अविनाश कवठेकर
विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारीवरून स्वपक्षावर टीका, नदीसुधार योजनेच्या संथ गतीने होत असलेल्या कामांबाबत महापौरांवर नाराजी, संकल्पना फलक आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी उभारलेल्या वास्तूंना कुटुंबियांची नावे देण्यावरून नगरसेवकांचे जाहीर कार्यक्रमात टोचलेले कान आणि पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने नगरसेवकांकडून मागितलेले खुलासे, या खासदार गिरीश बापट यांच्या कृतीने कार्यकर्ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांवर नाराज असल्याची जाहीर प्रतिक्रिया बापट यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना दिली त्यामुळे खासदार बापट यांना नेमके झाले तरी काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ताप्राप्तीसाठी कुणालाही पक्षात प्रवेश दिला जात आहे. सत्तेसाठी पक्षाने निकषही बदलले आहेत. पक्षाची बांधिलकी असलेले प्रामाणिक कार्यकर्ते सध्या नाहीत. जेवणावळी, नेत्यांचे लांगुनचालन, हार-तुरे देताना तत्वांबरोबरच छायाचित्रे काढणे एवढ्यापुरतेच कार्यकर्ते मर्यादित राहिले आहेत. सत्ता आणि सत्तेची पदे मिळविणे एवढेच कार्यकर्त्यांचे ध्येय राहिले आहे, अशा शब्दात गिरीश बापट यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत नाराजी व्यक्त केली होती. बापट यांच्या या विधानामुळे, बापट सातत्याने असे का बोलत आहेत, अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
सलग पाच वेळा नगरसेवक, त्यानंतर तीन वेळा आमदार आणि सध्या खासदार असलेले गिरीश बापट यांचा कसबा विधानसभा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र गेल्या काही वर्षात त्यांची पक्ष संघटनेवरील पकड काहीशी कमकुवत झाली. पुण्याचे राजकीय नेतृत्व भाजपचे तत्कालीन राज्यसभा खासदार संजय काकडे की गिरीश बापट यांच्याकडे, यावरून भाजपमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाले. त्यातच विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिली आणि शहराच्या राजकारणात त्यांचाही सक्रिय सहभाग वाढला. शहराचे नेतृत्व पाटील यांच्याकडे गेल्याने बापट यांची नाराजी लपून राहिली नव्हती. आगामी महापालिका निवडणूक गिरीश बापट यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाईल, असे चंद्रकांत पाटील सांगत असले तरी बापट यांचा आता शहरातील राजकारणात सक्रिय सहभाग राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
हेही वाचा… मोदी-शहा यांची ‘नजर’ मुंबई महानगरपालिकेवर, शिवसेनेवर निर्णायक घाव घालण्याची तयारी
नगरसेवक, आमदार, पालकमंत्री, राज्य मंत्रिमंडळात मंत्री आणि आता खासदार असा राजकीय प्रवास झाल्याने बापट यांना सर्व काही मिळाले आहे. त्यातच प्रकृती फारशी साथ देत नसल्याने ते आता सक्रिय राजकारणात नाहीत. त्यांची सून स्वरदा यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी द्यावी किंवा कसब्यातून विधानसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी गिरीश बापट यांची अपेक्षा आहे. मात्र पक्षातील तीव्र राजकीय स्पर्धा पाहता स्वरदा यांना तिकिट मिळणार का, याबाबत स्पष्टता नाही. खासदार म्हणून कार्यरत असताना पुण्याच्या विकासासाठी फारसे काही करणे बापट यांना जमले नाही. त्यावरून भाजपविरोधी पक्षांकडून बापट यांच्यावर टीका होत आहे. खासदार म्हणून काम करण्याची संधी पुन्हा मिळेल का, याबाबतही साशंकता आहे. पक्षसंघटनेवरील कमकुवत झालेली पकड आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळेच बापट स्वपक्षावर सातत्याने टीका करत आहेत आणि हेच बापट यांच्या नाराजीचे मूळ कारण आहे, अशी चर्चा कार्यकर्ते करत आहेत.