राजेश्वर ठाकरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव जामोद (बुलढाणा) : कन्याकुमारीपासून निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा पाच राज्यातून प्रवास करीत महाराष्ट्रात दाखल झाली. या यात्रेला इतर राज्यांच्या तुलनेत महाष्ट्रात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद काँग्रेसजणांसह आयोजकांचाही उत्साह वाढवणारा ठरला. राजकारणाशी संबंध नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा यात्रेतील सहभाग ही बाब राज्यातील यात्रेचे वेगळेपण ठरले, असे निरीक्षण यात्रेत पहिल्या दिवसापासून सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते व स्वराज्य इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी नोंदवले.

हेही वाचा… श्रद्धा ठाकूर : कुशल संघटक

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास बुलढाणा जिल्ह्यात संपला. पुढच्या टप्प्यात ती मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. पदयात्रेदरम्यान भेंडवळ ते जळगाव जामोद येथे योगेंद्र यादव यांच्याशी संवाद साधला. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील अनुभवाविषयी त्यांना विचारले. ते म्हणाले, एक विचार घेऊन ही यात्रा कन्याकुमारी येथून निघाली. विचाराशी सहमत असणारे लोक यात्रेशी जुळत गेले. दक्षिणेतील राज्यातून यात्रा पुढे सरकत असताना विचाराला एका जलधारेचे स्वरूप आले. महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला विशाल नदीचे स्वरूप प्राप्त झाले. महाराष्ट्राने या यात्रेला एका वेगळ्या उंचीवर नेले. यासाठी लोकांना यात्रेसाठी संघटित करण्यासाठी काँग्रेसने घेतलेले परिश्रम, विविध संघटनांचा सहभाग आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या तीन गोष्टी कारणीभूत ठरल्या. हेच महाराष्ट्रातील यात्रेचे वैशिष्ट्य होते.

हेही वाचा… “सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करा अन्यथा…”, गुर्जर नेत्याचा काँग्रेसला इशारा

विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा संघटनांशी न जुळलेले शेकडो नागरिक यात्रेत सहभागी झाले. ही बाब इतर राज्यात आढळून आली नाही. जसजशी यात्रा पुढे जात होती तसतसा लोकांचा सहभाग वाढत होता. हे या यात्रेचे महाराष्ट्रातील वेगळेपण होते. असे योगेंद्र यादव म्हणाले.

हेही वाचा… पश्चिम विदर्भात काँग्रेसला पुनरुज्‍जीवनाचे वेध

आंध्रप्रदेशात यात्रेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. येथे चारच दिवस यात्रा होती. या राज्यात काँग्रेस संघटना बळकट नसल्याचा हा परिणाम असावा. तसेच आम्ही सुद्धा यात्रेच्या तयारीसाठी स्वतंत्रपणे बैठका घेतल्या नाहीत. यात्रा आधी कर्नाटक नंतर आंध्रप्रदेश आणि परत कर्नाटक अशी होती. त्यामुळे, आमचे लक्ष कर्नाटकवर अधिक होते, महाराष्ट्रात मात्र यापेक्षा वेगळे चित्र दिसून आले. नांदेड आणि शेगावच्या जाहीर सभेला झालेल्या प्रचंड गर्दीने राज्यात काँग्रेस संघटनात्मक पातळीवर भक्कम असल्याची प्रचिती आली.

हेही वाचा… सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतरही नांदेडमधील सत्ताधारी खासदार आमदारांमध्ये शुकशुकाट

आपण यात्रेत का सहभागी झाले? असा सवाल यादव यांना केला असता ते म्हणाले, सध्या देशात आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती आहे. त्यावेळी फक्त लोकशाहीपुढे आव्हान उभे ठाकले होते. आता मात्र, संविधान, संस्कृती, स्वतंत्रता आंदोलनातील मूल्यांना आव्हान दिले जात आहे. त्यामुळेच विविध संस्था, संघटना आणि सर्वसामान्य नागिरक यात्रेत सहभागी होत आहेत, आम्ही काँग्रेस पक्षाशी जुळलेलो नसतानाही यात्रेसोबत आहोत, असे योगेंद्र यादव म्हणाले.

हेही वाचा… Maharashtra Marathi News Live : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

राहुल यांच्याविषयी योगेंद्र यादव काय म्हणाले…

यात्रेला मिळणारा प्रतिसाद आणि काँग्रेस पक्ष व राहुल यांची प्रतिमा याबाबत बोलताना योगेंद्र यादव म्हणाले, यात्रेला, राहुल यांच्या जाहीर सभांना होत असलेली प्रचंड गर्दी या भागात काँग्रेसचा आत्मिवश्वास परत येत असल्याचे व राहुल यांची प्रतिमा बदलत असल्याचे द्योतक आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the uniqueness of bharat jodo yatra in maharashtra social activist yogendra yadav also expressed his opinion print politics news asj