गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भाजपाने राजकोटमधील उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांच्या मदतीसाठी पुढे केले आहे. रुपाला यांच्या काही विधानांमुळे त्यांना लोकसभा मतदारसंघातील राजपूत समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. २०२२ मध्ये मुख्यमंत्रिपदावरून अचानक हटवण्यात आलेले विजय रुपाणी आता भाजपा पंजाबचे प्रभारी आहेत. भाजपासमोरील आव्हानांवर त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला आहे.
या निवडणुकीत भाजपासाठी आव्हान काय?
भाजपासमोरील आव्हानांचा उल्लेख करताना विजय रुपाणी म्हणाले, “मी अनेकदा सांगितले आहे की, अतिआत्मविश्वास हे मोठे आव्हान आहे. कार्यकर्त्यांमध्ये अतिआत्मविश्वास असता कामा नये. विशिष्ट प्रमाणात आत्मविश्वास असणे महत्त्वाचे आहे.” जातीयवाद हे मोठे आव्हान असेल. गेल्या काही दिवसांपासून जातीवादाचा मुद्दा खूप वाढला आहे, असंही दुसऱ्या आव्हानाचा उल्लेख करताना माजी मुख्यमंत्री म्हणाले.
राजकारण पोसण्यासाठीच जातीयवाद अस्तित्वात आहे असे तुम्हाला वाटते का?
वाढत्या जातीयवादाकडे राजकारणात दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे आम्ही काही समतोल आणि सामाजिक अभियांत्रिकी कार्य करीत राहतो. जातीयवाद हा सर्व राजकीय पक्ष आणि संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे आणि त्यातून लोकांना बाहेर काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे राष्ट्रवादाची भावना वाढवणे हेच आहे.
भाजपा सरकारने केंद्रीय एजन्सीचा वापर करून आपला कोंडीत पकडल्याचा आरोप विरोधकांनी केला
काँग्रेस सरकारने आणीबाणी लादली होती, सामूहिक पद्धतीने सगळ्यांना अटक केली होती. मग लोकशाही कोणी धोक्यात आणली होती, १९७५ आठवतंय का? आज आम्ही अटक केली तरी लोक न्यायालयात जाऊन दाद मागू शकतात. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणे हे एक उदाहरण आहे. संजय सिंग यांना जामीन मिळाला आहे, पण त्यांच्या (आम आदमी पार्टीचे) माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे लोकशाही कार्यान्वित असल्याचे दर्शवणाऱ्या या प्रक्रिया होत आहेत.
भाजपा हा एवढा शक्तिशाली पक्ष असूनही सोशल मीडियावर सरकारवर टीका करणाऱ्या पोस्ट व्हायरल होतात.
लोक नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि भाजपाच्या इतर नेत्यांच्या विरोधात असंख्य रील्स अपलोड करतात. त्यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे का? आमच्यावर राजकीय टीका करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करत नाही. पण खोटे पसरवणाऱ्यांना आवर घालावा लागेल.
राजकोटमध्ये केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि परेश धनानी अनुक्रमे भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत. दोघेही राजकोटचे असल्याने याचा परिणाम झालेला दिसतो का?
नाही. कारण रुपाला हेवीवेट नेते आहे. त्यांनी दोन वेळा भाजपा गुजरातचे अध्यक्षपद भूषवले आहे. ते केंद्रीय मंत्रीही आहेत. लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकारणे स्वाभाविक आहे. ते सौराष्ट्राचे आहेत आणि सौराष्ट्रमधून (राजकोट या प्रदेशात येतो) निवडणूक लढवत आहे. त्यामुळे उमेदवार बाहेरचा असण्याचा प्रश्नच येत नाही, या राष्ट्रीय निवडणुका आहेत आणि लोक राष्ट्रहितासाठी मतदान करतात.
सूरत लोकसभेत भाजपाच्या बिनविरोध विजयाबद्दल तुम्हाला काय वाटते?
विजय रुपाणी म्हणाले, “तिथले काँग्रेसचे उमेदवार स्वतः भूमिगत झाले आहेत. आपण त्याबद्दल काय करू शकतो? हे सर्व काँग्रेसने केले आहे.
सूरतमधून रिंगणात असलेल्या काँग्रेस उमेदवारासह इतरांना उमेदवारी मागे घेण्यासाठी राजी केले होते का?
ते अजिबात खरे नाही. ते शक्य असते तर आम्ही सर्वच मतदारसंघात असेच केले असते. वस्तुस्थिती अशी आहे की, सूरतमधील काँग्रेस उमेदवाराचे त्यांच्या पक्षाशी वाद होते.
हे लोकशाहीसाठी चांगले आहे का?
विजय रुपाणी पुढे म्हणाले की, “हे घडणे खूप वाईट आहे, पण जेव्हा काँग्रेसचीच अवस्था वाईट आहे, तेव्हा आम्ही काय करू शकतो? एक काळ असा होता जेव्हा आपण विरोधी पक्षात होतो आणि आपली अनामत रक्कम वाचवू शकत होतो. पण आम्ही कधीच हार मानली नाही. सत्ताकेंद्री नसून वैचारिक बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्यांची ताकद आम्ही उभी केली.
विरोधी पक्षाच्या कमी होत चाललेल्या जागेकडे तुम्ही कसे पाहता?
विरोधी पक्षनेत्यांना राजकारणात कसे टिकायचे हा चिंतेचा विषय आहे. “काँग्रेसचेच घ्या. त्यांना नेता नाही. पक्ष घराणेशाहीच्या विळख्यात आहे,” असंही रुपाणी म्हणाले.
