मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर कुठे दिसत नसल्याने ‘गेले नार्वेकर कुणीकडे’ अशी चर्चा शिवसेनेत सुरू झाली आहे.
शिवसेनेत गेल्या वीस वर्षात प्रत्येक नाराज नेत्याने नार्वेकर यांच्यावर खापर फोडले होते. नार्वेकर हे कोणालाही उद्धव ठाकरे यांना भेटू देत नाहीत, उद्धव ठाकरे यांच्या कानाला लागून त्यांचे मन कलुषित करतात असे आरोप त्यांच्यावर केले गेले. मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटापैकी कोणीही आता बंड करताना मिलिंद नार्वेकर यांचे नावही घेतले नाही. उद्धव ठाकरे यांच्यावरच सर्वांचा टीकेचा रोख होता. त्यामुळे शिवसेनेत कुजबूज सुरू झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना मंत्रालयापासून कटाक्षाने दूर ठेवले होते. गेल्या अडीच वर्षात शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब हेच मुख्यमंत्री ठाकरे यांचे निकटवर्तीय असे चित्र निर्माण झाले होते. आघाडी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात ऑफिसर स्पेशल ड्युटी म्हणून नार्वेकर यांची नियुक्ती होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण उद्धव ठाकरे यांनी त्यास पूर्णविराम दिला. २०२० मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीवेळी आपल्या नावाचा विचार व्हावा अशी मिलिंद नार्वेकर यांची इच्छा समोर आली होती. पण तसे झाले नाही. त्यानंतर विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत सामाजिक कार्य आणि क्रीडा या क्षेत्रातून नाव समाविष्ट व्हावे अशी नार्वेकर यांची इच्छा असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण त्याही वेळी नार्वेकर यांच्या नावाचा विचार झाला नाही.
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध असल्याची नेहमी चर्चा असायची. त्याचबरोबर फडणवीस सरकारच्या काळात नार्वेकर आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही चांगले मेतकूट जमले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार लवकरच विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी यादी अंतिम करणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर केवळ पहिल्या दिवशी मिलिंद नार्वेकर शिंदे यांना सुरतला भेटायला गेल्याचे दिसले. त्यानंतर नार्वेकर कधीच समोर दिसले नाहीत. त्यामुळे गेले नार्वेकर कुणीकडे अशी चर्चा शिवसेनेत सुरू झाली आहे.