मोहन अटाळकर
अमरावती : भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपाविषयी वक्तव्य केल्यानंतर सरकारला पाठिंबा देणाऱ्या लहान पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी दोघांचा विचार केला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी अजून युतीचे अजून ठरलेले नाही, असे स्पष्ट करून चेंडू तूर्तास टोलवला आहे. मात्र रवी राणा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बच्चू कडू हे आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटचे मानले जात होते, पण राज्यात सत्तांतराच्या वेळी ज्या अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात आधी पाठिंबा दिला, त्यात बच्चू कडू यांचे नाव अग्रस्थानी होते. नवीन सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, असा भक्कम विश्वास बच्चू कडू यांचे समर्थक व्यक्त करीत होते. स्वत: बच्चू कडू यांनी देखील मंत्रिपदाची इच्छा सातत्याने व्यक्त केली होती, पण ते अजूनही मंत्रिपदापासून वंचित आहेत.
हेही वाचा… ‘महाविजय’ साठी वयोवृद्धांना साद घालत भाजपचे ‘अमृतकुंभ अभियान’
बच्चू कडू यांना मंत्रिपदाबाबत सातत्याने विचारणा होत होती. त्यावर ते प्रतिक्रिया देखील देत होते, पण आता त्यांनी ते देणेही बंद केले आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. दुसरे आमदार राजकुमार पटेल हे मेळघाट विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. प्रहार पक्षाचा विस्तार व्हावा, याचा प्रयत्न बच्चू कडू हे सातत्याने करीत असताना जागा वाटपाच्या वेळी मोठा वाटा मिळावा, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून आहेत.
हेही वाचा… उजनीचा ‘गाळ’ राष्ट्रवादीसाठी ‘काळ’?
दुसरीकडे, गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा देऊन आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांना सातत्याने लक्ष्य करून त्यांनी भाजपशी निकटता वाढवली. भाजपच्या सहाय्याने स्वत:च्या पक्षाचा उत्कर्ष साधण्याचा त्यांचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो, हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला स्थानिक निवडणुकांमध्ये फारसे यश अद्याप मिळालेले नसले, तरी त्यांची महत्वाकांक्षा वाढली आहे. विधानसभेच्या जागावाटपाच्या वेळी रवी राणा यांची मर्जी देखील भाजपला सांभाळावी लागणार आहे, त्यामुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी ओढवणार नाही, याची काळजी वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे, शिंदे गटातील इच्छूकही तयारीला लागले आहेत.
हेही वाचा… माकप आणि किसान सभेची ताकद अबाधित
अमरावती जिल्ह्यात आणि बाहेर बच्चू कडू आणि रवी राणा यांनी जागावाटपाच्या चर्चेच्या वेळी वाढीव जागा मागितल्यास, भाजप आणि शिंदे गटासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यातील जागांवर काय भूमिका घ्यायची, हेही सत्ताधारी आघाडीसाठी कसरतीचे ठरणार आहे.