Mohan Singh Bisht: दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते मोहन सिंह बिश्ट यांचा मतदारसंघ बदलून त्यांना मुस्लिमबहुल अशा मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघात उभे केले होते. याठिकाणी त्यांनी मोठा विजय मिळविला आहे. बिश्ट हे करवाल नगर विधानसभेचे विद्यमान आमदार होते. पण त्यांना मुस्तफाबाद येथून तिकीट देण्यात आले. तसेच त्यांच्या जागी करवाल नगरमध्ये कपिल मिश्रा यांना उमेदवारी दिली गेली. बिश्ट यांनी मुस्तफाबादमधून ४० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुस्तफाबादमध्ये ३९.५ टक्के मुस्लीम मतदारांची संख्या आहे. आम आदमी पक्षाचे नगरसेवक आणि २०२० सालच्या दंगलीतील आरोपी ताहीर हुसैन यांना एमआयएम पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला होता. ‘आप’ने अदील अहमद खान यांना उमेदवारी दिली होती. मुस्तफाबाद हा ईशान्य दिल्लीतील मतदारसंघ असून २०२० साली याठिकाणी उसळलेल्या दंगलीत ५३ लोकांचा मृत्यू झाला होता.

मोहन सिंह बिष्ट कोण आहेत?

मोहन सिंह बिष्ट हे भाजपाचे मोठे नेते आहेत. १९९८ साली करवाल नगरमधून त्यांचा पहिल्यांदा विजय झाला होता. २०१५ सालापर्यंत त्यांनी हा मतदारसंघ राखला. २०१५ साली ते मिश्रा यांच्याकडून पराभूत झाले. त्यानतंर २०२० साली बिष्ट यांनी पुन्हा एकदा करवाल नगरमध्ये विजय मिळविला. आम आदमी पक्षाच्या दुर्गेश पाठक यांचा त्यांनी पराभव केला होता.

२०२५ च्या निवडणुकीपूर्वी मोहन सिंह बिष्ट यांचे करवाल नगरमधून तिकीट कापण्यात आले होते. तेव्हा बिष्ट यांनी भाजपाची ही सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते. भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेतही मुस्तफाबादमध्ये मिश्रा यांच्या नावाला पसंती देण्यात आली होती. बिष्ट यांच्या नाराजीनंतर भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांची समजूत काढत, या मतदारसंघात पहाडी मतदारांची जास्त लोकसंख्या असल्याचे सांगितले.

मोहन सिंह बिष्ट द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, मी १९९८ ते २००८ या काळात करवाल नगरमधून आमदार म्हणून निवडून आलो. यावेळी मुस्तफाबाद मतदारसंघाची स्थापना झाली. मी प्रचारासाठी फिरत असताना लोक माझ्या समर्थनार्थ रस्त्या-रस्त्यावर उतरत होते. मुस्तफाबादमध्ये भाजपाचा विजयी होणारा मी पहिला उमेदवार असेल.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, बिष्ट हे जनतेसाठी कायम उपलब्ध असलेले नेते आहेत. स्थानिक प्रश्नांना सोडविण्याची त्यांची हातोटी, त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि विकासाची त्यांची दृष्टी निश्चितच त्यांना लाभदायक ठरेल.