Devendra Fadnavis Political Future: महाराष्ट्र विधानसभेला दोन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना भाजपासमोर निवडणुकांच्या बरोबरीने आणखीही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे पुढे काय करायचे? भाजपामधील एका गटाचे मत आहे की, फडणवीस महाराष्ट्रातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. युवाशक्ती त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी स्वतःला सिद्धही केले आहे. संघाचाही त्यांच्यावर विश्वास आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील आहेत. इतक्या अनुकूलता असूनही २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर बहुमत गाठण्यात आलेले अपयश आणि त्यामुळे गमवावी लागलेली सत्ता, तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा खासदारांची संख्या २३ वरून नऊवर घसरल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या चढत्या आलेखाला काहीसा ब्रेक लागला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार?
लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने दिल्लीत चाललेल्या चर्चांवर एक लेख प्रकाशित केला आहे. त्यामध्ये म्हटलेय की, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव काही नेत्यांनी पुढे केले आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले. सध्या ते काळजीवाहू अध्यक्ष या नात्याने काम पाहत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजय मिळविला तरी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले जाऊ शकते. त्यामुळेच संघाशी संबंधित असलेले नेते त्यांना केंद्रात पाठविण्याबद्दल बोलत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीत ४० हून अधिक जागा जिंकल्या, तर त्यांचे मुख्यमंत्रिपद कायम ठेवले जाईल, असे त्यांना आश्वासित केले गेले आहे.
लोकसभेच्या पराभवाला फडणवीस जबाबदार?
पण, भाजपामधीलच आणखी एका गटाचे मानणे आहे की, विधानसभेआधी फडणवीस यांना केंद्रात पाठविण्याचा निर्णय झाल्यास महाराष्ट्रात त्याचा नकारात्मक संदेश जाईल. योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेले सहकार्यवाह अतुल लिमये यांनीही निवडणुका एका चेहऱ्याच्या भरवशावर लढविण्यापेक्षा सामूहिक नेतृत्वाद्वारे निवडणुकांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे.
काही नेत्यांचे म्हणणे आहे की, लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड करण्यापासून ते निवडणुकीची रणनीती आखण्यात फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका होती. लोकसभेच्या प्रतिकूल निकालाचे खापर त्यांच्यावरच फुटते. त्यामुळे त्यांना इतक्या लवकर केंद्रात महत्त्वाचे पद मिळेल, असे वाटत नाही. दुसरे असे की, फडणवीस यांनी भाजपाच्या नेत्यांना बाजूला सारल्याची भूमिका घेतली. त्याचाही फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसला. एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडे यांनाही अनेकदा बाजूला सारले गेले; तर माजी खासदार पूनम महाजन यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेले.
हे ही वाचा >> विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका
मराठा आंदोलनाची धग वाढल्याचा आरोप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजातून येत असल्यामुळे मराठा आंदोलनाला आणखी धार आल्याचे बोलले जात आहे. एक वर्षापूर्वी जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि गोळीबार केल्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी पेटले. गृह खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही मराठा असल्यामुळे या मराठा समाजाच्या रोषापासून ते थोडे दूर राहिले आहेत.
भाजपातील एका नेत्याने सांगितले की, विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यास मराठा समाजात चुकीचा संदेश जाईल.
फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रात कोण?
देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले, तर महाराष्ट्रात कोण, असाही एक प्रश्न पक्षासमोर आहे. भाजपामधील सूत्रांनी हेदेखील मान्य केले की, फडणवीस यांच्यासारखा सर्वमान आणि विश्वासार्ह नेता राज्यात शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. एक अशीही शक्यता वर्तविली जाते की, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे या जागेसाठी पाहिले जाते. विनोद तावडे यांचे २०१९ साली तिकीट कापून त्यांनाही असेच बाजूला केले गेले होते. मात्र, त्यानंतर विनोद तावडे यांनी केंद्रात आपली जागा तयार केली.
दरम्यान, फडणवीस यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांना स्वतःला महाराष्ट्र सोडून दिल्लीकडे कूच करण्यात फारसा रस दिसत नाही. एकदा का दिल्लीत तळ ठोकला की, पुन्हा राज्यात बस्तान बसविणे अवघड होईल. सध्या त्यांना महाराष्ट्रात राहण्याची इच्छा आहे, जिथे त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खुणावत आहे.
दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभेतील हाराकिरीबद्दल हे नेते महायुतीमधील घटक पक्षांना जबाबदार धरत आहेत. शिवसेना शिंदे गटाने सात जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा जिंकता आली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला ‘आधुनिक अभिमन्यू’ म्हटले आहे. महाभारतात अभिमन्यू शत्रूच्या चक्रव्यूहात गेला; मात्र त्याला तिथून बाहेर पडता आले नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ते चक्रव्यूह भेदून बाहेर पडतील. तर, त्यांच्या निक’वर्तीयांचे म्हणणे आहे की, पक्षातंर्गत विरोधकांचा चक्रव्यूह फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.