सोमवारी अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ‘इंडिया’ आघाडीने नाकारले. या सर्व नेत्यांना या भव्य सोहळ्याची जाणीव आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा दिवस आपल्या पक्षासाठी कसा महत्त्वाचा ठरेल याची योजना त्यांनी तयार केली आहे.
भाजप त्यांच्या अनुपस्थितीचा वापर राजकीय दृष्टीने करेल हे त्यांना माहीत आहे. विरोधी पक्षातील नेते या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही, याचे कारण म्हणजे संघ परिवाराने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे रूपांतर राजकीय कार्यक्रमात केल्याचे इंडिया आघाडीत सहभागी सर्व पक्षांचे मत आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांनी जाहिरपणे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय कार्यक्रम म्हटले आहे. तर समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या नेत्यांनी मंदिराला नंतर भेट देणार असल्याचे सांगत नम्रतेने निमंत्रण नाकारले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांसारख्या इतर नेत्यांनी अद्याप या विषयावर मौन बाळगणे पसंत केले आहे.
मणिपूर ते मुंबई यात्रेवर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी सोमवारी आसामच्या नागाव जिल्ह्यात असतील. याठिकाणी ते प्रसिद्ध वैष्णव संत व सुधारक श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नागाव येथील बटाद्रवा ठाण/सत्र (मठ) ला भेट देणार आहे. परंतु नागावचे खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी रविवारी सांगितले की, बटाद्रवा थान व्यवस्थापन समितीने राहुल गांधींना मंदिरात येण्यास बंदी घातली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या दबावाखाली हे करण्यात आल्याचा आरोप बोरदोलोई यांनी केला आहे. श्रीमंत शंकरदेव यांनी एकाशरण नावाच्या धर्माचा प्रसार केला. यात त्यांनी समता आणि बंधुत्वावर आधारित, जातीय भेदापासून दूर असलेल्या समाजाचा स्वीकार केला. त्यांची शिकवण मूर्तिपूजेऐवजी प्रार्थना आणि नामजप यावर केंद्रित होती. त्यांचा धर्म देव, नाम (प्रार्थना), भक्त आणि गुरु (शिक्षक) या चार घटकांवर आधारित होता.
“श्री श्री शंकरदेव हे भारतातील महान धार्मिक गुरु, समाजसुधारक होते. १५व्या-१६व्या शतकातील श्री श्री शंकरदेव आसाममधीलच नव्हे तर आपल्या देशभरातील लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या जीवन आणि शिकवणीला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, असे काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश म्हणाले.
‘आप’ने सोमवारी दिल्लीत शोभा यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. यात पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘आप’तर्फे महाप्रसादाचेही आयोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच घोषणा केली होती की, त्या देवी कालीचे दर्शन घेण्यासाठी कोलकाता येथील कालीघाट मंदिराला भेट देतील. त्यानंतर काढण्यात येणाऱ्या ‘सद्भाव रॅली’चे नेतृत्व करतील. अल्पसंख्याक बहुल भागात असलेल्या पार्क सर्कस मैदानावर या रॅलीचा समारोप करण्यापूर्वी “सर्ब धर्म” रॅलीमध्ये सर्व धर्मातील धार्मिक नेते उपस्थित राहतील आणि विविध देवस्थानांना भेट देतील.
“मी प्रथम स्वतः काली मंदिराला भेट देईन. त्यानंतर हाजरा ते पार्क सर्कस मैदान अशी आंतरधर्मीय मिरवणुकीत सहभागी होऊन तिथे सभा घेणार. आम्ही वाटेत मशिदी, मंदिरे, चर्च आणि गुरुद्वारा यांना भेट देऊ. सहभागी होण्यासाठी सर्वांचे स्वागत आहे. या रॅलीत सर्व धर्माचे लोक असतील,” असे ममता यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले.
बाबरी मशीद पाडण्यात सेनेचा सहभाग असल्याचे ठणकावून सांगणारे शिवसेना (उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामायणात उल्लेख असलेल्या पंचवटी परिसरातील या मंदिराला भेट दिली होती.
इंडिया अलायन्समधील सर्व नेते मंदिरांना भेट देणार नाहीत. सोमवारी अखिलेश लखनौमध्ये असतील. दिवंगत समाजवादी नेत्याला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी ते जनेश्वर मिश्रा पार्कला भेट देणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. त्यानंतर ते शहरातील पक्ष कार्यालयात दोन-तीन बैठकांना उपस्थित राहणार आहेत. जनता दल (युनायटेड) समाजवादी आयकॉन कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २४ जानेवारी या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. सोमवारी पक्षाचे अनेक नेते तसेच समाजवादी पक्षांचे मित्र पक्ष या तीन दिवसांच्या उत्सवाची सुरुवात करून, कर्पूरी ग्राम येथे एका कार्यक्रमास उपस्थित राहतील.