मुंबई : ‘मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील, त्यास माझ्या पक्षाचा पाठींबा असेल’ अशी भूमिका घेत महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेला पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला. परंतु ही अपरिहार्यता होती का, या विषयीच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप श्रेष्ठींनी मांडल्यामुळेच शिंदे यांना ही माघार घ्यावी लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात मोक्याची मंत्रीपदे मिळवताना आता त्यांचा कस लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला घवघवीत यश मिळाले, तेव्हापासूनच शिंदे यांच्या कोंडीचा अध्याय सुरू झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळेल आणि त्यातही भाजप १३०हून अधिक जागा निवडून आणेल, यावर महायुतीतील घटक पक्षांचा विश्वास नव्हता. महायुतीला काठावरचे बहुमत मिळाल्यास सत्ता स्थापनेत आपली भूमिका महत्त्वाची राहिल, असा विश्वास शिंदे यांच्या पक्षाला वाटत होता. भाजपचा आकडा शंभरीच्या घरात पोहोचला तरीही मुख्यमंत्रीपद आपलेच, असे खुद्द शिंदे यांच्या निकटवर्तीयांनाही वाटत होते.
बावनकुळे, शेलार यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी कायम; मंत्रिमंडळातील नावांबाबत चर्चा सुरू
निवडणुकींना सामोरे जात असताना आपल्या चेहऱ्यावरच ही निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा आपल्याला ‘शब्द’ दिला गेल्याचे शिंदे यांच्या गोटात बोलले जात होते. निकलानंतर मात्र हे चित्र बदलले. भाजपचा आकडा १३२ पर्यंत पोहचला आणि शिंदेसेेनेचे ‘गणित’ चुकले. भाजपला मिळालेल्या इतक्या मोठ्या यशानंतर शिंदे गोटातील धाकधुक वाढली आहे.
● मोठ्या विजयानंतर अपक्ष आणि इतर आमदारांचाही भाजपला मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता, मुख्यमंत्रीपदावरील त्या पक्षाचा दावा ठोस बनत असल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी बुधवारी या स्पर्धेतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदाविषयी महायुतीत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी त्यांची पत्रकार परिषद निर्णायक ठरली असली तरी त्यांनी दाखवलेल्या लवचिकतेपेक्षा अपरिहार्यतेचाच भाग अधिक होता, अशी चर्चा आता रंगली आहे.
● मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडत असताना त्यांना मंत्रिमंडळात मोक्याच्या स्थानाची अपेक्षा आहे. असे असले तरी मागील सव्वादोन वर्षांत शिंदे यांच्या ठराविक मंत्र्यांचा वादग्रस्त कारभार यापुढे भाजपकडून खपवून घेतला जाईल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची शिंदे तोंडभरून स्तुती करत असताना, दिल्लीतील ‘महाशक्ती’ च्या हातीच घटक पक्षांचेही दोर यापुढे असतील, हे यानिमित्ताने स्पष्ट होऊ लागले आहे.
● मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडत असताना शिंदे यांची यापुढील भिस्त त्यांच्या आवडत्या नगरविकास तसेच रस्ते विकास महामंडळासारख्या मंत्रीपदावर असेल. याबरोबर आणखी काही मोक्याची मंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार असून, त्यांनी दाखवलेली लवचिकता हा याच आखणीचा भाग असल्याची शक्यता आहे.