Delhi MCD Mayor Election Politics : दिल्ली महापालिकेच्या महापौरपदासाठी २५ एप्रिल रोजी निवडणूक पार पडणार आहे. मात्र, आम आदमी पक्षाने दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाची ही निवडणूक न लढण्याचा निर्णय आहे. महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी म्हणजेच २१ एप्रिल रोजी ‘आप’ने पत्रकार परिषद घेत आम्ही महापौरपदासाठी उमेदवार देणार नसल्याचं जाहीर करत निवडणुकीतून माघार घेतली. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार जाहीर केले. सरदार राजा इकबाल सिंह यांना भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या महापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
एमसीडीच्या निवडणुकीपासून आम आदमी पक्ष दूर राहणार असल्याचं म्हटलं आहे. कारण भाजपा नगरसेवकांच्या फोडाफोडीचं अर्थात घोडेबाजाराचं राजकारण करत असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. भाजपामध्ये राजा इकबाल सिंह हे यापूर्वी अकाली दलाशी संबंधित आहेत. त्यांचे सासरे पूर्वी जीटीबी नगर मतदारसंघाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करत होते. तसेच त्यांचे मेहुणे अकाली दलात सक्रियपणे सहभागी आहेत.
सरदार राजा इकबाल सिंह कोण आहेत?
दरम्यान, सप्टेंबर २०२० पर्यंत ते जीटीबी नगर येथील अकाली दलाचे नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्स झोनचे अध्यक्ष देखील होते. पण अकाली दलाने शेती कायद्यांवरून एनडीएला दिलेला पाठिंबा काढून घेतला, तेव्हा पक्षाच्या दिल्ली नेतृत्वाने राजा इकबाल सिंह यांना सिव्हिल लाइन्स पदाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर इकबाल सिंह हे भाजपात सहभागी झाले होते. तेव्हा भाजपाने त्यांना उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदी बढती दिली होती. दरम्यान, तेव्हा भाजपाच्या एका नेत्यानं म्हटलं होतं की, “आता दिल्लीतील अकाली राजकारण संपलं आहे आणि त्यांचे बहुतेक नेते भाजपामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे सिंह यांना माहित आहे की त्यांचं भविष्य भाजपामध्ये अधिक सुरक्षित आहे.”
राजा इकबाल सिंह यांनी उत्तर दिल्लीचे महापौर म्हणून त्यांनी केलेल्या पहिल्या कामांपैकी एक म्हणजे जहांगीरपुरीमधील वादग्रस्त विषयासंदर्भात कारवाईची मोहीम.१६ एप्रिल २०२० रोजी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल उसळली होती, त्या हिंसाचाराच्या संदर्भात २० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी पाच आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा, १९८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन दिवसांनंतर भाजपाने उत्तर दिल्ली महानगरपालिकेला (एनडीएमसी) दंगलखोरांच्या बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरांबद्दल पत्र लिहिलं होतं.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा इकबाल सिंह यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीएमसी’ने जहांगीरपुरीमधील अनेक बांधकामे पाडली, त्यापैकी बरीच बांधकामे मुस्लिमांच्या मालकीची होती. राजा इकबाल सिंह हे कमी बोलणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. जहांगीरपुरी येथील पाडकाम मोहिमेदरम्यान हे स्पष्टपणे दिसून आलं. दंगलखोरांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या इतर भाजपा नेत्यांप्रमाणे राजा इकबाल सिंह यांनी कोणतंही विधान केलं नाही. आदल्या रात्री तोडफोडीचा निर्णय घेतल्यानंतरच त्यांची विधाने माध्यमांमध्ये आली.
२० एप्रिल रोजी तोडफोडी कारवाईच्या दिवशी सकाळी ते घटनास्थळी होते आणि नंतर त्यांनी माध्यमांशी दीर्घकाळ बोलून मोहिमेला पाठिंबा दिला. “ही अतिक्रमणाविरोधी मोहीम आहे. ती धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नये. ही तात्पुरत्या स्वरूपाच्या अतिक्रमणाविरुद्धची मोहीम आहे आणि आम्हाला आरडब्ल्यूए आणि स्थानिकांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत,” असे ते म्हणाले होते. दरम्यान, आता गेल्या काही महिन्यात ‘आप’मधून अनेक पक्षांतर झाल्यामुळे सध्या एमसीडीमध्ये भाजपाचे सध्याचे संख्याबळ ११९ आहे. एमसीडीमध्ये नामांकित खासदार आणि आमदार दोघेही आगामी निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत. त्यातच या निवडणुकीतून आम आदमी पक्षाने माघार घेतल्यामुळे भाजपाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.