Devendra Fadnavis : सध्या महाराष्ट्राला वेध लागले आहेत विधानसभा निवडणुकीचे. १५ ऑक्टोबरला महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. २० नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. म्हणजेच पुढच्या महिन्याभरात महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल. महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. महायुतीने सरकार आमचंच येईल असा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुती आणि महाविकास आघाडीचे दावे काय?

महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंनी सत्ता आमचीच येईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीला लोकसभेत चांगलं यश मिळालं त्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला आहे. तर ८ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांचे निकाल लागले त्यातल्या हरियाणात भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं आहे. सध्या दिवाळी आहे त्यामुळे अजून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, एकमेकांवरच्या आरोपांचे आपटीबार, दाव्या-प्रतिदाव्यांच्या लवंगी फटाक्यांची माळ हे अजून सुरु व्हायचं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कुठला फटका पाहून कुठला राजकीय नेता आठवतो ते त्यांच्या खास मिश्किल अशा अंदाजाच सांगितलं आहे.

कुणाला कुठल्या फटक्यांची उपमा?

लक्ष्मीबॉम्ब – राज ठाकरे
फुसका लवंगी फटाका- संजय राऊत
फुलबाजी – फुलबाजी सगळेच आहेत, एक काही नाव घेता येणार नाही.
रॉकेट- आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे
भुईचक्र- सगळ्या पक्षांत जे फिरतात ते भुईचक्र, मी एक नाव सांगत नाही.
नाग गोळी-हा लहान मुलांचा फटाका आहे मी नाव घेत नाही पण युवराज.
असं म्हणत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी प्रत्येक नेत्याचं नाव त्या त्या फटाक्याला दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचक उत्तरांचे अर्थ काय असू शकतात?

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिलेली उत्तरं सूचक आहेत. संजय राऊत यांना ते फुसका लवंगी एक फटाका असं म्हणाले आहेत. कारण आपण अशा फटाक्यांना फार महत्त्व देत नाहीत कितीही वाजूदेत ते फुसके असतात असं त्यांना ध्वनित करायचं आहे.

नाग-गोळीची उपमा त्यांनी युवराजांना म्हणजेच अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंना दिली आहे. तसंच हा लहान मुलांचा फटाका आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना राजकारणातला अनुभव येणं अद्याप बाकी आहे हे त्यांना जणू काही सुचवायचं आहे.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार? शरद पवार की उद्धव ठाकरे? फडणवीस म्हणाले, “आम्ही फक्त..”

राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) लक्ष्मी बॉम्ब म्हणाले आहेत. लक्ष्मी बॉम्ब हा धमाका करणारा फटाका म्हणून ओळखला जातो. राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी ही उपमा दिल्याने आता राज ठाकरे निवडणुकीत काय राजकीय धमाका करणार? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी रॉकेटची उपमा दिली आहे. दिवाळीतलं रॉकेट हे कायम लक्ष वेधून घेतं आणि त्याची भरारी आकाशापर्यंत असते. त्या अनुषंगानेच एकनाथ शिंदे यांची कामगिरी असेल असंच जणू काही देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलं आहे.

महाराष्ट्राची राजकीय दिवाळी आणि त्यातले आरोप-प्रत्यारोपांचे फटाके आता खऱ्या दिवाळीनंतर फुटायला सुरुवात होईल. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या छोट्याश्या मुलाखतीत नेत्यांना विविध फटाक्यांची उपमा दिली आहे. त्यामुळे दिवाळीत त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which leader is like laxmi bomb which leader is like rocaket devendra fadnavis gave the answers softnews scj