राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाची पार्श्वभूमी असलेले अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पहिले पंतप्रधान. १९६२ साली जेव्हा भारत-चीन युद्ध झाले, तेव्हा वाजपेयी यांना नेहरूवादी समजले जात होते, असा संदर्भ एका नव्या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आला आहे. लेखक अभिषेक चौधरी यांनी आपल्या “Vajpayee – The Ascent of the Hindu Right 1924-1977” या पुस्तकात आचार्य जे.बी. कृपलानी यांचा एक किस्सा लिहिला आहे. वाजपेयी यांनी भारत-चीन युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला नव्हता, यावरून कृपलानी वाजपेयी यांच्यावर नाराज होते. या नाराजीमधून कृपलानी यांनी जाहीर केले की, वाजपेयी हे जनसंघाच्या वेषातील नेहरूवादी आहेत. ७ नोव्हेंबर १९६२ रोजी कम्युनिस्ट वगळून इतर विरोधकांची एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी कृपलानी यांनी स्वतंत्र पक्षाचे नेते मिनू मसानी यांना उद्देशून सांगितले की, “त्या माणसावर (वाजपेयी) अजितबात विश्वास ठेवू नका, तो आमच्यातला नसून नेहरूवादी आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकारणातील सुरुवातीच्या दिवसांतील घडामोडी या पुस्तकात नमूद करण्यात आलेल्या आहेत. लेखकाने पुढे हे स्पष्ट केले की, कृपलानी यांचे हे मत पूर्वग्रहातून आलेले होते. वाजपेयींचे म्हणणे होते, “युद्धाच्या दरम्यान आणि फक्त सहा महिन्यांपूर्वी दोनतृतीयांश बहुमत घेऊन सत्तेवर आलेल्या नेहरूंकडे राजीनामा मागणे हे मूर्खपणाचे, अवास्तव, अवाजवी असे आहे,” अशी नोंद लेखकाने केली आहे. या पुस्तकातून लेखकाने तरुणपणातील वाजपेयी हे नेहरूंचे कौतुक करत असल्याचे समोर आले आहे. “Beloved Nemesis: The Nehru Years” या भागात वाजपेयी आणि नेहरू यांच्या नात्याबाबतचा खुलासा होतो.

हे वाचा >> रवी जाधव अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर बायोपिक बनवणार, पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका

वाजपेयी ३२ व्या वर्षी पहिल्यांदा भारतीय जन संघातर्फे लोकसभेवर निवडून गेले होते, तेव्हा नेहरू यांचे वय वर्षे ६८ होते. वाजपेयी हे प्रतिभावान तरुण असून ते प्रतिगामी विचारांच्या पक्षात असल्याचे नेहरूंना वाटत होते. तथापि, वाजपेयी हे पंतप्रधान होतील असे नेहरूंना कधीही वाटले नव्हते. वाजपेयी १९५७ साली जेव्हा पहिल्यांदा बलरामपूर (आता हा मतदारसंघ दुसऱ्यात विलीन केला आहे) मतदारसंघातून निवडून आले होते. त्या वेळी १५ मे रोजी वाजपेयी यांनी लोकसभेतील पहिल्या भाषणात नेहरूंच्या अनेक धोरणांवर टीका केली होती. यामध्ये काश्मीरशी संबंधित धोरणाचाही समावेश होता.

वाजपेयी आपल्या भाषणात म्हणाले की, आपण सैन्याला पाठवून एकतृतीयांश काश्मीर मुक्त करू शकू का? की आपण काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकायचा? की गोव्यात आपण पोलिसी कारवाई करणार का? मग आपण तेथील आपल्या लोकांना सत्याग्रह करायला लावणार का? आपण गोव्याला पोर्तुगालच्या दयेवर सोडून द्यायचे का? अशा प्रश्नांची सरबत्ती वाजपेयी यांनी नेहरूंवर केली. तसेच या वेळी नेहरू हे सर्व शांतपणे ऐकून घेत होते, असे निरीक्षण पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

पुढच्याच दिवशी, वाजपेयींच्या भाषणासंदर्भात प्रत्युत्तर देताना नेहरूंनी उपहासात्मक उत्तर दिले, “विरोधी पक्षातून नवे नेताजी तयार झाले आहेत. ‘उनके हथियार मुझे जरा बाजारू मालूम हुये…’ त्यांच्या डोक्यात फक्त निवडणूक भरली आहे. त्यामुळे लोकसभेला त्यांनी निवडणुकीची बैठक असल्याचे समजून भाषण केले.”

