Sujata Karthikeyan Takes Voluntary Retirement : माजी आयएएस अधिकारी आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते नवीन पटनायक यांचे जवळचे सहकारी व्हीके पांडियन यांच्या पत्नी आणि वरिष्ठ अधिकारी सुजाता कार्तिकेयन यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. दोन आठवड्यांपूर्वी केलेल्या कार्तिकेयन यांच्या अर्जाला केंद्राने शुक्रवारी मंजुरी दिली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.
२००० च्या बॅचच्या ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी कार्तिकेयन या बीजेडी सरकारच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावशाली अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जात. त्यांचे पती पांडियन यांनीही ऑक्टोबर २०२३ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन महिन्याभरात बीजेडीमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढलेल्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीचा पराभव झाला अन् भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केली.
सुजाता कार्तिकेयन बीजेडीच्या एजंट, भाजपाचा दावा

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

दरम्यान, सुजाता कार्तिकेयन या बीजेडीच्या एजंट असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानुसार, निवडणूक आयोगाने दखल घेत त्यांची पदावनती करत कमी प्रभावशाली पदावर त्यांची बदली करण्यात आली. तर, ओडिशावर दोन दशकांहून अधिक काळ राज्य केल्यानंतर बीजेडीने सत्ता गमावल्यानंतर, पक्षाच्या आत आणि बाहेरून दबावाला तोंड देत कार्तिकेयन यांचे पती पांडियन यांनीही सक्रिय राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, मुलीच्या शिक्षणासाठी कार्तिकेयन यांनी सहा महिन्यांसाठी बालसंगोपन रजा घेतली होती. ही रजा आणखी सहा महिन्यांनी वाढवण्याकरता त्यांनी अर्ज केला. परंतु, वाढीव रजा त्यांना नाकारण्यात आल्याने त्यांना गेल्या नोव्हेंबर २०२४ मध्ये पुन्हा कर्तव्यावर रुजू व्हावे लागले. तर दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी खासगी कारण देत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. निवृत्तीच्या वेळी त्या राज्याच्या वित्त विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे.

दोन जिल्ह्यांचे भुषवले जिल्हाधिकारीपद

४९ वर्षीय सुजाता कार्तिकेयन ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील बलुरिया गावच्या आहेत. त्यांनी काही काळ जमशेदपूरमध्ये घालवला, जिथे त्यांचे वडील डॉक्टर म्हणून काम करत होते. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये आयएएस प्रशिक्षणादरम्यान त्यांची भेट पांडियन यांच्याशी झाली. कार्तिकेयन यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कटक आणि सुदरगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.

कोण आहेत सुजाता कार्तिकेयन?

सुजाता कार्तिकेयन या लेडी श्रीराम कॉलेजच्या टॉपर होत्या. तसंच, त्यांनी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय येथून आंतरराष्ट्रीय राजकारण (International Politics) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. आयएएस अकादमीत त्या गोल्ड मेडलिस्ट होत्या. तर, माओवादी प्रभावित असलेल्या सुदरगढ येथे त्या जिल्हाधिकारी राहिल्या आहेत. त्यांनी या भागात शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल देण्याची योजना आणली होती. त्यानंतर संपूर्ण ओडिशामध्ये शिक्षणात मुलींचं प्रमाण वाढलं होतं.

बीजेडी सरकारच्या काळात, कार्तिकेयन यांना ७० लाख ग्रामीण महिलांशी संबंधित सर्वोच्च प्राधान्य प्रकल्पांपैकी एक असलेल्या मिशन शक्ती उपक्रमाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी प्रथम विभागाच्या संचालक म्हणून काम केले आणि त्यानंतर जून २०२१ मध्ये त्यांना विभागाच्या सचिव म्हणून बढती देण्यात आली. नोव्हेंबर २०२३ मध्ये, कार्तिकेयन यांना ओडिया भाषा, साहित्य आणि संस्कृती विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. फेब्रुवारी २०२४ मध्ये जागतिक ओडिया भाषा परिषदेचे आयोजन करण्याच्या सरकारच्या निर्णयाला लक्षात घेऊन ही पोस्टिंग करण्यात आली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is ias bureaucrat sujata karthikeyan once a powerful odisha bureaucrat sgk