या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक कलाकारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना विविध पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रणौतचाही समावेश होता. भाजपाकडून निवडणूक लढवणाऱ्या कंगनाचा हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघामध्ये विजय झाला. मात्र, तिच्या विजयाचा आनंद अद्याप संपलेला नसतानाच आता हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयामध्ये तिने लढवलेल्या निवडणुकीविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. किन्नौरमधील एका रहिवाशाने तिने लढवलेल्या निवडणुकीविरोधात याचिका दाखल केली असून न्यायालयाने तिला उत्तर देण्यास सांगितले आहे. हिमाचल उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगनाला २१ ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला आहे.
हेही वाचा : Budget and BJP : भाजपाने जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने बजेटमध्ये किती उतरली?
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने कंगना रणौतला नोटीस का बजावली?
लायक राम नेगी यांनी ही याचिका दाखल केली आहे. नेगी हे वन विभागाचे माजी कर्मचारी असून किन्नौरचे रहिवासी आहेत. कंगना रणौतचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. नेगी म्हणतात की, त्यांना निवडणूक लढवायची होती; पण मंडीमधील निवडणूक अधिकाऱ्याने त्यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने नाकारला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला असता तर त्यांचा विजय झाला असता, असा युक्तिवाद नेगी यांनी केला आहे. या याचिकेत लायक राम नेगी यांनी कंगनाची निवडणूक रद्द करावी, अशी विनंतीही न्यायालयाला केली आहे. नेगी यांनी या याचिकेच्या माध्यमातून मंडीच्या जागेवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यालाही पक्षकार केले आहे.
मंडीतून रणौतच्या निवडणुकीला आव्हान देणारे लायक राम नेगी कोण आहेत?
नेगी हे वनविभागाचे माजी कर्मचारी असून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांनी १४ मे रोजी निवडणुकीचा अर्ज सादर केला होता आणि इतर सर्व कागदपत्रे १५ मे रोजी सुपूर्द केली होती. नेगी पुढे म्हणाले की, नामांकनादरम्यान त्यांना असे सांगण्यात आले होते की, त्यांनी वापरलेल्या सरकारी निवासामध्ये वीज, पाणी आणि टेलिफोनचे कोणतीही थकीत बाकी नाही, असे प्रमाणपत्र द्यावे लागेल. हे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना दुसऱ्या दिवशीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे कागदपत्रे दिली असता, त्या अधिकाऱ्याने ती स्वीकारण्यास नकार देत उमेदवारी नाकारली. आपला अर्ज स्वीकारला गेला असता तर आपण निवडणूक जिंकू शकलो असतो, असा दावाही नेगी यांनी आपल्या याचिकेद्वारे केला. त्यामुळे ही निवडणूक रद्द ठरवण्यात यावी, अशी मागणीही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
तगडे आव्हान असतानाही जिंकली निवडणूक
मंडी या जागेवरून काँग्रेसने कंगना रणौतच्या विरोधात विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली होती. विक्रमादित्य सिंह हे हिमाचल प्रदेशचे तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दिवंगत वीरभद्र सिंह आणि विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांचे सुपुत्र आहेत. हे कुटुंब बुशहर राजघराण्याचे वंशज आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, कंगना रणौतने मंडी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांच्या विरोधात ७४,७५५ मतांनी विजय मिळवला होता. कंगनाला ५,३७,००२ मते मिळाली, तर विक्रमादित्य सिंह यांना ४,६२,२६७ मते मिळाली.