बाबरी मशिदीत २२-२३ डिसेंबर १९४९ मध्ये रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यानंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही मूर्ती हटवण्याचा आदेश दिला होता. फैजाबाद जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी कदमकालाथिल करुणाकरन नायर (के. के. नायर) यांनी या निर्णयाला थेट विरोध केला होता. आदेशाचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुढे निलंबनाच्या आदेशाविरोधात त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. विशेष म्हणजे त्यांनी ही न्यायालयीन लढाई जिंकलीदेखील होती. मात्र, त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत पुढे राजकारणात प्रवेश केला होता. ते मूळचे केरळचे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९४८ साली फैजाबादचे जिल्हा दंडाधिकारी

राम जन्मभूमीच्या आंदोलनातील कार्यकर्ते के. के. नायर यांचा फार आदर करतात. नायर यांनीच राम जन्मभूमी आंदोलनाच्या चळवळीला सुरुवात केली, असे या कार्यकर्त्यांकडून म्हटले जाते. ते केरळच्या अलाप्पुझा येथील कुट्टानद येथील रहिवासी आहेत. जून १९४८ मध्ये त्यांची फैजाबादचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी बाबरी मशिदीत रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली होती. ही घटना घडली तेव्हा गोविंद वल्लभ पंत हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पंत, तसेच पंडित नेहरू यांनी या घटनेनंतर नायर यांना रामलल्लाची मूर्ती हटवण्याचा आदेश दिला होता. मात्र, आयसीएस अधिकारी के. के. नायर यांनी या निर्णयाचे पालन करण्यास नकार दिला होता.

निलंबनानंतर कायद्याचे शिक्षण

आदेशाचे पालन न केल्यामुळे नायर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली. पुढे त्यांनी हा खटलाही जिंकला. मात्र, पुन्हा ते आपल्य नोकरीवर रुजू झाले नाहीत. त्यांनी आपल्या जिल्हा दंडाधिकारीपदाचा राजीनामा दिला. निलंबित झाल्यानंतर दरम्यानच्या काळात त्यांनी कायद्याची पदवी मिळवली.

नायर १९६७ साली खासदार

नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर नायर यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी जनसंघाचे उमेदवार म्हणून बहराईच या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. विशेष म्हणजे ही निवडणूक जिंकून ते १९६७ साली खासदार झाले. त्याआधी त्यांच्या पत्नी शकुंतला यादेखील राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी १९५२ साली केसरगंज मतदारसंघातून जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पुढे त्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा सदस्यही झाल्या. शकुंतला या उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.

“अयोध्येच्या लोकांसाठी नायर अजूनही साहेबच”

के. के. पद्मनाभ पिल्लई हे नायर यांचे पुतणे आहेत. त्यांनी नायर यांच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. “अयोध्येच्या लोकांसाठी अजूनही ते नायर साहेबच आहेत. माझा मुलगा सुनील पिल्लई हा राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहे,” असे पद्मनाभ पिल्लई यांनी सांगितले.

म्हणून बदलले शिक्षकांनी आडनाव

नायर यांच्या वडिलांचे नाव कंदमकलाथिल शंकर पाणीकर; तर आईचे नाव पार्वती अम्मा, असे होते. या दाम्पत्याला चार मुले आणि दोन मुली होत्या. “माझे वडील राघवन पिल्लई हे नायर यांना शाळेत घेऊन जायचे. नायर यांचे खरे नाव करुणाकरन पिल्लई, असे होते. मात्र, शाळेत अशाच नावाचा आणखी एक विद्यार्थी होता. त्यामुळे शिक्षकांनी त्यांचे नाव करुणाकरन नायर असे केले. तेव्हापासून करुणाकरन हे पिल्लईपासून नायर झाले. आमच्या घरात सर्वांचे आडनाव हे पिल्लई आहे; फक्त करुणाकरन यांचे आडनाव नायर असे आहे,” असे पिल्लई यांनी सांगितले.

१९४६ साली दुसरे लग्न

नायर जेव्हा फैजाबादचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून रुजू झाले, तेव्हा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात मोठे चढ-उतार आले. त्यांच्या पत्नी सरसम्मा या मूळच्या तिरुवनंतपुरमच्या रहिवासी होत्या. त्यांना त्यांच्या वडिलांना सोडून अन्य दुसऱ्या शहरात किंवा प्रांतात जायचे नव्हते. नायर आणि सरसम्मा यांना सुधाकरन नावाचा एक मुलगा होता; मात्र पुढे या मुलाचा मृत्यू झाला. पुढे नायर आणि सरसम्मा विभक्त झाले. नायर यांनी शकुंतला यांच्याशी १९४६ साली दुसरे लग्न केले. शकुंतला या क्षत्रिय कुटुंबातील होत्या. त्यांना मार्तंड विक्रमन नायर नावाचा मुलगा झाला. मार्तंड पुढे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले.

“नायर कडवे हिंदू नव्हते; पण…”

पिल्लई यांनी नायर यांच्याविषयी आणखी काही माहिती दिली आहे. “नायर हे कडवे हिंदू नव्हते; मात्र न्यायासाठी उभे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. नायर यांना रक्तपात नको होता. रामलल्लाची मूर्ती हटवल्यास हिंदू संन्याशाची हत्या केली जाण्याची शक्यता होती. नायर यांना ते नको होते. संन्याशाच्या हत्येची किंमत मोजून मला माझी नोकरी नको आहे, अशी त्यांची भूमिका होती,” असे पिल्लई यांनी सांगितले.

नायर यांच्या पत्नी तीन वेळा खासदार

नायर यांनी पुढे अलाहाबाद न्यायालयात वकिलीचा व्यवसाय सुरू केला. तसेच ते जनसंघात सक्रिय झाले. १९६२ साली ते लोकसभेचे सदस्य झाले. त्यांच्या पत्नी शकुंतला या १९५२, १९६७, १९७१ अशा तीन वेळा लोकसभेच्या सदस्य होत्या.

१९७६ साली केरळला शेवटची भेट

नायर आणि शकुंतला हे १९६७ साली जनसंघाच्या परिषदेत कोझिकोड येथे आले होते. नायर यांनी १९७६ साली केरळला शेवटची भेट दिली होती. त्यावेळी ते आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी केरळला गेले होते. अलाप्पुझामध्ये नायर कुटंबाने के. के. नायर यांच्या नावाने एक संस्था सुरू केली आहे. विश्व हिंदू परिषदेने या संस्थेला मदत करण्याची तयारी दाखवली आहे.