तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या नेहमीच चर्चेत असतात. कधी त्या स्वतःच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात; तर कधी त्यांच्या संसदेतील तडाखेबंद भाषणामुळे. यावेळी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यासह झालेल्या वादविवादामुळे त्या पुन्हा चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निशिकांत दुबे यांनी एका खासदाराच्या विरोधात अपशब्द वापरल्यामुळे दुबे यांच्यावर विशेषाधिकार समितीकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. दुबे यांनी आता महुआ मोईत्रा यांच्यावरही आरोप केले आहेत. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोईत्रा लाच घेतात, असा आरोप करीत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून चौकशी करण्याची विनंती केली आहे.

दुबे यांच्या पत्रानंतर मोईत्रा यांनीही पलटवार केला आणि दुबे यांच्या विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची चौकशी करावी, अशी विनंती लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना केली. या वर्षीच्या सुरुवातीला, दुबे यांच्या एमबीए आणि पीएचडीच्या पदव्या बोगस असल्याचा आरोप करून, मोईत्रा यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. दुबे यांच्याशी शाब्दिक चकमक उडण्याखेरीज मोईत्रा इतरही विषयांवर बेधडक मते व्यक्त करीत असतात. तसेच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यापासून अंतर राखून राहणाऱ्या मोईत्रा म्हणूनच स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या नेत्या ठरतात.

Maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभेचे ७० लाख वाढीव मतदान
manoj jarange patil latest marathi news
जरांगे प्रभाव की ‘लाडकी बहीण’? मराठवाड्यात निकालाची उत्सुकता
Maharashtra vidhan sabha election 2024
तावडे यांची राहुल गांधी, खरगेंना नोटीस; २४ तासांत आरोप मागे घ्या, अन्यथा १०० कोटींचा बदनामीचा दावा
pune vidhan sabha vote counting
मतमोजणीस विलंबाची शक्यता? लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत टपाली मतदानात दुपटीने वाढ
congress sachin pilot mahavikas aghadi
‘मविआ’च्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एका दिवसात जाहीर करणार, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांची माहिती
administration ready for vote counting postal ballots to be counted first
मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुंबईत १० ठिकाणी केंद्रे; सुरुवातीला टपाल मतांची मोजणी
no alt text set
नांदेडमध्ये ‘विक्रमादित्य’ कोण, उत्कंठा शिगेला!
Wardha District, Pankaj Bhoyar, Sameer Kunawar,
हॅटट्रिक, हॅटट्रिक आणि डबल हॅटट्रिक की…
Amravati district, voter turnout in Amravati district,
अमरावती जिल्‍ह्यात वाढलेल्‍या मतदानावर दावे-प्रतिदावे

हे वाचा >> “महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे-भेटवस्तू घेतल्या”, भाजपा खासदाराचा आरोप

पहिल्याच भाषणात भाजपावर हल्लाबोल

महुआ मोईत्रा यांनी खासदारकीच्या पहिल्याच टर्मच्या भाषणात फॅसिझमच्या सुरुवातीच्या सात लक्षणांवर भाषण करून संसदेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सत्ताधारी बाकावरून त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही त्या थांबता, न डगमगता आपले म्हणणे मांडत राहिल्या. जवळपास १० मिनिटे त्यांनी भाषण केले. यावेळी विरोधक आणि तृणमूल पक्षातील खासदारांनी बाके वाजवून त्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून विरोधकांमधील मुलुखमैदान तोफ म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. संसदेत सरकारवर तुटून पडण्यासह संसदेच्या बाहेरही त्या सरकारशी दोन हात करतात. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा आणि राष्ट्रद्रोह कायद्याच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत.

काली डॉक्युमेंट्रीमुळे वादाच्या भोवऱ्यात

२०२२ च्या मध्यात कॅनेडियन सिनेनिर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या काली या डॉक्युमेंट्रीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये महुआ मोईत्रा यांनी वादग्रस्त भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर एफआयआर आणि अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. फक्त भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनाच नाही, तर तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांनीही मोईत्रा यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

मोईत्रा यांचे राजकारणात येणे, हळूहळू एक फायरब्रँड नेत्या म्हणून घडणे, या दोन्ही गोष्टी त्यांना जवळून पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करतात. आसाममध्ये चहाचे पीक घेणाऱ्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्याच्या माउंट होल्योक कॉलेजमध्ये गणित व अर्थशास्त्रात पदवी संपादन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क व लंडन येथे बँकर म्हणून गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या केल्या.

