संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्षाध्यक्षपदी कायम राहताना संघटनेत बदल करण्याचे सुतोवाच शरद पवार यांनी केल्याने राज्य राष्ट्रवादीत कोणते बदल होणार याची पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.‘भाकरी फिरवली नाही तर करपते’ असे पवार नेहमीच सांगतात. अलीकडेच त्यांनी पक्षात भाकरी फिरविण्याची वेळ आल्याचे विधान केले होते. त्यानंतर त्यांनी स्वत:च पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. निवृत्तीचा विचार मागे घेतला असला तरी पक्षातील असंतुष्ट नेत्यांना सूचक इशारा दिला. पक्षात कोणतेही पद आणि जबाबदारी सांभाळण्याकरिता उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते, अशी भूमिका पवारांनी मांडली आहे. तसेच संघटनात्मक बदल करण्याचे जाहीर केले आहे. जिल्हा पातळीवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना राज्य तर राज्य पातळीवर अनेक वर्षे काम केलेल्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली जाईल, असेही पवार यांनी जाहीर केले.

राज्य राष्ट्रवादीत कोणते बदल होणार याचीच कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कारकिर्दीस पाच वर्षे पूर्ण झाली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरशिवाय होण्याची शक्यता नाही. यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष नेमला जाऊ शकतो. याशिवाय संघटनेत अनेक वर्षे पदाधिकारीपद भूषविणाऱ्यांना बदलले जाऊ शकते. नवाब मलिक यांच्या अटकेपासून गेले वर्षभर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद रिक्त आहे. तेथेही नव्या चेहऱ्याला संधी द्यावी लागेल. याशिवाय पक्षाची ताकद वाढविण्याची गरज असलेल्या भागांमध्येही संघटनात्मक बदल केले जातील.

हेही वाचा >>>बिहारमधील जातीआधारित सर्वेक्षणाला कोर्टाचा ‘स्टे’! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची राजकीय कोंडी?

जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी पहिल्या फळीतीली नेत्यांकडे राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांची यापूर्वीच राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What will be the organizational changes in ncp print politics news amy