सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (आरपीआय) वेगवेगळ्या गटांपैकी पुण्यात थोडीफार ताकद असलेल्या आठवले गटालाही आता गटबाजी आणि पक्षांतर्गत राजकारणाने पोखरले असून, आता पुणे शहर अध्यक्षपद वादात सापडले आहे. नवीन शहराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेवरून वादंग झाल्यामुळे विद्यमान अध्यक्ष आणि नव्याने निवडलेले गेलेले अध्यक्ष असे दोन अध्यक्ष आपणच खरे अध्यक्ष असल्याचे सांगत असल्याने या पक्षाचा शहराचा वाली नक्की कोण, असा प्रश्न उभा राहिला आहे. आता पक्षाचे सर्वेसर्वा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भूमिका निर्णायक ठरणार असली, तरी त्यांनी निर्णय जाहीर करण्यापूर्वीच दोन्ही अध्यक्षांनी शहरात फलकबाजी सुरू केली आहे.

पुण्यात ‘आरपीआय’चा पारंपरिक मतदार असल्याने लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये या पक्षाची मते अनेकदा निकालाला कलाटणी देणारी ठरत आली आहेत. आरपीआयच्या वेगवेगळ्या गटांपैकी आठवले गटाची ताकद आहे. त्यामुळे मागील पुणे महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आरपीआयला उपमहापौरपद देऊन ही मते आपल्याकडे राहतील, याची खबरदारी घेतली होती. आता या पक्षामध्ये दोन गट पडले असून, सध्या या पक्षाला दोन शहराध्यक्ष असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा… उद्घाटनाचे कार्यक्रम आखा, भूमीपूजन उरका! आचारसंहितेपूर्वी डॉ. भागवत कराड यांची कसरत

या पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष शैलेश चव्हाण हे आहेत. त्यांचा कार्यकाल पूर्ण होत असल्याने नवीन अध्यक्षपदासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. पक्षाच्या क्रियाशील सभासदांना मतदानाचा अधिकार देण्याचे पक्षाने ठरविले होते. मात्र, क्रियाशील सभासद करण्याची प्रक्रियाच वादग्रस्त ठरली. मतदार यादीत नाव असल्याचा तहसीलदारांचा दाखला असणाऱ्यांनाच सभासद करण्याचे निश्चित करण्यात आले होतो. मात्र, हा दाखला नसलेल्या काहींना क्रियाशील सभासद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली आहे. चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेला आक्षेप घेतला. मात्र, तरीही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने न राबविल्याने चव्हाण समर्थकांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. अध्यक्षपदासाठी संजय सोनावणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांना नवीन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. ॲड. बी. के, बर्वे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणूक प्रक्रियेच्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरोदे आणि शहरातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा… पारसच्या विस्तारित वीज प्रकल्पाला राजकीय रंग, भूसंपादनानंतर १२ वर्ष दुर्लक्ष; निवडणुकांच्या तोंडावर प्रश्न पुन्हा तापला

या निवडणूक प्रक्रियेचा वृत्तांत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे देऊन त्यांनी सोनावणे यांना शहराध्यक्ष म्हणून नेमणूक पत्र द्यावे आणि पक्षश्रेष्ठींनी योग्य ती पुढील कार्यलाही करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. ही निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर आता शहराध्यक्षपदावरून वाद पेटला आहे. नवीन शहराध्यक्ष म्हणून सोनावणे यांनी फलक लावल्यानंतर चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. आपणच अद्याप शहराध्यक्ष असून, नवीन शहराध्यक्षाची नेमणूक झालेली नसल्याच दावा चव्हाण यांनी केला आहे.

हेही वाचा… पुत्राने निवडणूक लढविलेल्या मावळ मतदारसंघाबाबत अजित पवार गटाचे मौन

नवीन शहराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात आली आहे. २१०० क्रियाशील सभासद आहेत. मात्र, त्यापैकी सुमारे ७०० सभासद हे बोगस आहेत. त्यांच्याकडे मतदार असल्याचा तहसीलदारांचा दाखला नाही. तरीही त्यांना सभासद करून घेण्यात आले आहे. या प्रक्रियेचा निषेध म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे सोनावणे यांचा एकच अर्ज होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांनी सोनावणे यांना नेमणुकीचे पत्र दिले नसल्याने मीच शहराध्यक्ष आहे. काही प्रदेश पातळीवरील पक्षाचे नेते हे प्रदेशाकडे लक्ष देण्याऐवजी अजूनही स्थानिक पातळीवर लक्ष देत आहेत. – शैलेश चव्हाण, विद्यमान शहराध्यक्ष

निवडणूक प्रक्रिया राबवून माझी शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष मीच आहे. निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांनी अध्यक्षपदाची निवड झाल्याचे घोषित केले आहे. नेमणूक पत्र लवकरच मिळेल. याबाबत पक्षाचे नेते आठवले यांची भेट घेणार आहे. – संजय सोनावणे, नवोदित शहराध्यक्ष

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is the president of rpi of pune athawale group print politics news asj
Show comments