विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आढावा घेतल्यास सत्ताधारी पक्षातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर विरोधी बाकांवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांचीच अधिक छाप पडली आहे. अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडून मंत्र्यांची कामगिरी तर विरोधी बाकांवर विरोधी पक्षनेते किंवा अन्य आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मदतीला देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन मुरलेले राजकारणी उपमुख्यमंत्रीपदी होते. विधानसभा व विधान परिषद ही दोन्ही सभागृहे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीच सांभाळली. मुख्यमंत्री शिंदे यांची सभागृहात उपस्थिती कमी असायची. कारण त्यांच्या दालनात एवढी गर्दी असायची की त्यातून बाहेर पडण्यास त्यांना वेळच मिळाला नसावा.
विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या अधिवेशन संपण्यास एक दिवसाचा कालावधी असताना निवड झाली. त्यांना फारच कमी वेळ मिळाला. पण अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते बोलत असताना काँग्रेसचे आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. वास्तविक धोरणात्मक बाबी किंवा विरोधी पक्षाचा महत्त्वाचा प्रस्ताव असतो तेव्हा मुख्यमंत्री अथवा विरोधी पक्षनेते बोलताना आमदारांची उपस्थिती आवश्यक असते. विरोधी बाकावर खऱ्या अर्थाने चमकले ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. सभागृहात बसून सतत जागरुक विरोधी आमदाराची भूमिका त्यांनी बजाविली. झोपडपट्टी पुनर्विकासाशी संबंधित विधेयकातील तांत्रिक चुकीवर त्यांनी बोट ठेवले. शेवटी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चूक मान्य करावी लागली. समृद्धी महामार्गाचे बांधकाम किंवा अन्य महत्त्वाच्या विषयांवर सरकारला ठोस प्रश्न विचारून चव्हाण यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
सत्ताधारी बाकांवर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी किल्ला चांगलाच लढविला. फडणवीस हे संसदीय कामकाजात माहीर आहेत. त्यामुळे सरकारची बाजू त्यांनीच लढविली. अजित पवार हेसुद्धा सरकारच्या वतीने बाजू सांभाळून घेत असत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केवळ उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यावरच भर दिला होता. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी धोरणात्मक बाबी आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका स्पष्ट करायची असते. पण शिंदे यांच्या भाषणात राजकारणालाच अधिक प्राधान्य होते. मंत्र्यांमध्ये उदय सामंत यांची कामगिरी सरस झाली. उद्योगबरोबरच मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास खात्याची उत्तरे देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. सामंत यांनी नगरविकास विभागाशी संबंधित प्रश्नांना चांगल्या पद्धतीने उत्तरे दिली.
हेही वाचा – पावसाळी अधिवेशनाची फलनिष्पती काय?
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शेती, पूरपरिस्थिती, नुकसानभरपाई. आदींवर सरकारवर हल्ला चढविला. अशोक चव्हाण हेसुद्धा सक्रिय होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, नाना पटोले, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर हे विरोधी आमदार आक्रमक असायचे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादान दानवे, अनिल परब, भाई जगताप, सतेज पाटील आदी आमदार विरोधी बाकावर सक्रिय होते.