हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गुजरात विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला, तरी हिमाचल प्रदेशमध्ये येत्या १२ नोव्हेंबररोजी ६८ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच मतमोजणीही ८ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी एकूण ७८८१ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून यापैकी १४२ केंद्र हे केवळ महिला आणि ३७ केंद्र दिव्यांगासाठी असणार आहेत. तसेच ५५ लाख मतदारांपैकी १.८६ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि गुजरातचा विचार केला, तर लिंग गुणोत्तर, साक्षरतेची नेमकी काय स्थिती आहे? जाणून घेऊया.
लिंग गुणोत्तर आणि साक्षरतेचा विचार केला तर २०११ च्या जनगणनेनुसार हिमाचल प्रदेश, गुजरातपेक्षा पुढे आहे. लिंग गुणोत्तराच्याबाबतीत बोलायचे झाल्यास हिमाचल प्रदेशमध्ये एक हजार पुरुषांमागे ९७२ महिला, तर गुजरातमध्ये हेच गुणोत्तर एक हजार पुरुषांमागे ९१९ महिला असे आहे. दोन्ही राज्यातील शहरी भागाचा विचार केला, तर हिमाचल प्रदेशमध्ये हजार पुरुषांमागे ८५३ महिला, तर गुजरातमध्ये ८८० महिला, असे गुणोत्तर आहे.
हेही वाचा – Himachal Pradesh : निवडणूक प्रचारात भाजपाच्या दिग्गज नेत्यांची फौज मैदानात, पंतप्रधान मोदी घेणार चार सभा
साक्षरतेबाबत बोलायचं झाल्यास गुजरातमध्ये १९९१ मध्ये ६१.२९ टक्के नागरीक साक्षर होते. यात वाढ झाली असून २००१ मध्ये ६९.१४ टक्के, तर २०२१ मध्ये ७८.०३ टक्के झाली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्येही साक्षरता दर वाढल्याचे दिसून आले आहे. हिमाचलमध्ये १९९१, २००१ आणि २०२१ या जनगणनेनुसार अनुक्रमे ६३.८६ टक्के, ७६.४८ टक्के आणि ८२.८० टक्के इतका साक्षरता दर राहिला आहे. याबाबतीत हिमाचल प्रदेश नेहमीच पहिल्या पाच राज्यांमध्ये राहिला आहे.