लक्ष्मण राऊत
जालना : सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी पक्षातून वेगळे होऊन अजित पवार यांनी सवतासुभा निर्माण केल्यावर जालना जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे अस्तित्व कसे राहील, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटना आणि प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वेळेस विधानसभेवर निवडून आलेले विद्यमान आमदार राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. तीन वेळेस निवडून आलेले भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनीही अजित पवार यांना साथ देण्याचे टाळून शरद पवारांच्या सोबत राहण्याचे ठरविले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ. निसार देशमुख आणि एखाद-दुसरा अपवाद वगळता त्यांच्यासोबतचे सर्व प्रमुख पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबतच राहिले. अशा एकूण राजकीय वातावरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्ह्यात पाय रोवणे सोपे काम नव्हते.
सहा महिन्यांपूर्वी अजित पवार गट स्वतंत्र अस्तित्वात आल्यावर राज्यातील अनेक जिल्ह्यांत त्यांच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या होण्यास फार वेळ लागला नाही. जालना जिल्ह्यास मात्र दोन महिन्यांचा कालावधी लागला. काहीशा उशीराने अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांची वर्णी लागली. चव्हाण पूर्वीपासून अजित पवार यांचे समर्थक आहेत. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते बदनापूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. जवळपास चार दशकांपासून राजकारणात असलेले चव्हाण जालना सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती राहिलेले आहेत. जालना बाजार समितीचे उपसभापती, त्याच प्रमाणे अन्य काही सहकारी संस्थात ते पदाधिकारी राहिलेले आहेत. त्यांचे वडील आणि काका हेही आमदार राहिलेले आहेत.शरद पवार यांना मानणाऱ्या नेत्यांचे आणि पक्षाच्या मूळ पदाधिकाऱ्यांचे आव्हानच जालना जिल्ह्यात प्रारंभीच्या काळात होते असे नव्हे तर अन्य पक्षातील प्रभावशाली नेत्यांसमोर अजित पवार यांचा पक्ष कसा उभा करायचा हाही प्रश्न होता.
जिल्ह्यात पाचपैकी तीन विधानसभा सदस्य भाजपचे असून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजीमंत्री बबनराव लोणीकर यांच्यासारखे राजकीय प्रभाव असणारे नेते त्यांच्याकडे आहेत. आमदार कैलास गोरंट्याल (विधानसभा) आणि आमदार राजेश राठोड (विधान परिषद) यांच्यासारखे नेते काँग्रेसकडे आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात स्वत:चे अस्तित्व असणारे अर्जुनराव खोतकर यांच्यासारखे अनुभवी आणि प्रभावी नेते शिवसेनेकडे (एकनाथ शिंदे) आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्ह्यातील अस्तित्वही मोठे आहे. माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हा प्रमुख भास्करराव अंबेकर, शेतकरी नेते लक्ष्मण वडले यांच्यासह अनेक प्रमुख मंडळी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिलेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्यापूर्वी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अंकुशराव टोपे आणि त्यानंतर आमदार राजेश टोपे यांच्या मर्जीतील जवळचे पुढारी म्हणून अरविंदराव चव्हाण यांची प्रतिमा कधीच जिल्ह्याच्या राजकारणात नव्हती. स्व. अंकुशराव टोपे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी जेव्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोडले त्यावेळी त्या पदावर अरविंदराव चव्हाण यांनी सांगितलेला हक्क मान्य झाला नव्हता. एवढेच नव्हे तर पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदावरही त्यांची नियुक्ती होऊ शकली नव्हती. परंतु अशा परिस्थितीत चव्हाण यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क मात्र कायम ठेवला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली तरी जिल्ह्यातील प्रतिकूल राजकीय परिस्थितीत पक्ष संघटनेचे अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. हे आव्हान स्वीकारून त्यांनी वाटचाल सुरू केली.जिल्हा आणि तालुका पातळीवर पक्ष संघटना उभी करताना पदाधिकारी निवडण्याचा मुख्य प्रश्न चव्हाण यांच्यासमोर होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्ह्यातील दोन्ही मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे चव्हाण यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. आता पक्षाच्या संघटनात्मक नियुक्त्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत.
भोकरदन वगळता जिल्ह्यातील अन्य सात तालुक्यांचे अध्यक्ष नियुक्त झाले आहेत. जिल्हा कार्याध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी, महिला राष्ट्र्वादीच्या जिल्हा अध्यक्षा, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष, पक्षाच्या विविध आघाड्यांचे साठ ते सत्तर टक्के अध्यक्ष नियुक्त झाले आहेत. मूळ राष्ट्रवादीमधून कमी मंडळी अजित पवार यांच्यासोबत आली असली तरी त्यांना सोबत घेऊन अन्य पक्षातून आलेल्यांची वर्णी पक्ष संघटनेतील विविध पदांवर लावण्यात आलेली आहे. जालना शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती झालेली आहे. एका राजकीय आव्हानात्मक परिस्थितीत अरविंदराव चव्हाण यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाची जिल्ह्यात वाटचाल सुरू झालेली आहे.