मुंबई: दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही बंडखोर गटाचे नेते व आमदारांबरोबर सलोख्याचे संबध कायम राखणारे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत ‘खेळ’ करणार अशी चर्चा आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होत असून ठाकरे गटाने एका जागेसाठी नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. परिषदेचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी २३ आमदारांची मते आवश्यक आहेत. ठाकरे गटाकडे सध्या केवळ १५ आमदार आहेत. अतिरिक्त आमदारांची मते ही काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाकडून मिळवण्याचा ‘खेळ’ नार्वेकर करतील अशी चर्चा आहे.
नार्वेकर यांच्या घरातील गणेशोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी लावलेली हजेरी अनेकांच्या भुवया उचावणारी होती. नार्वेकर ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांचा हात हातात घेणार असे बोलले जात होते. गेल्या वर्षी शिवसेनेते उभी फूट पडली. शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे ठाकरे यांच्याकडे आता केवळ १५ आमदार शिल्लक राहिले आहेत. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २३ आमदारांची मते आवश्यक आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्याकडे १५ मते असताना त्यांनी तिसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केला आहे.
हेही वाचा – राहुल गांधींच्या भाषणावर मोदी-शाहांसह सत्ताधाऱ्यांनी का नोंदवला आक्षेप?
महाविकास आघाडीचे ३ उमेदवार मैदानात आहेत. महाविकास आघाडीकडे ६४ मते आहेत. तीन उमेदवार निवडून येण्यासाठी ६९ मतांची गरज आहे. महाविकास आघाडीचे दोन उमेदवार सहज निवडून येणार आहेत. तिसरे उमेदवार नार्वेकर हे शिंदे यांच्याबरोबर असलेल्या ऋणानुबंधनातून पाच ते सहा मतांची बेगमी करण्याची खात्री ठाकरे गटाला आहे. शिंदे गटाचे काही आमदार हे स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची चाचपणी या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येण्याची खात्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.