केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यानंतर, भाजपने राजस्थानमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुननराम मेघवाल यांची नावे नाहीत. इतकेच नव्हे तर वसुंधरा राजेंचाही समावेश झालेला नाही. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात भाजपकडून कोण, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

मध्य प्रदेशमध्ये तिसऱ्या यादीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना उमेदवारी दिली गेली, तसे कदाचित वसुंधरा राजेंबाबतीत होण्याची शक्यता आहे. त्यांना अखेरच्या क्षणी निवडणूक लढवण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे राजस्थान भाजप वसुंधरा राजेंच्या नेतृत्वाखाली लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट, खासदार दिया कुमारी यांना अधिक महत्त्व दिले जाऊ लागल्याचे दिसते.

हेही वाचा – ‘भाजपाच्या निरोप समारंभाची वेळ झाली’, निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होताच खरगेंची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीरसभांमध्ये दिया कुमारींची उपस्थिती नजिकच्या भविष्यातील नेतृत्वाचे संकेत असल्याचे सांगितले जाते. राजस्थानमध्ये सात खासदारांना उमेदवारी देण्यात आली असून त्यामध्ये दिया कुमारींचा समावेश आहे. त्या जयपूरमधील विद्याधर नगर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतील. वसुंधरा राजेंच्या एकहाती नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी मोदी-शहांनी पक्षामध्ये नवी फळी उभारली असून त्यामध्ये दिया कुमारींही आहेत. वसुंधरा राजेंना बाजूला करताना एकमेकांशी स्पर्धा करणारे अनेक नेते तयार झाले आहेत. गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, राज्यवर्धन राठोड, करोडीलाल मीणा, सी. पी. जोशी हे सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आहेत. पण, यापैकी एकही नेता काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी स्वबळावर मुकाबला करू शकत नाही. त्यामुळे राजस्थानची निवडणूक भाजपला मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याविना लढवावी लागत आहे.

काँग्रेसने मात्र राजस्थानची निवडणूक पूर्णपणे अशोक गेहलोत यांच्याकडे सोपवलेली आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी राहुल गांधींनी पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित होते. तिथे राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत यांचे विशेष कौतुक केले. गेहलोत यांनी राजस्थानमध्ये राबवलेली आरोग्य योजना देशभर लागू केली पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीवरून गेहलोत आणि गांधी कुटुंबाचे संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. पण, आता गेहलोत यांनी राजस्थान काँग्रेसवर पूर्ण ताबा मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – केसीआर दोन जागांवर निवडणूक लढवणार, पण नेमकं कारण काय?

पाचही विधानसभा निवडणुकीत ओबीसी जनगणना हा काँग्रेसचा प्रचारातील प्रमुख मुद्दा असून राजस्थानमध्ये ओबीसी मते निर्णायक ठरतील. राजस्थानमध्ये गुज्जर, अहिर या काही ओबीसी जाती प्रभावी आहेत. बिहारच्या जातनिहाय जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध होताच गेहलोत यांनी राजस्थानमध्ये जातनिहाय जनगणनेचा आदेश दिला. कार्यकारिणीच्या बैठकीत अधिकृतपणे शिक्कामोर्तब होण्याआधी गेहलोत यांनी ओबीसीचे कार्ड खेळले! पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे सगळे गेहलोत यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना दिसतात. गेल्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष म्हणून सचिन पायलट अधिक सक्रिय होते. पण, यावेळी चित्र पूर्ण बदललेले असून गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली पायलट यांना स्वतःचे अस्तित्व टिकवावे लागत आहे. आता तेही गेहलोत यांचे कौतुक करत आहेत.

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्याकडे एकहाती निवडणूक लढवण्याची क्षमता आहे, तशीच ती राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्याकडेही आहे. काँग्रेसच्या केंद्रातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होतील पण, निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापक गेहलोत यांच्याकडे असेल. परंपरा मोडून राजस्थानच्या मतदारांनी काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली तर सगळे श्रेय गेहलोत यांच्याकडे जाईल. भाजपमध्ये राजस्थान जिंकून देण्याची जबाबदारी मात्र फक्त मोदींवर असेल.

Story img Loader