‘अब की बार, ४०० पार’चा नारा देऊन यंदा भाजपा हा पक्ष लोकसभा निवडणुकीत उतरला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचा ‘४०० पार’चा नारा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ५४३ पैकी २९३ जागांवर विजय मिळवला. इंडिया आघाडीनेही २३३ जागांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आता संसदेत बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची आवश्यकता असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत या पदावर सर्वाधिक काळ राहिलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. यंदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास नरेंद्र मोदी हॅटट्रिक करतील. भारताच्या १४ पंतप्रधानांपैकी सर्वांत जास्त काळ पंतप्रधानपद लाभणार्‍या नेत्यांमध्ये मोदींच्या नावाचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर असणारे कोणते?

पंडित जवाहरलाल नेहरू

पक्ष – काँग्रेस</p>

कार्यकाळ – १९४७ ते १९६४

कालावधी – १६ वर्षे, २८६ दिवस

हेही वाचा: तिहार तुरुंगातून ओमर अब्दुल्लांचा पराभव करणारे राशिद शेख कोण आहेत?

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू १६ वर्षे २८६ दिवस या पदावर राहिले आहेत. त्यांनी १९४७ ते १९६४ देशाचे नेतृत्व केले. आधुनिक भारताच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी अनेक मोठे उपक्रम सुरू केले; ज्यात मोठे उद्योग, धरणे आणि शिक्षण, विज्ञान व विकास या त्रिसूत्रीचा समावेश आहे. या त्रिसूत्रीमुळे देशाने विज्ञान क्षेत्रात प्रगती केली. देशाची वैश्विक प्रतिमा सुधारण्याचे कामही नेहरूंनी केले. भारतातील स्थिर लोकशाहीचे जनक म्हणूनही नेहरूंकडे पाहिले जाते.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू १६ वर्षे २८६ दिवस या पदावर राहिले आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

इंदिरा गांधी

पक्ष – काँग्रेस 

कार्यकाळ – १९६६ ते १९७७, १९८० ते १९८४

कालावधी – १५ वर्षे, ३५० दिवस

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या धाडसी निर्णय आणि फुटीरतावादी धोरणांसाठी प्रसिद्ध होत्या. हरित क्रांती, आणीबाणी (१९७५ ते १९७७) आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण यांसारख्या प्रमुख घटना त्यांच्या कार्यकाळात घडल्या. १९७१ मध्ये अमेरिकेच्या विशेष गैलप जनमत सर्वेक्षणानुसार त्या जगातील सर्वांत लोकप्रिय महिला होत्या. खलिस्तानवादी चळवळीला आळा घालण्यासाठी त्यांनी ऑपरेशन ‘ब्ल्यू स्टार’चा निर्णय घेतला. त्यामुळेच १९८४ मध्ये त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांनी त्यांची हत्या केली.

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

नरेंद्र मोदी

पक्ष – भाजपा

कार्यकाळ – २०१४ ते आतापर्यंत

कालावधी – १० वर्षे १९ दिवस

देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पदभार स्वीकारला. त्यानंतर आता ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. मोदींना देशासह जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यांनी डिजिटलायझेशन, नावीन्यपूर्ण परराष्ट्र धोरण राबवले. २०१९ मध्ये सुरू झालेला पंतप्रधानांचा दुसरा कार्यकाळ जागतिक प्रतिबद्धतेसह पायाभूत सुविधा आणि आर्थिक पुनरुज्जीवन यांवर केंद्रित होता. मोदींनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात आर्थिक विकास, कल्याणकारी धोरणे, हिंदू राष्ट्रवाद यांसारख्या मुद्द्यांनी केली. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९२ जागा जिंकल्या; तर भाजपाने २४० जागा जिंकल्या. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या.

‘एक्स’वर एका पोस्टमध्ये ते म्हणाले, “लोकांनी सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास ठेवला आहे. भारतातील ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. या आपुलकीसाठी मी जनताजनार्दनाला प्रणाम करतो आणि त्यांना आश्वासन देतो की, आम्ही लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दशकात केलेले चांगले काम चालू ठेवू. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी मी त्यांना सलाम करतो. त्यांच्या प्रशंसेसाठी शब्द पुरेसे नाहीत.”

मनमोहन सिंग

पक्ष – काँग्रेस 

कार्यकाळ – २००४ ते २०१४

कालावधी – १० वर्षे चार दिवस

प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी दशकभर पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. जीडीपीमध्ये भारताच्या वाढीला गती देत, आर्थिक बदल घडवून आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांच्या सरकारने शिक्षण हक्क कायद्यासारखे महत्त्वपूर्ण कायदे लागू केले. सिंग यांना त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जाते.

प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी दशकभर पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अटलबिहारी वाजपेयी

पक्ष – भाजप

कार्यकाळ – १९९६, १९९८ ते २००४

कालावधी – सहा वर्षे ८० दिवस

वाजपेयींनी सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. १९९८ मध्ये पोखरण चाचण्यांमुळे त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्याव्यतिरिक्त त्यांनी सुवर्ण चतुर्भुज महामार्ग नेटवर्क यांसारख्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांना सुरुवात केली. त्यांनी १९९९ च्या लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षरी करून शेजारील पाकिस्तानशी संबंध मजबूत करण्याचाही प्रयत्न केला.

वाजपेयींनी सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ४०० पारची घोषणा अन् निकाल ३०० च्या आत; भाजपाचे नक्की काय चुकले?

लोकसभा निवडणूक २०२४

१९ एप्रिल रोजी मतदानाला सुरुवात झाली. १ जूनला अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. नोंदणीकृत मतदारांपैकी ६६ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. परंतु, अपेक्षेपेक्षा कमी जनादेश मिळाल्यामुळे भाजपाला त्यांच्या मित्रपक्षांवर अधिक अवलंबून राहावे लागेल. आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्ष आणि बिहारमधील नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who are indias longest serving prime minister rac
Show comments