नितीश कुमार यांनी भाजपाशी युती करत नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याआधी राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) त्यांची युती होती. दरम्यान, एनडीएप्रणित सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री तर भाजपाचे नेते सम्राट चौधरी, विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री असतील. यातील सम्राट चौधरी यांची सध्या विशेष चर्चा होत आहे. ते नितीश कुमार यांचे कट्टर विरोधक होते. मात्र आता चौधरी आणि नितीश कुमार हे दोन्ही नेते सत्तेत सहभागी झाले असून एकत्र बिहारचा राज्यकारभार हाकणार आहेत.
सम्राट चौधरी हे नितीश कुमारांचे टीकाकार
गेल्या वर्षाच्या मे महिन्यात चौधरी यांची बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नितीश कुमार यांना विरोध करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांमध्ये चौधरी यांचेही नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विरोधात असताना ते प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवून नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका करायचे.
हेही वाचा >>> बिहार : सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यामागे भाजपाची रणनीती काय? वाचा…
भाजपाने दिले प्रदेशाध्यक्षपद
चौधरी यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यास बिहारमध्ये भाजपाचा विस्तार होईल, अशी दिल्लीच्या नेतृत्वाला अपेक्षा होती. बिहारमधील ओबीसी प्रवर्गात मोडणारा कुर्मी-कोएरी हा समाज नितीश कुमार यांची हक्काची व्होटबँक आहे. चौधरी यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यावर हाच मतदार भाजपाकडे येईल आणि आणि नितीश कुमार यांना रोखता येईल, असेदेखील भाजपाला वाटत होते. गेल्या काही महिन्यांत यामध्ये भाजपाला काही प्रमाणात यश आले, असे म्हणता येईल. कारण उपेंद्र कुशवाह या बिहारच्या बड्या नेत्याने जदयूपासून दूर होत स्वत:च्या राष्ट्रीय लोक जनता दल (आरएजेडी) या नव्या पक्षाची स्थापना केली. तसेच २०२४ सालची लोकसभा आणि २०२५ सालच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला पाठिंबा देऊ असे कुशवाह यांनी जाहीर केले होते. बिहारमध्ये कुशवाह समाजाची लोकसंख्या ६ टक्के आहे. सम्राट चौधरी हे माजी आमदार शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत.
हेही वाचा >>> नितीश कुमार यांना भाजपाचा पाठिंबा, राज्यपालांकडे पत्र सादर, जाणून घ्या सत्तास्थापनेचं गणित!
राबडी देवींच्या मंत्रिमंडळात चौधरींना मंत्रिपद
चौधरी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात समता पक्षापासून झाली. नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी या पक्षाची स्थापना केली होती. चौधरी यांनी पुढे राजदमध्ये प्रवेश केला. मे १९९९ मध्ये ते राबडी देवी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. राजदच्या तिकिटावर ते २००० साली परबत्ता (खगरिया) या मतदारसंघातून निवडून आले. पुढे त्यांनी २०१४ साली जदयूमध्ये प्रवेश केला. जदयूमध्ये आल्यानंतर त्यांना विधानपरिषदेत आमदारकी देण्यात आली.
२०१७ मध्ये भाजपात प्रवेश
सम्राट चौधरी यांनी २०१७ मध्ये भाजपात प्रवेश केला. या पक्षात चौधरी यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. भाजपा, जदयूची युती असताना तारापूरची जागा भाजपाला देण्यात आली. त्यामुळे २०२० मध्ये चौधरी यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. पुढे २०२२ मध्ये नितीश कुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडत राजदशी हातमिळवणी केली.
हेही वाचा >>> बिहार, पंजाब, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत खदखद? अखिलेश यादव यांची भूमिका काय?
चौधरी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी
भाजपामध्ये गेल्यापासून चौधरी यांचे राजकीय वजन वाढलेले आहे. भाजपाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. बिहारच्या नव्या सरकारमध्ये त्यांना थेट उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलेले आहे. त्यामुळे आगामी काळात सम्राट चौधरी हे नितीश कुमार यांच्याशी कशा प्रकारे जुळवून घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.