राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाकांक्षा निर्माण झालेल्या चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. तेलंगणाबाहेर महाराष्ट्रावर चंद्रशेखर राव यांनी लक्ष केंद्रित करून अन्य पक्षातील नेत्यांना प्रवेश देऊन ‘ताकद’ दिली. पण तेलंगणातच चंद्रशेखर राव यांचा पराभव झाल्याने राज्यात या पक्षाचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षेलाही खीळ बसली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणाबाहेर भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, शिवसेनेसह विविध पक्षांच्या नेत्यांना गळाला लावण्यात आले. या नेतेमंडळींना सारी ’ताकद‘ देण्यात आली. पक्षाच्या वतीने नागपूर, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, नवी मुंबई आदी शहरांमध्ये कार्यालये सुरू करण्यात आली. चंद्रशेखर राव यांच्या राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा झाल्या. त्यासाठी तेलंगणातून सारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. ‘रयतु बंधू’ ही शेतकऱ्यांना मदत देणारी योजना महाराष्ट्रात लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले. चंद्रशेखर राव यांनी राज्यात दौरा केला पण त्याचबरोबर शरद पवार, उद्धव ठाकरे आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. चंद्रशेखर राव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील प्रस्थापित नेत्यांना त्याची दखल घ्यावी लागली होती. चंद्रशेखर राव यांचा पक्ष हा राज्यात भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करीत असल्याचा आरोप झाला होता.

हेही वाचा – चंद्रशेखर राव सरकारच्या विरोधातील नाराजीचा काँग्रेसला फायदा, पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे निरीक्षण

हेही वाचा – वसुंधरा राजे पुन्हा राजस्थानच्या मुख्यमंत्री बनतील? काय आहेत राजकीय समीकरणं?

तेलंगणातील पराभवामुळे चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या योजनेला खीळ बसली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा लोकसभा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. तेलंगणात लोकसभेच्या १७ जागा आहेत. तेलंगणातील पराभवामुळे राज्यातील नेत्यांना मिळणारी ‘ताकद’ कमी होण्याची चिन्हे आहेत. यामुळेच राज्यात मोठी घौडदौड करण्याची योजना असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. चंद्रशेखर राव यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांमध्ये साहजिकच चलबिचल सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the future of chandrasekhar rao party in maharashtra harm to national ambitions print politics news ssb
Show comments