Priyanka Gandhi Speech in Lok Sabha: संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि वायनाड लोकसभेच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी जोरदार भाषण करत संसदीय कारकिर्दीची सुरुवात केली. भाजपाकडून वारंवार आणीबाणीचा उल्लेख करून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला जातो. प्रियांका गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संविधानावरील चर्चेला सुरुवात केली होती. त्यांच्या भाषणातील मुद्द्यांचा प्रतिकार करताना प्रियांका गांधी म्हणाल्या, “तुम्ही १९७५ च्या आणीबाणीचा उल्लेख केला. तुम्हीही आमच्याकडून शिका. तुम्ही केलेल्या चुकांची माफी मागा. मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल.”
आणीबाणी ही चूकच – राहुल गांधी
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा गांधी कुटुंबातील एखाद्या सदस्याने आणीबाणीबद्दल जाहिररित्या माफी मागितली. मार्च २०२१ मध्ये राहुल गांधी यांनी आणीबाणीला ‘चूक’ म्हटले होते. कॉर्नेल विद्यापीठातील प्राध्यापक कौशिक बसू यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत असताना राहुल गांधी म्हणाले होते की, आणीबाणी ही मोठी चूक होती आणि माझ्या आजीनेही हे मान्य केले होते. तथापि, आणीबाणीने सरकारी संस्थांना ताब्यात घेतले नाही, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
सोनिया गांधींनीही आणीबाणी अयोग्य असल्याचे म्हटले
एक दशकापूर्वी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही आणीबाणी ही चूक असल्याचे म्हटले होते. मे २००४ साली एनडीटीव्ही वृत्तवाहिनीवर द इंडियन एक्सप्रेसचे तत्कालीन मुख्य संपादक शेखर गुप्ता यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या, इंदिरा गांधींनाही आणीबाणी चुकीची वाटली होती. “माझ्या सासू निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर (१९७७) त्यांनी आणीबाणीबद्दल पुन्हा विचार केला होता. तसेच त्यांनी निवडणूक जाहीर केली, याचा अर्थ त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केला होता. मी ज्या इंदिरा गांधींना ओळखते, त्या मनाने लोकशाहीवादी होत्या, हे कुणी विसरू नये. पण मला वाटते, त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना तसे पाऊल उचलण्यास भाग पाडले.”
काँग्रेसच्या इतर नेते काय म्हणाले होते?
२०११ मध्ये काँग्रेसने पक्षाचा १२५ वा वर्धापन दिन साजरा केला होता. यावेळी त्यांनी इतिहासकारांच्या एका गटाला एकत्र करून पक्षाच्या इतिहासावर एक खंड प्रकाशित केला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली होती. इंदर मल्होत्रा आणि बिपन चंद्रा यासारख्या इतिहासकारांनी या खंडात आणीबाणीच्या काळाबद्दल विस्तृतपणे भाष्य केले आणि काँग्रेसवरही टीका केली.
२०१४ साली प्रणव मुखर्जी यांनी ‘द ड्रॅमॅटिक डिकेड: द इंदिरा गांधी इयर्स’ हे पुस्तक लिहिले होते. यात ते आणीबाणीला एक अनावश्यक साहस म्हणतात. मुखर्जी यांनी पुढे लिहिले, “मूलभूत अधिकाराचे हनन आणि राजकीय कार्यक्रमांवर (ट्रेड युनियनही) आणलेली बंदी, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात अटक, माध्यमांवर निर्बंध आणि निवडणुका न घेता कायदेमंडळाला अधिक वेळ देणे, ही आणीबाणीमधील काही उदाहरणे आहेत. ज्यामुळे लोकांच्या हितावर निर्बंध आले. काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांना या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागली.”
हे ही वाचा >> नसबंदी मोहीम ते इंदिरा गांधींना विरोध; संजय गांधींची आणीबाणीमध्ये काय भूमिका होती?
प्रणव मुखर्जी यांनी पुढे लिहिले की, काँग्रेसचे नेते सिद्धार्थ रॉय शंकर यांनी आणीबाणीबद्दल निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवाली, असे मानले जाते. त्यांनी आणीबाणीची सूचना केली आणि इंदिरा गांधींनी पुढे त्यावर काम केले. इंदिरा गांधी यांनी मला आणीबाणीबद्दल नंतर माहिती देताना सांगितले की, देशाअंतर्गत अशांतता आणि गोंधळ निर्माण झाल्याच्या कारणास्तव आणीबाणीची घोषणा करण्यास परवानगी देणाऱ्या घटनात्मक तरतुदींची त्यांना माहिती नव्हती.
२०१५ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते जोतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की, आणीबाणी लागू करणे ही चूकच होती आणि त्याकाळी जे झाले, ते चुकीचे घडले होते. आता त्यावर पुन्हा चर्चा करून उपयोग नाही. १९८४ च्या दंगलीत (काँग्रेस सरकारच्या काळात) जे घडले, तेही चुकीचे होते. जर देशात कुठेही जीवितहानी झाली असेल, त्यावेळी देशात किंवा राज्यात कुणाचेही सरकार असले तरी तरी आपण जे चूक होते, त्याला चूकच म्हटले पाहीजे.
आणखी वाचा >> आणीबाणीनंतर वाजपेयींनी इंदिरा गांधी यांना काय म्हटले होते ?
यावर्षीच जून महिन्यात संसदेत आणीबाणीवर चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणाले की, आणीबाणी ही लोकशाही विरोधी होती, पण ती असंवैधानिक नव्हती.