आणखी वाचा >> “पंतप्रधान मोदी अनेक बाबतींत अकार्यक्षम,” अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांच्या पुस्तकात मोदी सरकारवर आसूड

पंतप्रधान नेहरूंनी १९६० साली संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनासाठी पाठविण्यात येणाऱ्या शिष्टमंडळाच्या यादीत वाजपेयी यांचे नाव समाविष्ट केले होते, अशीही आठवण पुस्तकात सांगितली आहे. तसेच अमेरिकेच्या निवडणुकीत निरीक्षक म्हणूनही वाजपेयी यांनी अमेरिकन सरकारच्या निमंत्रणावर अमेरिकेचा दौरा केला होता. या वेळी न्यू यॉर्क येथे एम के रसगोत्रा यांच्यासोबत वाजपेयी यांचे वास्तव्य होते. रसगोत्रा हे यूएनमध्ये भारताचे अधिकारी म्हणून काम करत होते. रसगोत्रा यांची त्यानंतर भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. नेहरूंच्या कार्यालयाने रसगोत्रा यांना काही सूचना दिल्या होत्या. भारतीय शिष्टमंडळातील जे नेते पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर आले होते, अशा नेत्यांना इतर देशांतून आलेल्या प्रतिनिधींची भेट घडवून देण्यास सांगितले होते. याचा उद्देश असा होता की, या नेत्यांना जगात काय चालले आहे याचा अंदाज यावा. हा प्रसंग सांगत असताना लेखकाने पुस्तकात नमूद केले की, वाजपेयींना नेहरूंची ही कल्पना भावली होती. ज्यामुळे त्यांचा नेहरूंप्रति आदर वाढला. यानंतर दोघांमध्ये सौहार्दाचे संबंध राहिले.

रसगोत्रा आणि वाजपेयी हे दोघेही तेव्हा तिशीत होते, त्यामुळे परदेश दौऱ्यात दोघांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले. तरुण असलेल्या मुत्सद्दी अधिकाऱ्याने पहिल्यांदा खासदारपदी निवडून आलेल्या वाजपेयी आणि शिष्टमंडळाला स्मारके, गॅलरी आणि नाईट क्लबला नेले. वाजपेयींना मात्र यात काहीच रस नव्हता.

वाजपेयींना त्या वेळी नाईट क्लब म्हणजे नेमके काय हे माहीत नव्हते. रसगोत्रा यांनी त्यांना पटवून दिले की, तिथे स्ट्रिप क्लब नाही. “वहाँ नग्न नृत्य नही होता है,” असे रसगोत्रा यांचे वाक्य होते. रसगोत्रा पुढे म्हणाले, “तिथे तुम्हाला आधुनिक जगातले संगीत ऐकायला मिळेल. जॅझ, इन्स्ट्रूमेंटल, स्थानिक संगीत याची मेजवानी असेल.” हे ऐकून वाजपेयी यांना आनंद झाला आणि ते म्हणाले, “चलीये, ये भी एक नई दुनिया है.” रसगोत्रा यांच्यासोबत त्या परदेश दौऱ्यावर काही क्षण एकत्र घालवले असले तरी वाजपेयींनी आपल्या खासगी आयुष्यातील वादळाबाबत कधीही रसगोत्रा यांना माहिती होऊ दिली नाही, असेही या पुस्तकात सांगितले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When atal bihari vajpayee was called nehruvian in jan sanghi garb new book traces their complex relationship kvg