नंदुरबार : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या नंदुरबारमधून राहुल गांधी आपल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासाला मंगळवारपासून सुरुवात करणार आहेत. आदिवासींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आदिवासींना आपलेसे करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या यात्रेचे नामकरण भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये येणाऱ्या यात्रेला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे सत्ताधारी भाजपचे अधिक लक्ष राहणार आहे.
स्वातंत्र्यांनंतर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नंदुरबारची ओळख निर्माण झाली. अनेक लाटांमध्ये काँग्रेसचा हा किल्ला मजबुतीने उभा राहिला. माणिकराव गावित यांच्या माध्यमातून काँग्रेसने तब्बल आठवेळा नंदुरबार लोकसभेची जागा ताब्यात ठेवली. त्यामुळेच देशातील निवडणूक प्रचाराचा प्रारंभ काँग्रेसने नंदुरबारमधून करुन यश संपादन केले. इंदिरा गांधीची प्रचार सभा असेल अथवा शहाद्यातून सोनिया गांधींच्या राजकीय कारकिर्दीचे पदार्पण, किंवा आधारसारखा देशातील महत्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी देखील काँग्रेसने नंदुरबारची निवड केली होती.
हेही वाचा… मनसेच्या भविष्यातील राजकीय भूमिकेचे ‘राज’ कायम
२०१४ च्या निवडणुकीत प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधी यांची सभा ऐनवेळी रद्द झाली आणि मोदी लाटेत काँग्रेसचा हा किल्ला ढासळला. नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलले. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी एकदा नंदुरबारमधील सभेतून, नंदुरबारची जागा जेव्हा भाजप जिंकेल, तेव्हाच देशात भाजपची एकहाती सत्ता येईल, असे राजकीय भाष्य केले होते. २०१४ पासून नंदुरबारच्या जागेवर भाजपच्या डॉ. हिना गावित यांचे वर्चस्व आहे. मोदींचा करिष्मा आणि त्याला डॉ. गावित परिवाराच्या राजकीय ताकदीची जोड, यातून भाजपने मागील १० वर्षात जिल्ह्यात आपली पाळमुळे घट्ट केली आहेत.
दुसरीकडे, ज्या नंदुरबार जिल्ह्यावर गांधी घराण्याचे विशेष प्रेम राहिले, त्या नंदुरबारकडे २०१० नंतर गांधी घराण्याचा एकही सदस्य फिरकला नाही. त्यामुळेच की काय तब्बल १४ वर्षानंतर राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये दाखल होत असल्याने आदिवासी समाजात मोठी उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा नंदुरबारमध्ये दाखल होत असल्याने काँग्रेसला उभारी आली आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यात गांधी घराण्याविषयी असलेले आकर्षण कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने थेट या यात्रेचे नाव बदलून नंदुरबारमध्ये भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा असे नामकरण केले आहे. आदिवासी बांधवांना पुन्हा काँग्रेसकडे खेचण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली आहे.
हेही वाचा… सर्वपक्षीय नेतेमंडळींचा घराणेशाहीवर भर! उमेदवारी नातेवाईकांना मिळण्यासाठी आटापिटा
१० वर्षात केंद्रातील मोदी सरकारने कशा पद्धतीने आदिवासी बांधवांचे शोषण केले. धनदांडग्यांना कसा लाभ मिळाला, हे यात्रेतून दाखविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. ही कुठलीही राजकीय फेरी अथवा सभा नसल्याचे नेत्यांकडून एकिकडे स्पष्ट केले जात असतांना दिल्ली आणि राज्यातील बडे नेते त्याच अनुषंगाने सर्व तयारी करतांना दिसून येत आहेत.