२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीचा प्रचार अधिक तीव्र केला आहे. दिग्गज नेत्यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतली असून, उमेदवारांसाठी प्रचार करून मते मागितली जात आहेत. उमेदवारही परिसरात जाऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पश्चिम बंगालमधील हायप्रोफाईल जागांपैकी एक असलेल्या डायमंड हार्बर जागेवर रंजक लढत होणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय(एम)) ने या जागेवरून युवा नेते प्रतिकुर रहमान यांना उमेदवारी दिली आहे. कोण आहेत प्रतिकुर रहमान जाणून घेऊ यात.
कोण आहे प्रतिकुर रहमान?
प्रतिकुर रहमान (३३) हे सध्या सीपीआय(एम) राज्य समितीचे सदस्य आहेत. ते पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे राष्ट्रीय उपाध्यक्षदेखील आहेत. त्यांनी डायमंड हार्बरच्या फकीरचंद कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ते डायमंड हार्बरच्या मतदारसंघाच्या बाहेर आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलीबरोबर राहतात. त्यांचे कुटुंब बांधकाम साहित्य पुरवण्याच्या व्यवसायात आहे. प्रतिकुर रहमान पहिल्यांदाच निवडणूक लढवत नाहीत, तर त्यांनी २०२१ मध्ये डायमंड हार्बरमधून विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्या निवडणुकीत टीएमसीचे उमेदवार पन्नालाल हलदर विजयी झाले होते. प्रतिकुर रहमान ३८,७१९ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते, तर भाजपाचे उमेदवार दीपक कुमार हलदर दुसऱ्या क्रमांकावर होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी सध्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. या जागेवरून ममता यांनी पुन्हा एकदा अभिषेक बॅनर्जी यांना उमेदवारी दिली आहे, तर भारतीय जनता पक्षाने कौस्तब बागची यांना उमेदवारी दिली आहे. डाव्या आघाडीने युवा नेते प्रतिकुर रहमान यांना तिकीट दिले आहे.
“मी कोणत्याही व्यक्तीशी लढत नाही. माझी लढाई ही टीएमसी आणि भाजपाच्या धोरणांविरुद्ध आहे,” असे रहमान यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इंडियन एक्सप्रेसला सांगितले. लोकांच्या अपेक्षा असल्याप्रमाणे नौशाद यांनी येथून निवडणूक लढवली असती तर बरे झाले असते. पण आता लोक म्हणू लागले आहेत की, तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला साथ देऊ, असेही रहमान म्हणाले. मी २०११ मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)शी जोडला गेलो आणि त्यानंतर टीएमसीच्या गुंडांनी माझ्यावर अनेकदा हल्ला केला. ते मला हिंसाचार करून रोखू शकत नाहीत. मी त्यांच्या विरोधात जोरदार लढा देईन,” असेही रहमान म्हणाला.
हेही वाचाः कोल्हापुरात प्रचाराचा धुरळा; हातकणंगलेत वारे थंडच
जाणून घ्या डाव्यांना उमेदवारी देण्यास का उशीर झाला?
सीपीआय(एम)ने यापूर्वी डायमंड हार्बरमधून उमेदवार दिला नव्हता. भारतीय सेक्युलर फ्रंट (ISF) बरोबर युती होईल आणि ISF नेते नौशाद सिद्दीकी या जागेवरून निवडणूक लढवतील, अशी डाव्या आघाडीला आशा होती. डाव्या आघाडीने ISF उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु महाआघाडीपासून फारकत घेतल्यानंतर ISF ने पश्चिम बंगालमधील सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेस आणि डाव्या आघाडीने मिळून प्रतिकुर रहमान यांना टीएमसीचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात उभे केले.