पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. देशाचे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. सोमवारी मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय याने पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून वडील मुकुल रॉय बेपत्ता झाल्याचे सांगितले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी शोधपथक स्थापन करून दिल्लीकडे कूच केले. मात्र मंगळवारी अचानक मुकुल रॉय यांनी एका बंगाली वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी अजूनही भाजपामध्येच असून मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला दिल्ली येथे आलो आहे. “मी अजूनही भाजपाचा आमदार आहे. मला पक्षासोबतच राहायचे आहे. पक्षानेच दिल्लीत राहण्याची माझी सोय केली. मला अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन चर्चा करायची आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी एका बंगाली वृत्तवाहिनीला दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. एकेकाळी तृणमूलचे मुख्य रणनीतीकार आणि पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र २०१७ साली पक्षातील नेत्यांशी वितुष्ट आल्यानंतर त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुकुल रॉय यांच्यामुळे भाजपाला पश्चिम बंगालमध्ये १८ जागा जिंकता आल्या होत्या. २०२० साली भाजपाने रॉय यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांचा सन्मान केला. २०२१ साली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकिटावर क्रिष्णानगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र निकालानंतर तृणमूल काँग्रेसची राज्यात सत्ता आल्यामुळे त्यांनी भाजपाला सोडून पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये गेले असले तरी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. दरम्यान तृणमूल काँग्रेसने त्यांना लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देऊ केले होते. जून २०२२ मध्ये भाजपाने त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या काही काळापासून रॉय सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. मार्च महिन्यात त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून ते सार्वजनिक स्थळी जाणे टाळत होते.

दरम्यान मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय याने काही लोकांवर घाणेरडे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. माझ्या वडिलांची प्रकृती ठीक नाही, या परिस्थितीचा गैरफायदा काही लोक घेत आहेत. कोलकाता येथे पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही लोकांनी जाणूनबुजून मुकुल रॉय यांना सोबत घेतले आहे. माझे वडील आजारी आहेत आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. अजूनपर्यंत आमचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मला आता बातम्यांमधून समजले की, ते दिल्लीत आहेत. हे क्षुद्र राजकारण असून आमच्याविरोधात कट रचला जात आहे, असा आरोप शुभ्रांशू रॉय यांनी केला.

शुभ्रांशू रॉय हेदेखील काही काळापूर्वी भाजपाचे आमदार होते. २०२१ साली आपल्या वडिलांसमवेत तेदेखील तृणमूल काँग्रेसमध्ये परतले होते. सोमवारी रात्री त्यांचे वडील दिल्लीला जात असल्याचे त्यांना कळले. त्यांनी लगेचच मुकुल रॉय यांना विमानातून उतरविण्यासाठी यंत्रणांची मदत घेतली. पण तोपर्यंत विमानाने उड्डाण केले होते. शुभ्रांशू रॉय यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, “माझे वडील हे डिमेन्शिया आणि पार्किनसन्स या आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांची मनोवस्था ठीक नाही. त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, एका आजारी माणसाला घेऊन राजकारण खेळू नका. माझे वडील दिल्लीला गेल्यामुळे त्यांना घेऊन काही लोक अतिशय हीन दर्जाचे राजकारण करत आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे. जर माझ्या वडिलांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर तो सशक्त मनाच्या व्यक्तीने घेतलेला निर्णय नसेल.”

मुकुल रॉय हे पुन्हा एकदा भाजपामध्ये येणार असल्याचे संकेत भाजपाचे राष्ट्रीय सचिव अनुपम हजरा यांनी दिले आहेत. आपल्या फेसबुकमध्ये त्यांनी बंगाली भाषेत ‘प्रत्याबर्तन’ असे लिहिले आहे. याचा अर्थ होतो पुनरागमन. हजरा यांना त्यांच्या फेसबुक पोस्टविषयी विचारले असता ते म्हणाले की, थोडा वेळ वाट पाहा. एक किंवा दोन दिवसांत सर्व काही स्पष्ट होईल. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून मुकुल रॉय सक्रिय राजकारणात नाहीत. तुम्ही कुणी गेल्या काही दिवसांत पाहिले का? ते विद्यमान आमदार आणि एक मोठे नेते आहेत, यात शंकाच नाही. तृणमूलमध्ये त्यांच्याविषयी आता कुणालाही काळजी वाटत नाही. मी त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त करतो.”

तर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, मुकुल रॉय यांची प्रकृती अनेक दिवसांपासून बरी नाही. आता ते दिल्लीत कशासाठी गेले, हे तेच सांगू शकतील. आम्ही पक्ष म्हणून याबाबत काही बोलू शकत नाही. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी, एवढीच आम्ही प्रार्थना करतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whats up with tmc leader mukul roy in delhi son subhranshu roy says he is unwell kvg