हेही वाचाः कोल्हापूर गादीच्या वारश्यावरून छत्रपती घराण्यातच वादाच्या तलवारी भिडल्या
इतर पक्षांतून इतके लोक सामील झाल्याने भाजपासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असे तुम्हाला वाटते का?
जे आमच्या तत्त्वांशी बांधिलकी दाखवतात आणि आमच्या सर्वोच्च नेत्यांच्या हाताखाली काम करण्याची तयारी दाखवतात, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. परंतु जेव्हा इतके लोक प्रवाहात येत आहेत, तेव्हा राज्य नेतृत्वाने सतर्क राहणे आणि संधिसाधूंनी परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये, याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
भाजपाचे टीकाकार त्यांच्या सरकारांवर अल्पसंख्याकांचा विशेषतः मुस्लिमांचा छळ करत असल्याचा आरोप करतात
आजपर्यंत काँग्रेस तुष्टीकरण करीत आली आहे. यामुळे अल्पसंख्याक आणि बहुसंख्य यांच्यात वादविवाद होतात. याच कारणामुळे आपण समान नागरी संहितेबद्दल बोलत आहोत, ज्याचा अर्थ गरीब व्यक्तीलाही समान अधिकार मिळणार आहेत, मग तो हिंदू असो वा मुस्लिम असो. एखाद्या व्यक्तीला केवळ अल्पसंख्याक समुदायाचे आहे म्हणून सर्व फायदे देणे योग्य नाही. यामुळे संतुलन बिघडते आणि समस्या निर्माण होतात. मोदींच्या राज्यात अल्पसंख्याक सुरक्षित आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या १० वर्षांत अल्पसंख्यांकांना त्रास देणाऱ्या कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत.
काँग्रेसला ‘ज्यांना जास्त मुले आहेत’ किंवा ‘घुसखोरांना’ संसाधने द्यायची आहेत, अशी टीका पंतप्रधानांना का करावी लागते?
काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास तुष्टीकरणाचे राजकारण होईल, असे त्यांचे म्हणणे होते. आपणाला ते हवे आहे का?, असा सवालही त्यांनी विचारला.
एका व्यक्तीच्या प्रतिमेवर अवलंबून राहणे या अर्थाने भाजपामध्ये परिवर्तन झाले आहे का?
समान नागरी संहिता, कलम ३७० रद्द करणे, अयोध्येत राम मंदिर उभारणे, भारताच्या प्रतीकांचे रक्षण, अंत्योदय गरिबांचे कल्याण ही स्वप्ने पाहत आम्ही मोठे झालो. अशी अनेक स्वप्ने पूर्ण झाली याचा आम्हाला आनंद आहे. दुसरे म्हणजे कोणताही पक्ष त्याच्या प्रमुख नेत्याच्या प्रतिमेवर अवलंबून असतो. इंदिरा गांधींच्या प्रतिमेमुळे काँग्रेस वर्षानुवर्षे पुढे गेली. त्यांच्यानंतर निर्माण झालेली नेतृत्व पोकळी आजही काँग्रेसमध्ये कायम आहे. भाजपा अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेमुळे वाढला आणि आता नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रतिमेमुळे पुढे जात आहे.
भाजपच्या ४०० चा आकडा पार करण्याच्या नारेबाजीला काय म्हणावे?
भाजपाने ४०० हून अधिक जागा जिंकल्याचा नारा विरोधक संविधान रद्द करण्याशी जोडत आहेत. याला उत्तर देताना विजय रुपाणी म्हणाले, “असं अजिबात नाही. नरेंद्र मोदींच्या कामगिरीने प्रेरित होऊन भाजपाचा आवाका ज्या प्रकारे विस्तारला आहे, त्यातूनच भाजपाचा आत्मविश्वास दिसून येतो. यापूर्वी राजीव गांधींनी ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. तेव्हा केवळ दोन जागा जिंकण्यात आम्हाला यश आले होते आणि तरीही, आम्ही उठलो आणि आज देशावर राज्य करत आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही विरोधकांसाठी जागा सोडलेली नाही.
पक्षापेक्षा नेता मोठा झाला तर काय होईल? त्यामुळे काँग्रेससारखीच स्थिती होऊ शकते का?
तशी शक्यता नाही. आपल्या पक्षाच्या अंतर्गत व्यवस्थेनुसार, नरेंद्र मोदींना पक्षाची आणि त्याची व्यवस्था इत्यादींची तितकीच काळजी असते. पण शेवटी एकच वडील असू शकतो. पक्षाचा सर्वोच्च नेता हा खऱ्या अर्थाने सर्वोच्च असला पाहिजे.
काँग्रेसच्या उदाहरणातून काही धडे घेण्यासारखे आहेत का?
काँग्रेसने सत्तेत असताना आपल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले नाही, शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना कसे उद्ध्वस्त केले याचा धडा काँग्रेसकडून घ्यायला हवा. ज्या दिवशी आमचे कार्यकर्ते कमकुवत होतील, त्या दिवशी आमची अवस्थाही काँग्रेससारखीच होईल.
येत्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर काय होईल?
राष्ट्रहितासाठी आवश्यक निर्णय धैर्याने घेतले जातील. विरोधकांकडून निर्माण करण्यात आलेले अडथळे संपुष्टात येतील.
काँग्रेस सरकारने वाजपेयींना संयुक्त राष्ट्रसंघात दूत म्हणून पाठवले. सरकार आणि विरोधक यांच्यातील कटुता अशानं मिटवता येईल का?
तसे होण्यासाठी विरोधी पक्षाकडे अटलजींसारखे नेते असले पाहिजेत. मला आजच्या विरोधी पक्षात एकही अटलजी दिसत नाहीत.