कोल्हापूर : अवघ्या महिनाभरातच हसन मुश्रीफ यांचे वाशिम जिल्ह्यावरील पालकमंत्री पदाच्या प्रेमाला उतराई लागली आहे. सर्वसंमतीने घेतलेल्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयावर ‘श्रद्धा, सबुरी’ अशा साईबाबांच्या शब्दात उल्लेख करणाऱ्या मुश्रीफ यांनी पदाचा राजीनामा मंगळवारी दिल्याने त्यांची ‘सबुरी’ (सहनशीलता ) इतक्यातच संपुष्टात आली आहे. आता मुश्रीफ यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे आहे आणि ते कधी मिळणार याची चर्चा होऊ लागली आहे.
पालकमंत्री पद, कोल्हापूर आणि हसन मुश्रीफ यांचे त्रैराशिक त्यांच्या मनासारखे जमताना दिसत नाही. यापुरवी त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. नंतर अहिल्यानगर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु, त्यांना मुख्यत्वे करून कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी पाहिजे होती.
ऑक्टोंबर २०२३ मध्ये हे स्वप्न पूर्ण झाले तेव्हा त्यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि जनतेच्या पाठबळाने मला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवत समाधान व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीनंतर पालकमंत्रीपदाची स्पर्धा सुरू झाल्यावर पुन्हा मुश्रीफ यांच्याकडे हे पद पुन्हा सोपवले जाणार अशी चर्चा रंगली होती. तथापि, प्रकाश आबिटकर या उमद्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावर मुश्रीफ यांनी जिल्ह्यात गेली वीस वर्षे मी मंत्रिपदावर आहे. केवळ १४ महिनेच मला या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले. असे असले तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, अशी प्रतिक्रिया देत अंतरीची सल बोलून दाखवली होती.
नंतर मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. कोल्हापूरपासून सव्वा सहाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटेखानी वाशिम जिल्ह्याची जबाबदारी त्यांना सुरुवातीपासूनच रुचली नव्हती. प्रजासत्ताक दिनी त्यांनी तेथे ध्वजवंदन करून परतीचा मार्ग निवडला होता. त्यांनी तेथे एकही जिल्हा नियोजन वा शासकीय बैठक घेतलेली नाही. त्यांच्या या नाराजीबद्दल शिर्डी येथे पत्रकारांनी विचारणा केली असता ‘ वाशिमचे पालकमंत्रीपद मिळाले ठीक आहे. तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला हा निर्णय आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. आता इलाज नाही, असे नमूद केले होते.
आज त्यांनी वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हापूरची संधी आधीच गेली आहे. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधील या वजनदार नेतृत्वाची नजर कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर असणार याची चर्चा आहे. वाशीम पेक्षाही अधिक अंतरावर असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मुश्रीफ यांनी भूषवले होते. मग वाशिमचे घोडे कशात रुतले याचा राजकीय वर्तुळातून शोध घेतला जात आहे.