कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते जगदीश शेट्टर यांनी आज (दि. १६ एप्रिल) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांचे तिकीट यावेळी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी कापले. त्यामुळे नाराज नेते पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही या दबावाला बळी न पडण्याचा निर्धार दिल्लीश्वरांनी केला. कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभेचे मतदान होणार आहे. हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार असलेल्या शेट्टर यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आज सकाळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. दोन दिवसांपूर्वीच भाजपाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
हे वाचा >> विश्लेषण: बंडाळी रोखण्यावरच कर्नाटकात सत्तेचे गणित अवलंबून?
कोण आहेत जगदीश शेट्टर?
कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यामध्ये बदामी तालुक्यातील केरुर या गावी १९५५ रोजी जन्मलेल्या शेट्टर यांनी २०१२ ते २०१३ पर्यंत कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. सहा वेळा आमदार असलेले शेट्टर लिंगायत समाजातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१८ या काळात शेट्टर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले. तसेच २००८-०९ या काळात विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले. बीएस येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शेट्टर यांनी विविध मंत्रिपदे भोगली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक-राजकीय कार्याला सुरूवात केली होती.
१९९४ रोजी ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी हुबळी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांना १६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर सलग दोन वेळा याच मतदारसंघातून त्यांनी विजय प्राप्त केला. १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत त्यांना अनुक्रमे २५ हजार आणि २६ हजारांचे मताधिक्य मिळाले. २००८ साली त्यांनी हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सुरुवात केली. शेट्टर यांनी महसूल मंत्री, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे.
हे ही वाचा >> कर्नाटकातील भाजपमध्ये बंडाचे वारे; शहा-नड्डा यांच्यात प्रदीर्घ चर्चा, दबावापुढे न झुकण्याचे पक्षनेतृत्वाचे संकेत
विधी पदवीधर असलेले शेट्टर यांनी २० वर्ष वकिली केली. कोणत्याही परिस्थितीत यावेळी विधानसभा निवडणूक लढविणारच, अशी घोषणा काही दिवसांपूर्वीच त्यांनी केली होती. उमेदवारी न दिल्यास त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला होता. जर त्यांना हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही, तर भाजपाला निवडणुकीत २० ते २५ जागांचे नुकसान होईल, असे विधान त्यांनी केले होते.
शेट्टर यांनी ११ एप्रिल रोजी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “माझे तिकीट कापल्यामुळे मी नाराज आहे. मी पक्ष उभा करण्यासाठी माझ्या आयुष्यातील ३० हून अधिक वर्ष दिली. जर पक्षाने मला दोन ते तीन महिन्याअगोदर कल्पना दिली असती तर मी हा निर्णय स्वीकारला असता. पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना मला निवडणूक न लढविण्यास सांगितले जात आहे. पण मी माझ्या मतदारसंघात अगोदरच प्रचाराला सुरुवात केली आहे.”
आणखी वाचा >> कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
शेट्टर हे लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेतच, त्याशिवाय ते बीएस येडियुरप्पा यांचे निकवर्तीय समजले जातात. शेट्टर यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास हुबळी प्रातांत भाजपासमोर कडवे आव्हान निर्माण होऊ शकते. जसे प्रल्हाद जोशी आणि विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दरम्यान निर्माण झाले आहे.
दरम्यान शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांनी म्हटले की, जर शेट्टर काँग्रेस पक्षात प्रवेश करत असतील तर त्यांचे स्वागत केले जाईल. यासाठी त्यांनी शेट्टर यांना प्रामाणिक मुख्यमंत्री अशी उपाधीही देऊन टाकली. त्यांच्या काळात कर्नाटकात एकही भ्रष्टाचार झाला नाही, असेही हरिप्रसाद यावेळी म्हणाले.