बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीने दावा केल्याने उमेदवारीची गुंतागुंत वाढली आहे. बुलढाण्यातील वंचितची निर्णायक स्थिती लक्षात घेता, या मागणीमुळे आघाडीतील पेच वाढल्याचे चित्र आहे. बुलढाणा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संवेदनशील व जोरकसपणे आग्रही आहे. गद्दारांना काहीही करून पराभूत करायचेच, असा निर्धार ठाकरे गटाच्या नेत्यांनी वेळोवेळी बोलून दाखविला आहे. ‘मातोश्री’वर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्धार तिखट शब्दात बोलून दाखविण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांचे नाव सुचविले. यामुळे (आघाडीकडूनही) उमेदवारी पक्की असे समजून खेडेकर समर्थकांनी जल्लोष साजरा केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी एका पदाधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना, उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील, असे सांगून जल्लोषातील हवा काढून घेतली.
दुसरीकडे, काँग्रेसने बुलढाण्यासाठी दावा केला असून मागील अनेक महिन्यांपासून जोरदार प्रयत्न चालविले आहे. नऊ नेत्यांनी पक्षाकडे अर्ज केल्याचे सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत उमेदवारीसाठी तीव्र चुरस असतानाच आघाडीत अलीकडे समाविष्ट झालेल्या वंचित बहुजन आघाडीने बुलढाण्यावर दावा करून उमेदवारीची गुंतागुंत वाढविली आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य अशोक सोनोने यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना याला दुजोरा दिला. २०१९ च्या लढतीत ऐनवेळी लढूनही मिळालेली पावणेदोन लाख मते पक्षाची ताकद दर्शविणारी असून पक्षाकडे प्रबळ उमेदवार देखील आहे. यामुळे आम्ही बुलढाण्यासाठी आग्रही असल्याचे ते म्हणाले. सन्मानजनक जागावाटप झाले नाही तर ४८ जागा लढण्याची आमची तयारी असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यामुळे वंचितही बुलढाण्यासाठी आग्रही असल्याचे स्पष्ट होते. परिणामी बुलढाण्याच्या उमेदवारीसाठी आघाडीतील चुरस अधिक तीव्र झाली आहे. बुलढाणा आघाडीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
हेही वाचा : महायुतीत मावळचा तिढा कायम, भाजपच्या दाव्याने शिंदे गटात चलबिचल
‘वंचित’मुळे पेच का?
वंचितचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघावरील दावा सहज खोडून काढणे आघाडी प्रामुख्याने ठाकरे गटासाठी सोपे नाही. याचे कारण मागील तीन (२००९, २०१४, २०१९) लढतीत आघाडीला युतीकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याही अगोदर १९९६ ते २००४ दरम्यान एक लढत वगळता शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत व्हावे लागले. या सर्व लढतीत बसपा, भारिप बमसंमुळे झालेले धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन हा निकालाचा निर्णायक घटक ठरला. २०१९ च्या लोकसभा व विधानसभेत झालेले मतदान (वा विभाजन) आघाडीसाठी घातक ठरले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आघाडीकडून राजेंद्र शिंगणे (३,८८,६९० मते) सारखा प्रबळ नेता मैदानात असताना युतीचे प्रतापराव जाधव (५,२१,९७७) विजयी झाले. निवडणुकीत वंचितला झालेले (१ लाख ७२ हजार ) मतदान आघाडीला मारक ठरले.
हेही वाचा : पंजाबमधील सुखविलास रिसॉर्टचा वाद काय? मुख्यमंत्री मान यांनी शिरोमणी अकाली दल आणि भाजपावर काय आरोप केले?
आघाडीसाठी राजकीय अपरिहार्यता
वंचित व आघाडीच्या मतांची बेरीज युतीपेक्षा कितीतरी जास्त होते. जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघात आघाडीला वंचितचा फटका बसला होता. बुलढाण्यात वंचितला ४२ हजार तर सिंदखेड राजात ४०, जळगाव मध्ये ३० तर खामगावात २६ हजार मते मिळाली. यामुळे अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला वंचितची साथ राजकीय अपरिहार्यता ठरल्याचे मानले जात आहे. ही बाब लक्षात घेतली तर, बुलढाण्यातील उमेदवारीचा पेच आणखी गडद झाला आहे.