राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर मविआतील नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे हरियाणातील विजयानंतर भाजपा नेत्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील नेत्यांना विजयाचा विश्वास असला तरी महाराष्ट्रात नेमका काय निकाल लागेल? याबाबत राजकीय वर्तुळात कुणीही ठामपणे सांगू शकेल, अशी परिस्थिती नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकीय वर्तुळात महाराष्ट्रातील निकालाबाबत दोन मतप्रवाह आहेत. भाजपाने हरियाणात ज्याप्रमाणे शेवटच्या क्षणी विजय मिळवला, तसाच काहीसा चमत्कार महाराष्ट्रातही होऊ शकतो. भाजपा काँग्रेसबरोबर काय करील, हे कुणीही सांगू शकत नाही, असं काहींचं म्हणणं आहे. तर, ‘लाडकी बहीण’ योजनेचा मतदारांवर नक्कीच प्रभाव पडला आहे; पण त्यामुळे निकालात खूप काही बदल दिसून येईल, असं नाही, असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा कायम; उमेदवार जाहीर करून भाजपची प्रचारात आघाडी

खरं तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीनंतर दोन्ही पक्षांविषयी महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट होती. लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४८ पैकी ३० उमेदवार जिंकून आले. हा भाजपासाठी मोठा धक्का होता. मात्र, हीच सहानुभूतीची लाट विधानसभा निवडणुकीतही कायम राहील का? तर याचं उत्तर कुणालाही ठामपणे देता येणार नाही.

महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलं आहे. कारण- उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे असं दुसरं राज्य आहे, ज्याने लोकसभा निवडणुकीत भाजपाला केंद्रातील बहुमतापासून दूर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशातच हरियाणातील विजयानंतर आता भाजपाच्या नेत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. खरं तर हरियाणात विजय मिळाला, तर महाराष्ट्रातही विजय मिळेल, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. कारण- विधानसभा निवडणूक ही त्या-त्या राज्याच्या स्थानिक मुद्द्यांच्या आधारे लढवली जाते. मात्र, तरीही हरियाणाच्या निकालाचा परिणाम थोड्याफार प्रमाणात का होईना महाराष्ट्राच्या निवडणुकीवर नक्कीच होईल, असं मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

हरियाणा निकालाचा भाजपाला झालेला आणखी एक फायदा म्हणजे या निकालामुळे महाराष्ट्रात भाजपाची जागावाटपातील शक्ती वाढली आहे. मध्यंतरी महायुतीच्या सभेत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या त्यागाची आठवण करून दिल्याचे वृत्त होते. आम्ही तुमच्यासाठी मुख्यमंत्री पद सोडलं. आता तुम्ही आमच्यासाठी जास्तीच्या जागा सोडा, असा संदेश देण्याचा प्रयत्नच अमित शाह यांनी केला.

त्याशिवाय भाजपानं हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय समीकरणांकडे लक्ष केंद्रित केलं आहे. हरियाणात जाट मतांविरोधात ओबीसींची मतं एकत्रित करण्यात भाजपाला यश आलं. त्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसींची मतं एकत्रित करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. असं असलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन मराठा चेहरे महायुतीकडे आहे. त्यामुळे मराठ्यांची काही मतंही आपल्याला मिळतील, असा विश्वास भाजपाला आहे.

हेही वाचा – Navya Haridas: प्रियांका गांधींना वायनाडमध्ये तगडं आव्हान; RSS ची पार्श्वभूमी असलेली नव्या हरिदास केरळमध्ये कमळ फुलविणार?

भाजपा हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही अपक्ष उमेदवारांचे कार्ड खेळण्याची शक्यता आहे. हरियाणात अपक्ष उमेदवारामुळे काँग्रेसला १७ जागांवर फटका बसला होता. भाजपाने जम्मू-काश्मीरमध्येही अशाच प्रकारची खेळी केली होती; मात्र तिथे त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. दरम्यान, अशा प्रकारची खेळी महाराष्ट्रात केल्यास यश मिळेल की नाही हे सांगता येत नाही. कारण- महाराष्ट्रात शरद पवार यांच्याकडे अशा प्रकारच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे.

महाविकास आघाडीचा विचार केला, तर काँग्रेस हरियाणातील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेस मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे करायला तयार नाही. त्याशिवाय महाविकास आघाडी मराठा समाजाची मतं आपल्याकडे वळविण्याच्या प्रयत्नात आहेच. त्याशिवाय दलित आणि ओबीसी मतांवरही लक्ष केंद्रित करीत आहे. ही मतं भाजपाकडे जाणार नाहीत, हे पाहण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे.

दुसरीकडे मराठी अस्मिता, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेले उद्योग, शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा आणि बदलापूर प्रकरणानंतर असलेली नाराजी यांचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शरद पवार यांच्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहेत. त्यांच्याइतका अनुभवी नेता महाविकास आघाडीकडे नाही. त्यामुळे ते या निवडणुकीत चाणाक्य ठरतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which factor will be effective in maharashtra assembly elections know in details spb