Punjab AAP MLA Gurpreet Gogi dies : पंजाबमधील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत सिंह गोगी यांचा शुक्रवारी रात्री गोळी लागून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत यांच्याकडे परवानाधारक बंदूक होती. शुक्रवारी रात्री ते आपल्या राहत्या घरी बंदूक साफ करत होते. त्यावेळी अचानक बंदुकीतून गोळी सुटली आणि थेट गुरप्रीत यांच्या डोक्याला लागली. यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
कोण होते गुरप्रीत सिंह गोगी?
गुरप्रीत सिंह गोगी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर लुधियाना पश्चिम मतदारसंघातून गुरप्रीत यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार भारतभूषण आशू यांचा पराभव केला. गुरप्रीत सिंह यांची विंटेज प्रेमी म्हणून ओळख होती. जुनी शस्त्रे आणि आलिशान कार यासारख्या महागड्या वस्तूंची त्यांना आवड होती. गुरप्रीत यांच्याकडे जुन्या तसेच नवीन लक्झरी कार, दुचाकींसह अनेक प्राचीन वस्तूंचा संग्रह होता.
‘विंटेज’ वस्तूंच्या खरेदीची होती आवड
२०२२ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर गुरप्रीत यांनी द इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, “मला लहानपणापासूनच ‘विंटेज’ वस्तू आवडतात. राजकारणात आल्यानंतरही मी माझा छंद जोपासलेला आहे. माझ्याकडे एक बंदूकगृह असून त्यामध्ये जुन्या आणि नवीन दोन्ही बंदुका आहेत. माझ्याकडे सर्व प्रकारच्या शस्त्रांचा मोठा संग्रह आहे. मला आलिशान कारचा खरेदी करण्याची आवड आहे. माझ्याकडे मारुती ८०० पासून ते अॅम्बेसडर आणि मर्सिडीज कारपर्यंत सर्व प्रकारची वाहनं आहेत. याशिवाय जुनी नाणी, टपाल तिकिटं इत्यादींचा संग्रह करण्याचा देखील मला छंद आहे.
स्कूटरवरून भरला होता विधानसभेचा अर्ज
गुरप्रीत सिंह हे अनेकदा त्यांच्याकडील असलेल्या रंगीबेरंगी कारमुळे चर्चेत आलेले आहेत. २०२२ मध्ये विधानसभेचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी ते जुनी पांढऱ्या रंगाची स्कूटर घेऊन आले होते. ही स्कूटर माझ्यासाठी किमयागार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. गेल्या महिन्यात गुरप्रीत यांच्या पत्नी सुखचैन बस्सी यांनी लुधियानामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरप्रीत याच स्कूटरवरून आले होते.
मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील सुखचैन यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. मात्र, तरीही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. गुरप्रीत सिंह गोगी यांच्याकडे असलेल्या आलिशान कारमुळे अनेकदा वादही निर्माण झाला. २०२२ मध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गुरप्रीत हे अलिशान पोर्श कारमधून एका सभेला आले होते. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केली. आपचे आमदार खरोखरच ‘आम आदमी’ आहेत, असा टोला विरोधकांनी लगावला होता.
गुरप्रीत यांच्याकडे कोट्यवधींची वाहने
गुरप्रीत यांनी आपला छंद कधीच इतरांपासून लपवून ठेवला नाही. “मला आलिशान वाहने खरेदी करायला आवडतात, मी नेहमीच न चुकता आयकर भरतो”, असं ते निर्भिडपणे सांगत. “विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी ज्या स्कूटरवर आलो होतो, ती स्कूटर मला माझ्या आईने भेट दिली होती. जोपर्यंत मी लोकांसाठी काम करतो आहे, तोपर्यंत मला अजिबात निराशा येणार नाही. मी अॅम्बेसडर कारने प्रवास करतो की पोर्श कारने ते महत्वाचे नाही”, असंही गुरप्रीत म्हणाले होते. २०२२ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुरप्रीत यांनी त्यांच्याकडे २० कोटी ७० लाख रुपयांची ७ वाहने आणि ३ लाख रुपयांची शस्त्रे असल्याची माहिती दिली होती.
