२२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याला लाखो रामभक्तांनी हजेरी लावली. या सोहळ्यासाठी काही मुस्लिम नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. परंतु, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००९ पासून ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन (एआयआयओ)चे मुख्य इमाम इलियासी यांना २१ कोटी भारतीय मुस्लिमांचे मार्गदर्शक मानले जाते. इमाम संघटनेचा जागतिक चेहरा म्हणूनही त्यांना ओळखले जाते. सर्व आंतरधर्मीय संवादाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर ते संघटनेचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. इमाम इलियासी यांनी असा दावा केला आहे की, अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर यूट्युब चॅनेल चालविणारे मुफ्ती साबीर हुसेन यांनी त्यांच्याविरोधात फतवा काढण्याची मागणी केली.

जीवे मारण्याच्या धमक्या

मुख्य इमाम पदावरून काढून टाकण्यासाठी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आणि फोन कॉल येत असल्याचा आरोपही इलियासी यांनी केला आहे. त्यांचा मुलगा सुहैबच्या म्हणण्यानुसार, मौलवी यांना २०१६ पासून सरकारने वाय+ सुरक्षा प्रदान केली आहे.

इलियासी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, ते त्यांचा ‘पैघम-ए-मोहब्बत (प्रेमाचा संदेश)’ व्यक्त करण्यासाठी अभिषेक सोहळ्याला उपस्थित होते. “आपण सर्वप्रथम मानव आहोत. जर एखादी व्यक्ती चांगली असेल, तरच ती एक चांगली मुस्लिम किंवा चांगली हिंदू असू शकते. लोकांच्या जाती वेगवेगळ्या असू शकतात. त्यांच्या उपासनेचे प्रकार वेगळे असू शकतात. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असू शकते. परंतु, सर्वांत श्रेष्ठ धर्म मानवता आहे,” असे ते म्हणाले.

इलियासी यांनी असेही सांगितले की, ते राष्ट्राप्रति असलेले आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी राम मंदिर सोहळ्यास उपस्थित होते. “देशाने खूप काही दिले आहे म्हणून आपणही देशाला काहीतरी परत दिले पाहिजे. आपण हिंदू किंवा मुस्लीम ही आपली ओळख बनवू नये. त्याऐवजी स्वतःला प्रथम भारतीय म्हणून ओळखावे. आपण सर्व जण मिळून आपला देश मजबूत केला पाहिजे.” “मी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गेलो होतो असे म्हणणे चुकीचे आहे. मी राष्ट्रीय हित आणि जातीय सलोखा जपण्यासाठी गेलो होतो,” असेही त्यांनी संगितले. इलियासी यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला असला तरी यात काहीच कायदेशीर नसल्याचे त्यांनी संगितले. भारत इस्लामिक देश नसल्यामुळे याची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

इलियासी यांचे भाजपा आणि संघ परिवाराशी घनिष्ठ संबंध

इलियासी यांचे भाजपा आणि संघ परिवाराशी घनिष्ठ संबंध आहेत. २०१५ मध्ये मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून इलियासी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेक प्रसंगी संवाद साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली आहे. सद्गुरू म्हणून ओळखले जाणारे जगदीश वासुदेव आणि श्री श्री रविशंकर यांसारख्या आध्यात्मिक गुरूंच्याही त्यांनी भेटी घेतल्या आहेत.

२०१५ मध्ये पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबद्दल इलियासी म्हणाले होते, “आम्ही पंतप्रधानांना सांगितले की, ते ‘मन की बात’ बोलत असताना आम्ही त्यांना आमची ‘दिल की बात’ सांगण्यासाठी आलो आहोत. ते ‘मेक इन इंडिया’बद्दल बोलत असताना आम्ही भारताला काही लोक संपविण्याबद्द्ल बोलत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी ते आम्हाला म्हणाले, “मी तुम्हाला माझा शब्द देतो. तुम्ही रात्री १२ वाजता जरी माझे दार ठोठावले तरीही मी प्रतिसाद देईन. प्रत्येक भारतीयासाठी मी स्वतः जबाबदार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.”

जून २०१६ मध्ये इलियासी यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटण्यासाठी गेलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा कर्मचार्‍यांच्या हत्येमुळे नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी इलियासी यांनी शांततेचे आवाहन केले होते. “काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आम्ही राजनाथ सिंह यांना भेटलो आहोत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आमची इच्छा आहे,” असे ते म्हणाले होते.

सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांना भेटलेल्या अनेक मुस्लिम विचारवंतांमध्ये इलियासी यांचा समावेश होता. बैठकीनंतर त्यांनी भागवत यांचा ‘राष्ट्रपिता’, असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

संघाच्या मुस्लिम विचारवंतांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे (एआयएमपीएलबी) सदस्य कासिम रसूल इलियास यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते की, जर भागवत आणि संघाला खरोखर मुस्लिम समाजापर्यंत पोहोचायचे असेल, तर त्यांनी संघटनांशी संपर्क साधायला हवा; ज्यांचा प्रत्यक्षात आपल्या समाजावर प्रभाव आहे. जसे की, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलेमा-ए-हिंद किंवा जमात-ए-इस्लामी.

हेही वाचा : लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न : राम जन्मभूमी आंदोलनातील आडवाणींची निर्णायक भूमिका भाजपासाठी कशी ठरली टर्निंग पॉइंट?

इलियासी यांच्यावर त्यांच्याच समाजातील सदस्यांकडून आजवर अनेक आरोप झाले आहेत. मुस्लिम संघटनांमधील अनेक सदस्यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, इलियासी यांचे समाजात छोटे स्थान आहे. काहींचा आरोप आहे की, इलियासी हे मान्य इस्लामी विद्वान नाहीत. तर इतर काहींचे आरोप आहेत की, ते केवळ फायद्यासाठी सरकारचे समर्थन करतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is imam umer ahmed ilyasi who caught in fatwa for attending ram mandir event rac