हे वाचा >> ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरण काय? तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर काय आरोप आहेत? जाणून घ्या…

काँग्रेसपासून राजकारणाला सुरुवात

जुलै २०१९ मध्ये एका शाळेत भाषण देताना मोईत्रा म्हणाल्या की, २००८ साली त्यांच्या महाविद्यालयाच्या १० व्या स्नेहसंमेलनाच्या वेळी त्यांनी सार्वजनिक जीवनात उतरण्याचा निर्णय घेतला. “माझ्यासमोर दोन पर्याय होते. एक तर २० व्या स्नेहसंमेलनाच्या वेळेस जेपी मॉर्गन या जगविख्यात वित्तीय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून परत भारतात यायचे की आताच सार्वजनिक जीवनात उतरून काहीतरी बदल घडवून दाखवायचा”, अशी भावना त्यांनी शाळेत बोलून दाखवली.

मोईत्रा यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याकडे त्यांचा कल होता. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या बूथ स्तरावरील आम आदमी की सिपाही या कार्यक्रमाचे नेतृत्व मोईत्रा यांनी केले होते. २०१० साली पश्चिम बंगालमधील सत्ताधारी डाव्यांना बाजूला करून, तृणमूल काँग्रेस सत्तेत येण्याच्या वर्षभरापूर्वी मोईत्रा यांनी काँग्रेसमधून तृणमूलमध्ये प्रवेश केला. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या करीमपूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून तीन वर्षांच्या कारकिर्दीनंतर २०१९ साली त्यांनी क्रिष्णानगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. त्यानंतर त्यांची नदिया जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावरून पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा मोईत्रा यांच्यावर विश्वास असल्याचे दिसले आणि संसदेत तडाखेबाज भाषणे करून मोईत्रा यांनी तो विश्वास सार्थही करून दाखविला.

संसदेत जरी आपल्या भाषणांमुळे मोईत्रा चर्चेत राहिल्या तरी पक्षसंघटनेत नेत्या म्हणून त्या फारशा चमक दाखवू शकल्या नाहीत. नदिया जिल्हा हा क्रिष्णानगर लोकसभेचाच एक भाग आहे. मोईत्रा या जिल्ह्यातील जुन्या नेत्यांचा वारंवार अपमान करतात, अशा तक्रारी त्यांच्याविरोधात येऊ लागल्या. त्यानंतर मोईत्रा यांना जिल्हाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले. डिसेंबर २०२१ साली नदिया जिल्ह्यातील प्रशासकीय बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मोईत्रा यांना जाहीरपणे खडे बोल सुनावले.

मी एक इंचही मागे हटणार नाही

कालीमातेच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मोईत्रा यांनी त्यांच्या वक्तव्यावर त्या ठाम असल्याचे म्हटले. “कालीमातेला तिचे भक्त कसे पूजतात आणि माझ्यासाठी तिचे महत्त्व काय आहे, याबद्दल मी माझे मत व्यक्त केले होते. धर्म हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि हीच वेळ आहे की, आपण आपल्या श्रद्धा आणि प्रथांबद्दल बोलले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी मागे दिली होती. त्या पुढे म्हणाल्या, “भाजपा त्यांचे हिंदुत्व आपल्यावर लादत आहे. हिंदुत्व ही त्यांची जहागिरी नाही आणि या वादात मी एक इंचही मागे हटणार नाही”, अशी ठाम भूमिका मोईत्रा यांनी मांडली होती.

हे वाचा >> Mahua Moitra : महुआ मोईत्रा कोण आहेत?

मोईत्रा यांच्या संसदेतील भाषणांची चर्चा होत असली तरी असेही काही लोक आहेत; जे मोईत्रा यांच्या सभागृहातील वर्तनाला अपरिपक्व आणि आवेगपूर्ण असल्याचे म्हणतात. एकदा अधिवेशनात भाषण करताना त्यांना ठरवून दिलेली वेळ संपल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचे भाषण थांबवून, पुढच्या सदस्याला बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मोईत्रा यांचे नियंत्रण सुटले आणि त्यांनी सभागृहातच आरडाओरडा केला. एवढेच नाही, तर ट्विटरवर लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्याविरोधात नाराजीही व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी सभागृहाने त्यांच्या या वर्तनाचा निषेध नोंदविला.

राज्यसभेतील एका खासदाराने सांगितले की, त्यांचा चंचल स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणामुळे प्रत्येक जण मोईत्रा यांच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करतो. महुआ मोईत्रा मात्र त्यांच्याबद्दलच्या इतरांच्या मतांना फारसे महत्त्व देत नाहीत. त्यांच्याकडे असलेले गुण जर एखाद्या पुरुष नेत्यामध्ये असते, तर तो मोठा नेता म्हणून नावाजला गेला असता आणि मी महिला असल्यामुळे मला बोल लावले जात आहेत. आता मी याबद्दल फारसा विचार न करता इतरांबरोबर भांडण्यापेक्षा मला जे बोल लावले जातात, त्याच्यातच आनंद घेते, अशी प्रतिक्रिया मोईत्रा यांनी मध्यंतरी दिली.