दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या तथा माजी मुख्यमंत्री केसीआर राव यांची मुलगी के. कविता यांना शुक्रवारी ईडीने अटक केली आहे. के कविता या आम आदमी पक्षाला १०० कोटींची कथित लाच देणाऱ्या ‘साऊथ ग्रुप’शी संबंधित असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.
महत्त्वाचे म्हणजे के. कविता यांच्यावरील आरोप तेलंगणातील विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळातही याविषयी विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, के. कविता यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. गेल्या वर्षी तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली होती. त्यावेळी बोलताना, या संपूर्ण प्रकरणात त्यांची कोणतीही भूमिका नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, के. कविता नेमक्या कोण आहेत? आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा – ही तर खंडणी वसुलीच! निवडणूक रोखे प्रकरणावरून राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले…
के. कविता यांची राजकीय कारकीर्द
के. कविता (वय ४६) यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच यावेळी बीआरएसच्या महिला आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले होते. त्यापूर्वी त्या अमेरिकेते शिक्षण घेत होत्या. २००६ साली त्यांनी तेलंगणा जागृती या उपक्रमाला सुरुवात केली. तेलंगणाची संस्कृती, परंपरा व सणांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागचा हेतू होता.
२०१४ मध्ये तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. या वर्षी त्यांनी निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे खासदार मधू गौड यास्की यांचा १.६७ लाख मतांनी पराभव केला. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार धर्मपुरी अरविंद यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये त्या विधान परिषदेवर निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.
दरम्यान, कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी १ डिसेंबर २०२२ रोजी सीबीआयने के. कविता यांची त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी चौकशी केली. ही चौकशी जवळपास सात तास चालली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सीबीआयने भारतीय दंड संहितेच्या कलम १६० अंतर्गत त्यांना नोटीस बजावली. त्यांना ६ डिसेंबर रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले.
ईडीच्या म्हणण्यानुसार, के. कविता या आम आदमी पक्षाला १०० कोटींची कथित लाच देणाऱ्या ‘साऊथ ग्रुप’शी संबंधित आहेत. दिल्लीतील अबकारी धोरण बदलून आपल्याला फायदा मिळेल, असे धोरण आखण्यासंबंधी ही लाच देण्यात आली होती, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. ईडीने कथित मद्यविक्री घोटाळ्यासंदर्भात दोन आरोपपत्रेही दाखल केली आहेत. या आरोपपत्रांत साऊथ ग्रुपने दिल्लीमधील घाऊक आणि किरकोळ मद्यविक्री क्षेत्रात प्रवेश करता यावा म्हणून लाच दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
ईडीच्या तक्रारीनुसार आम आदमी पार्टीचे कम्युनिकेशन इन्चार्ज विजय नायर यांना दक्षिण ग्रुपने १०० कोटी रुपये दिले होते. विजय नायर यांनी ‘आप’चे प्रतिनिधित्व केले होते. या गटामध्ये आंध्र प्रदेशमधील ओंगले येथील खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कलवकुंतला कविता (के. कविता) अशा दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. तसेच या ग्रुपमध्ये मागुंता रेड्डी यांचे पुत्र राघव रेड्डी, अरबिंदो फार्मा कंपनीचे संस्थापक पी. व्ही. रामप्रसाद रेड्डी यांचे पुत्र पी. सारनाथचंद्र रेड्डी यांचाही यामध्ये समावेश आहे.