लोकसभेत भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहजुन समाज पार्टीचे खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली. तसेच दानिश अली यां उग्रवादी, दहशतवादी असे म्हणत त्यांना बाहेर फेका असेही रमेश बिधुरी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस तसेच विरोधातील सर्वच पक्षांनी बिधुरी यांच्या विधानावर आक्षेप घेतला असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर दानिश अली कोण आहेत? हे जाणून घेऊ या…
विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय
दानिश अली हे सध्या बहुजन समाज पार्टीचे खासदार आहेत. विद्यार्थी दशेपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. ते जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. २०१७ साली काँग्रेस-जेडीएस या पक्षांच्या युतीदरम्यान ते देशभरात चर्चेत आले होते. कर्नाटक राज्यात काँग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांना निवडणुकीनंतर एकत्र आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जेडीएस पक्षाचे प्रमुख एचडी देवेगौडा यांनीदेखील दानिश अली यांच्यावर त्यावेळी पूर्ण विश्वास ठेवला होता. युती झाल्यानंतर या दोन्ही पक्षांनी पाच सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली होती. या समितीच्या संयोजकपदी दानिश अली यांना नियुक्त करण्यात आले होते. मात्र जेडीएस-काँग्रेस पक्षाची ही युती फार काळ टिकली नाही.
२०१९ साली भाजपाच्या उमेदवाराला केले पराभूत
२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत दानिश अली हे उत्तर प्रदेशमधील अमरोहा या मतदारसंघातून बसपा पक्षाच्या तिकिटावर उभे राहिले होते. त्यावेळी जेडीएस पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या संमतीनेच मी बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे, असे दानिश अली म्हणाले होते. २०१९ साली ते पहिल्यांदाच खासदारकीची निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत त्यांनी तब्बल ६३ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. ही जागा जिंकण्यासाठी भाजपाने जोरदार प्रचार केला होता. मात्र तरीदेखील अली यांनी भाजपाचे तत्कालीन खासदार कुवंरसिंह तन्वर यांना पराभूत केले होते.
बसपा पक्षाचे अल्पसंख्याक समाजाचे नेते म्हणून ओळख
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना दानिश अली हे युवा जनता दल या संघटनेचे तसेच छात्र जनता दल या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. ते सध्या बसपा पक्षात आहेत. या पक्षात मायावती यांचा शब्द अंतिम असतो. असे असले तरी दानिश अली वेळोवेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका घेत आलेले आहेत. बसपा पक्षात प्रवेश करताच अगदी कमी काळात राष्ट्रीय राजकारणात बसपा पक्षाचे अल्पसंख्याक चेहरा म्हणून ते उदयास आले.
एक देश एक निवडणूक धोरणावर टीका
भारत सरकार लवकरच देशात एक देश एक निवडणूक धोरण राबवणार आहे, असे म्हटले जाते. त्या दृष्टीने सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारच्या या धोरणावर दानिश अली यांनी कठोर टीका केली होती. “आता भाजपाकडे बोलण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी आता एक देश एक निवडणूक हे धोरण आणले आहे. ते एक देश एक धर्म, एक देश एक नेता, एक देश एक उद्योगपती असे धोरण राबवून देश चालवू पाहात आहेत का? संविधानाला हात लावल्यास ते सत्तेत राहू शकणार नाहीत,” असे दानिश अली म्हणाले होते.
भर कार्यक्रमात भाजपाच्या आमदाराशी वाद
या वर्षातील ऑगस्ट महिन्यातही दानिश अली चर्चेत आले होते. अमरोहा रेल्वे स्थानकाच्या अपग्रेडेशन शुभारंभाच्या एका कार्यक्रमात त्यांचा भाजपाचे आमदार हरीसिंह धिल्लन यांच्याशी वाद झाला होता. मंचावरून बोलताना धिल्लन यांनी ‘भारत माता की जय’ असा नारा दिला होता. याच नाऱ्यावर आक्षेप घेत, हा भाजपाचा कार्यक्रम नाही, असे दानिश अली म्हणाले होते. अली यांच्या या भूमिकेनंतर कार्यक्रमस्थळी चांगलाच गोंधळ उडाला होता. खाली बसलेल्या प्रेक्षकांनी नारेबाजी केली होती. या घोषणाबाजीनंतर धिल्लन आणि दानिश अली यांच्यात चांगलाच वाद झाला होता. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्य़ात कैद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली होती.
दानिश अली यांच्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव
या वादावर बोलताना, भाजपाचे नेते शासकीय कार्यक्रमाचे रुपांतर पक्षाच्या कार्यक्रमात करतात. यालाच मी विरोध केला, असे दानिश अली म्हणाले होते. हा वादाचा प्रसंग नंतर उत्तर प्रदेशच्या विधिमंडळातही उपस्थित करण्यात आला होता. भाजपाने विधानसभेत दानिश अली यांच्या निषेधाचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव विधानसभेच्या अध्यक्षांनी मंजूर केला होता.
मायावती यांनी केली कारवाईची मागणी
दरम्यान, भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बिधुरी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “भाजपाच्या खासदारने केलेले विधान फारच दु:खद आणि दुर्दैवी आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी हे विधान नोंदीतून काढून टाकले आहे. भाजपाचे नेते आणि मंत्र्यांनी याबाबत माफी मागितली आहे. तरीदेखील पक्षाने त्यांच्यावर अद्याप योग्य ती कारवाई केलेली नाही,” असे मायावती म्हणाल्या.