतानाही घोलप यांचे पक्षावर नाराज होणे पचनी पडले नसल्याने त्यांना साथ देणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी झाली असल्याने शिंदे गटाला त्यांचे पक्षांतर कितपत लाभदायक ठरेल, हे विधानसभा निवडणुकीपर्यंत स्पष्ट होईल.