कारच्या क्रमांकावरून विरोधकांनी केलं होतं लक्ष्य
दरम्यान, गुरप्रीत यांच्याकडे ०००१ हा खास क्रमांक असलेली गाडी होती. यावरून लुधियानाचे केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. गुरप्रीत सिंग स्वत:ला ‘आम आदमी’चा सेवक असं म्हणतात. मग त्यांनी इतका महागडा गाडीक्रमांक मिळवलाच कसा? असा प्रश्न रवनीत सिंग यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गुरप्रीत सिंह म्हणाले होते की, “आम आदमी पार्टीचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मला हा नंबर मिळाला नाही. माझ्याकडे तो अनेक दशकांपासून आहे. ज्या गोष्टींबद्दल केंद्रीय मंत्र्यांना काहीच माहिती नाही त्याबद्दल त्यांनी गप्प बसावे.”
‘आप’ सरकारविरोधातही उठवला होता आवाज
गुरप्रीत सिंह यांनी ‘आप’ सरकारविरोधातही अनेकदा आवाज उठवला होता. पंजाबमधील अपूर्ण विकासकामांवरून त्यांनी सरकावर जाहीरपणे टीका केली होती. ऑगस्ट महिन्यात लुधियानाच्या प्रदूषित बुढा नाल्याच्या स्वच्छतेवरून गुरप्रीत यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. “मी दररोज नाल्याजवळून जातो आणि त्यातील घाण बघतो, याची मला लाज वाटते. सत्तेत आल्यानंतर आम्ही नाल्याची साफसफाई करू, असे आश्वासन मतदारांना दिले होते. मात्र, ‘आप’ सरकार ते पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. नोकरशाहीचा विजय असो”, असं ते म्हणाले होते.
हेही वाचा : Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?
गोळी लागण्यापूर्वी गुरप्रीत कुठे होते?
दरम्यान, गोळी लागून मृत्यू होण्याआधी काही तास गुरप्रीत यांनी राज्यसभा खासदार बलबीर सिंग सीचेवाल आणि पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंह संधवान यांच्याबरोबर बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी बुढा नाल्याच्या साफसफाईबाबत चर्चा केली होती. पंजाबमधील सर्वसामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन गुरप्रीत यांनी आप सरकारविरुद्धच्या आंदोलनांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावली होती. बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी लुधियानातील १० दुकानांना सील ठोकलं होतं. यानंतर गुरप्रीत यांनी आक्रमक होत सर्वांसमोर या दुकानांचे कुलूप तोडलं होतं. यावरून विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं होतं.
विरोधकांनी केलं होतं लक्ष्य
आमदार गुरप्रीत सिंह हे स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे मानतात, अशी टीका विरोधकांनी केली होती. दरम्यान, यावर स्पष्टीकरण देताना गुरप्रीत म्हणाले होते की, “व्यापाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांची दुकानं सील केली. हा त्यांच्यावर अन्याय असून आम्ही हे अजिबात सहन करणार नाही.” १९९६ मध्ये गुरप्रीत यांनी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २००२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लुधियाना महानगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यानंतर ते चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. गुरप्रीत हे काँग्रेसचे लुधियानाचे जिल्ह्याध्यक्ष राहिले आहेत.
गुरप्रीत सिंह गोगी यांचा राजकीय प्रवास
काँग्रेसमध्ये दोन दशकांहून अधिक काळ घालवल्यानंतर २०२२ च्या पंजाब निवडणुकीपूर्वी गुरप्रीत यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. चांगले काम करूनही काँग्रेसच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक माझ्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप त्यांनी केला होता. लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गुरप्रीत सिंह यांनी माजी काँग्रेस मंत्री आणि दोन वेळा आमदार राहिलेले भारत भूषण आशु यांचा ७०० मतांनी पराभव केला होता. विधानसभेत सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे गुरप्रीत अचानक निघून गेल्याने लुधियानामध्ये शोककळा पसरली आहे.