लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सगळ्या पक्षांचे नेते, कार्यकर्ते उन्हातान्हात प्रचारात व्यग्र आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली आहेत. प्रतिस्पर्धी पक्षांच्या बरोबरीने ८३ वर्षीय शरद पवारांसमोर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं आव्हान आहे. ८३व्या वर्षी, टळटळीत उन्हात प्रचारादरम्यान शरद पवार यांची दिनचर्या कशी असते? जाणून घेऊ या.
दोन दशकांपूर्वी कर्करोगावर मात
दोन दशकांपूर्वी शरद पवार यांनी कर्करोगावार मात केली होती. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पवारांना कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोगाचेही निदान मला मुळापासून हादरवू शकले नाही, असे खुद्द शरद पवार म्हणाले होते. २०१९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान शरद पवार यांनी केलेलं भर पावसातलं भाषण चर्चेचा विषय ठरलं होतं. शरद पवार हे नेहमीच त्यांच्या उर्जेसाठी ओळखले जातात.
शरद पवार चहा किंवा कॉफी घेत नाही. त्यांच्या दिनचर्येत ते नियमित तीन वेळा जेवण करतात, याव्यतिरिक्त ते काहीही खाणे टाळतात. योग किंवा ध्यान करण्याऐवजी ते दिवसभरात घडलेल्या घडामोडींवर मनन चिंतन करण्यासाठी आणि पुढील योजना आखण्यासाठी दिवसाच्या शेवटी चालण्याचा व्यायाम करतात. शरद पवार यांना कुटुंबासह चित्रपट पाहण्याचीही आवड आहे.
अलीकडे कडाक्याच्या उन्हात, त्यांचा दिवस पक्षाच्या नेत्यांशी जागा वाटपाच्या चर्चा, विदर्भातील सभा व परिषदांना संबोधित करण्यात आणि पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात जातो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे विशेष लक्ष राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या बारामती मतदारसंघावर आहे.
शरद पवार यांची दिनचर्या
शरद पवार यांच्यासाठी वय हा केवळ एक आकडा असल्याचे, त्यांचे समर्थक सांगतात. ते आपल्या दिनचर्येची सुरुवात सकाळी ६.३० वाजता वर्तमानपत्र वाचून करतात. सकाळी ८ वाजता ते बातम्या पाहतात. न्याहरीत ते पोहे किंवा दक्षिण भारतीय इडली सांबार खाणे पसंत करतात. त्याबरोबर पपई, केळी आणि आंबा या फळांचेही सेवन करतात. दुपारचे जेवण ते १ ते ३ या वेळेत करतात. त्यात चपाती, डाळ, भाजी (गवार, बटाटे किंवा सोयाबीन) आणि मासे, मटण किंवा चिकन असते. रात्रीचे जेवणदेखील दुपारच्या जेवणाप्रमाणेच असते. पत्नी प्रतिभा त्यांच्या जेवणाची विशेष काळजी घेतात.
हेही वाचा : बारामतीची लढाई कौटुंबिक नाही; भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा- सुनेत्रा पवार
शरद पवार यांच्या सक्रिय जीवनशैलीत मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ते नियमित रक्त चाचणी करतात आणि तीन वेळच्या आहाराव्यतिरिक्त काहीही खाणे टाळतात. त्यामुळे ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबापासून लांब आहेत. हायड्रेट ठेवण्यासाठी ते न चुकता पाणी किंवा नारळ पाणी पितात. शरद पवारांच्या बरोबरीने जेवण्याचा पत्नी प्रतिभा यांचा प्रयत्न असतो. परंतु, प्रचाराच्या दिवसांमध्ये, त्या शरद पवार यांनी जेवण केले आहे की नाही, याची खात्री करून घेतात. शरद पवार सहसा बारामती, पुणे आणि मुंबई असा प्रवास करत असतात. कुटुंबातील सदस्यांसह ते एक वेळचे तरी जेवण करतात.