आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याचीच देशात आता उत्सुकता आहे. पुढील सोमवारी होणारा राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि १ तारखेला लेखानुदान सादर झाल्यावर कधीही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याचा अंदाज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी संपुष्टात येत आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा १० मार्चला झाली होती. तसेच ११ एप्रिल ते १९ मे या काळात सात टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान झाले होते. यामुळे नियोजित वेळेनुसार निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. पण यंदा लोकसभा निवडणूक मार्च – एप्रिलमध्येच घेतल्या जातील, अशी चिन्हे आहेत.

हेही वाचा : कोकणात भाजपाची ‘मित्रां’वर दबाव तंत्राची खेळी

पुढील सोमवारी अयोध्येत राममंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त देशभर वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. भाजपने राम मंदिराच्या मुद्दयावर जनतेची मने आणि मते जिंकण्यावर भर दिला आहे. राम मंदिराचा राजकीय लाभ उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राम मंदिरावर वातावरणनिर्मिती झाली असतानाच लोकसभेची निवडणूक झाल्यास त्याचा भाजपला मतांमध्ये फायदा होऊ शकतो. यातूनच अयोध्येतील राममंदिर जनतेसाठी खुले झाल्यावर लगेचच निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येते.

राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यावर लगेचच १ फेब्रुवारीला लोकसभेत लेखानुदान सादर केले जाईल. आगामी निवडणुकीत मतपेरणीसाठी याचा फायदा घेतला जाईल. शेतकरी व विविध घटकांना खुश करण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे. चार महिन्यांच्या खर्चाचे लेखानुदान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मंजूर झाल्यावर लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : उत्तर मुंबईत भाजपचे वर्चस्व मोडून काढणे कठीण, उमेदवाराचीच उत्सुकता

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूर ते मुंबई दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू होत आहे. या यात्रेला कितपत प्रतिसाद मिळतो याकडे भाजपचे बारीक लक्ष असेल. यात्रेला सुरुवातीपासूनच अनपेक्षित प्रतिसाद मिळू लागल्यास भाजपसाठी तो धोक्याचा इशारा असेल. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यास राहुल गांधी यांच्या यात्रेच्या कायर्क्रमावर बंधने येऊ शकतात हे भाजपचे गणित आहे.

इंडिया आघाडीत अद्यापही जागावाटपावर एकमत झालेले नाही. इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधला जाऊ नये, असाच भाजपचा प्रयत्न असेल. कारण एकाक एक लढत झाल्यास काही राज्यांमध्ये भाजपसमोर आव्हान उभे राहू शकते. यातूनच इंडिया आघाडी अधिक भक्कम होण्यापूर्वीच निवडणूक घोषित झाल्यास घाईघाईत जागावाटपावर सहमती घडून येणे शक्य होणार नाही.

हेही वाचा : ‘राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्यास संकोच नको’, जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे नेते करण सिंग यांचा पक्षाला घरचा आहेर

राम मंदिराचा निर्माण होणारा ज्वर लक्षात घेता लोकसभा निवडणूक लवकर जाहीर व्हावी, असाच भाजपचा प्रयत्न असेल. यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will the lok sabha elections 2024 announced in the country print politics news css
Show comments