नाशिक – लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक जण कोणता मुहूर्त योग्य, हे पाहण्यासाठी ज्योतिषांकडे धाव घेत असल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाराजी व्यक्त केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रातून उद्या संसदेत प्रतिनिधित्व करण्यासाठी धडपडणाऱ्या या मंडळींकडून समाजातील अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत असून यातून फलज्योतिषांना फार मोठी आर्थिक कमाई होणार नसली तरी फलज्योतिषासारख्या थोतांड विषयाला प्रसिद्धी मिळत असल्याकडे अंनिसने लक्ष वेधले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पटलावर नाट्यमय घडामोडींनी वेग घेतला आहे. अनेक मतदारासंघांमध्ये अजूनही मोठ्या राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर झालेले नाहीत. ज्यांना उमेदवारी मिळाली, ते मुहूर्त पाहून आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसलेले अनेक उमेदवार ज्योतिषांसह तथाकथित बाबांच्या चरणी लीन होताना दिसत आहेत. ते सांगतील त्याच मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहेत.

हेही वाचा – घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिक आणि नैतिकपणे लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला असता तर लोकांनीच अशा व्यक्तींना उमेदवारी करण्याचा आग्रह धरला असता. त्यांना मग अर्ज भरण्यासाठी फलज्योतिषाकडे जाऊन त्याचा सल्ला व मार्गदर्शन घेण्याची गरज उरली नसती. एकाच मतदारसंघातील अनेक उमेदवार मुहूर्त पाहून उमेदवारी अर्ज भरतात. त्यापैकी एकच उमेदवार निवडून येतो. मुहूर्त पाहूनही इतरांना पराभव स्वीकारावा लागतो, या विसंगतीचा मतदारांनी विचार करण्याची गरज असल्याचे अंनिसने म्हटले आहे.

हेही वाचा – भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?

मुहूर्त पाहून उमेदवारी अर्ज भरण्याची दैववादी कृती भारतीय राज्यघटनेतील प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी पूर्णपणे विसंगत आहे. नशीब, प्राक्तन, मुहूर्त, शुभ-अशुभ वेळ, शकुन-अपशकुन, अशा अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धायुक्त संकल्पनांबाबत महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्या त्या काळात ताशेरे ओढून समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला आहे. जे उमेदवार मुहूर्त पाहून अर्ज दाखल करत आहेत, ते संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन या मौलिक मूल्याला पायदळी तुडवत आहेत. संतांचाही अपमान करत आहेत, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांविषयी सारासार विवेक वापरून आणि कोणत्याही प्रलोभनाला व दबावाला बळी न पडता, प्रत्येक मतदाराने मतदान करावे, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the opinion of andhasraddha nirmulan samiti on the candidates who are looking for time to fill the application form print politics news ssb