सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपने एकूण १३४ आमदारांचा पाठिंबा मिळवल्याचे आणि शिवसेना व कॉंग्रेसची मते फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. यापूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेनेत बंड केल्याची उदाहरणे असली तरी ते प्रामख्याने महत्त्वाकांक्षेतून झालेले नेत्यांचे बंड होते. आता शिवसेनेच्या आमदारांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीवरून पक्षाच्या धोरणाविरोधात सामूहिक बंड केले आहे हा पूर्वीच्या आणि आताच्या बंडातील मुख्य फरक आहे.

शिवसेनेतील सर्वांत मोठे पहिले बंड गाजले ते छगन भुजबळ यांचे. आपल्याला डावलून मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते नेमल्याच्या रागातून आणि मंडल आयोगावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले मतभेदाचे कारण पुढे करत छगन भुजबळ यांनी १९९१ मध्ये बंड केले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत काही जण असले तरी त्या बंडाचे स्वरूप भुजबळ या नेत्याचे बंड असेच होते. शिवसेनेत उभी फूट पडली नव्हती. विशेष म्हणजे या बंडानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ हे पराभूतही झाले आणि राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आली.

राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना नवी मुंबईतील शिवसेनेचे बलाढ्य नेते गणेश नाईक यांचे वर्चस्व अनेकांच्या डोळ्यांत खुपू लागले. त्यातून पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व गणेश नाईक यांच्यात खटका उडाला. त्यातून अखेर गणेश नाईक यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र केला. याही वेळी गणेश नाईक यांच्यासारखा खंदा नेताच पक्ष सोडून गेला. तसेच १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा पराभवही झाला. हे बंडही एका नेत्याचे बंड असेच राहिले.

यानंतर शिवसेनेत मोठे बंड झाले ते नारायण राणे यांचे. २००४ च्या निवडणुकीनंतर पक्षात आपल्याला डावलून उद्धव ठाकरे सर्व सूत्रे हाती घेत असल्याच्या रागातून नारायण राणे यांनी बंड केले. छगन भुजबळ व गणेश नाईक यांच्या तुलनेत नारायण राणे यांचे बंड मोठे होते. त्यांच्यासह काही आमदारही गेले. पण त्यांची संख्या हातावर मोजण्याइतकी होती. त्यावेळीही शिवसेनेत उभी फूट टाळण्यात शिवसेना नेतृत्वाला यश आले. शिवसेनेतील शेवटचे मोठे बंड हे राज ठाकरे यांचे ठरले. राज व उद्धव यांच्यातील महत्त्वाकांक्षेच्या संघर्षातून ते बंड झाले. यानिमित्ताने प्रथमच ठाकरे घराण्यात फूट पडली. तो कौटुंबिक आघात मोठा असला तरी आमदारांच्या पातळीवर राजकीय नुकसान फारसे झाले नव्हते. बाळा नांदगावकर आणि इतर एखाद्या आमदाराचा पाठिंबा राज ठाकरे यांना मिळाला पण मनसे स्थापन झाल्यावरही शिवसेनाच वरचढ राहिली.

आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडली आहे. मात्र पूर्वीच्या बंडांपेक्षा हे बंड वेगळे आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याला असलेला राजकीय विरोध आणि आपल्याशी योग्य संवाद-संपर्क ठेवला जात नाही व त्यातून मतदारसंघात होणारी राजकीय अडचण या समान नाराजीवरून शिवसेनेचे अनेक आमदार एकत्र आले आहेत. पक्षाच्या धोरणाविरोधातील आणि कार्यपद्धतीविरोधातील शिवसेना आमदारांची ही सामूहिक नाराजी म्हणजे हे बंड आहे. ते बंड करताना एकनाथ शिंदे यांच्यासारख्या बलाढ्य व भाजपशी जवळीक असल्याने राजकीयदृष्ट्या उपयुक्त नेत्याचा आधार शिवसेनेच्या आमदारांनी घेतला आहे. त्यामुळेच भुजबळ, राणे, नाईक, राज ठाकरे यांच्याप्रमाणे हे केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून झालेले बंड नसून शिवसेनेच्या आमदारांच्या नाराजीचा सामूहिक स्फोट आहे.

Story img Loader