सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : महिला बचत गट चळवळीत तसेच स्वच्छता अभियानात ग्रामीण महाराष्ट्रात काम करणारा सर्फराज काझी अस्वस्थ होता. समस्या सोडवायच्या असतील तर लोकांशी बोलावे लागते, हे तो शिकलेला होता, वेगवेगळया कार्यशाळेतून. ‘ भारत जोडो’ यात्रा निघाली तेव्हा त्यात सहभागी करून घ्यावे यासाठी तो काँग्रेसच्या नेत्यांना भेटला. जयराम रमेश यांना तर भेटला, जवळजवळ भांडलाच त्यांच्याशी. सहभागी करून घ्या म्हणून. मग त्याचा भारत यात्री म्हणून सहभाग नक्की झाला. त्याला आता ६० दिवस पूर्ण होत आहेत. तो म्हणतो, ‘देश बदलायचा असेल तर बेरोजगारीचा प्रश्न सुटायला हवा. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारे अनेक लोक या यात्रेत चालताना जागोजागी पाहिली. त्यांची भ्रांत कमी होण्यासाठी बदल व्हायला हवेत. मग त्याची सुरुवात राजकीय व्यवस्थेपासून होत असेल तर ती तेथून करायलाच हवी.’ भारत जोडोमध्ये सहभागी होताना देशभर फिरण्याचा संकल्प होताच. आता ६० दिवसांनंतर तो अधिक दृढ होत आहे, कारण माणसं जोडली जाताहेत. भाषा, संस्कृती वेगवेगळी असली तरी भारतभर एकसमान समस्या आहे. ती म्हणजे बेरोजगारी. पण यात्रेतून भारत कळतो आहे. जर बदल करायचे असतील तर राजकीय व्यवस्था बदलही गरजेचा असल्याची जाणीव वाढताना दिसत असल्याचे सर्फराज सांगताे.
सर्फराज काझी मूळचा उस्मानाबादचा. स्वच्छता अभियानात विभागीय समन्वयक म्हणून काम करणारा. पुढे युनिसेफच्या प्रकल्पातही त्याने अनेक प्रकारची प्रशिक्षणे घेतली. राज्यातील अनेक गावांत तो ग्रामसभाही घ्यायचा. कागदावर रंगवलेले चित्र आणि प्रत्यक्षातील व्यवहार ही दरी कमी करणारा, असा त्याचा स्वभाव. वडील जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वाहनचालक म्हणून काम करायचे. ते वारले तेव्हा घर चालविण्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. पत्नी, दोन मुलं, एक मुलगी आणि सत्तरीच्या घरातील आई असा सारा परिवार. तसे कौटुंबिक उत्पन्न मध्यमवर्गीय. पण भारत जोडोत जाण्याचा संकल्प केला तेव्हा आईला विचारले जाऊ का, त्यांनीही परवानगी दिली. पत्नी म्हणाली, सांभाळते मी सारं. तो गेली ६० दिवस भारत जोडो यात्रेत चालतो आहे. ‘एक नवी ऊर्जा मिळते आहे, तिरंगा खांद्यावर घेऊन जाताना’, तो सांगत होता.
हेही वाचा… राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आज महाराष्ट्रात आगमन
केरळातील तरुण आखाती देशात जाण्याचे प्रमाण खूप आहे. पण तामिळनाडू, कर्नाटकात आता अभियांत्रिकी शिकलेली मुले बेरोजगार आहेत. कुठे तरी ‘डिलेवरी बॉय’ म्हणून काम करत आहेत. ज्या तरुणाचे केवळ पदवीपर्यंतचे पारंपरिक शिक्षण झाले आहे ते तर मजूर आहेत. ग्रामीण भागातील चित्र कमालीचे अस्वस्थ करणारे आहे. दक्षिण भारतातील ६० दिवसांचा भारत जोडो यात्रेत सहभागी झालेला सर्फराजच्या अस्वस्थेत नवी भर पडली आहे. उत्तर शोधायची असतील तर राजकीय व्यवस्थेत बदल व्हायला हवेत असे त्याचे म्हणणे आहे. प्रतिसाद काँग्रेसलाच मिळेल असा दावा नाही, पण तो भाजपच्या बाजूचा नाही, हे मात्र दिसते आहे. या राजकीय निरीक्षणासह तो यात्रेत सहभागी होतो, चालतो.
हेही वाचा… महेश खराडे : रस्त्यावरच्या लढाईतील योध्दा
यात्रेचा दिवस पहाटे ४.३० वाजता सुरू होतो. सहा वाजता चालायला सुरुवात होते. भारत यात्रीमधील काही जणांना राहुल गांधीबरोबर चालण्याची संधी मिळते. तेव्हा काही चर्चाही होते. तेलंगणामध्ये असताना तो राहुल गांधींबरोबर चालला काही वेळ. तेव्हाही थोडीशी चर्चाही झाली, ग्रामीण भागातील समस्यांवर. उत्तर सापडतील. पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, याचा अंदाज भारत यात्रेतून येतो आहे. लोकांमध्ये असणारा उत्साह, स्वागत आपल्या समस्या सुटावी, जगणे सुकर करून देणारा नेता येतो आहे, आपल्या बरोबर चालतो यातून आलेला आहे. त्यामुळे स्वागताने कधी, कधी मनावरचा दबाव वाढतो. जबाबदारीही वाढते. महाराष्ट्रात येताना आईला भेटावे, भावांना मुलांना भेटावे असे वाटते आहे. पण त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली तरी मी ‘ भारत यात्री’ होईन, असे सर्फराज सांगतो. महाराष्ट्रातील दहा यात्री आहेत. त्यातील सहा जण मराठी बोलतात. पण आता नांदेडपासून पुढे जाताना भरपूर मराठी बोलून घेईन. थोडासा दक्षिणी आहार आता कमी होऊन मराठी पदार्थ जेवणात येतील. या यात्रेत भारत कळू लागला आहे नव्याने, असे सर्फराज सांगताे. ‘येत्या काळात निवडणुका होतील तेव्हा मंदिर, हिंदूराष्ट्र, राष्ट्रवाद हे मुद्दे चर्चेत येतील. पण त्यापेक्षाही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या मजुराचा मुद्दा पुढे आला तर बरे होईल. या यात्रेत खांद्यावर सिलेंडर घेऊन आता याचे मी काय करू, असे उज्ज्वलाची टाकी मिरवणारा माणूस मी पाहिला आहे. सहा हजार रुपये प्रतिमहिना कमविणाऱ्याला आपण गॅस दिला, पण तो पुन्हा भरुन घेण्याची ताकद त्याच्याकडे नाही. मजुरांच्या आणि शेतकऱ्यांच्या गरजा सरकारला कळायल्या हव्यात. पण तसे होत नसेल तर राजकीय परिवर्तन व्हायला हवे. त्या बदलाची नोंद दक्षिण भारतात दिसते आहे,’ असे सर्फराजला वाटत आहे.