पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (बुधवार, २० मार्च) तमिळनाडूतील सालेममध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तसेच भाषणादरम्यान त्यांनी भाजपा कार्यकर्ते रमेश यांची आठवणही काढली. यावेळी ते भावूक झाल्याचे बघायला मिळाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रूही होते. रमेश हे भाजपाचे कार्यकर्ते होते. त्यांना ऑडिटर रमेश, असेदेखील म्हटले जाई. २०१३ मध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती.

आपल्या भाषणादरम्यान रमेश यांची आठवण काढत पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे बघायला मिळाले. “आज मी सालेममध्ये आहे. मला ऑडिटर रमेशची आठवण येत आहे. आज सालेमचा माझा रमेश या ठिकाणी नाही. रमेश यांनी पक्षासाठी रात्रंदिवस काम केले. ते आपल्या पक्षाचे समर्पित नेते होते. तसेच ते एक उत्तम वक्ते व अतिशय मेहनती व्यक्ती होते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींचे ‘मिशन दक्षिण’ काय आहे? दक्षिण भारतात विजय मिळवणं भाजपासाठी किती महत्त्वाचं?

ऑडिटर रमेश नेमके कोण होते?

रमेश तमिळनाडू भाजपाचे कार्यकर्ते होते. एक हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची ओळख होते. रमेश यांनी दोन वेळा तमिळनाडू भाजपाचे सरचिटणीस म्हणून कामही केले. १९ जुलै २०१३ रोजी सालेमच्या मारवानेरी भागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन घरी परतताना त्यांची हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली होती.

हत्येचा आरोप कोणावर होता?

रमेश यांची हत्या बिलाल मलिक आणि फकरुद्दीन यांनी केल्याचे तपासात पुढे आले होते. हे दोघे मदुराई येथील पाइप बॉम्बस्फोट प्रकरणातही आरोपी होती. तसेच त्यांच्यावर इतर हिदुत्ववादी नेत्यांची हत्या केल्याचाही आरोप होता. त्यांना ऑक्टोबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. फकरुद्दीनला गुन्हे शाखेच्या सीआयडीने अटक केली होती; तर मलिक व आणखी एका संशयित आरोपी यांना शेजारच्या आंध्र प्रदेशातील पुत्तूर येथून ताब्यात घेण्यात आले होते.

रमेश यांच्या हत्येनंतर नेमके काय घडले?

रमेश यांच्या हत्येनंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात प्रचंड रोष होता. रमेश यांच्या हत्येला पोलिसांचा निष्काळीजपणा जबाबदार असल्याचे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. रमेश यांना हत्येपूर्वी अनेकदा धमक्या देण्यात आल्या होत्या. तसेच हत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्यांची गाडीदेखील जाळण्यात आली होती. रमेश यांची हत्या म्हणजे राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे, अशी टीका भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्याशिवाय तमिळनाडू भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बी. राजेश्वरी यांनी रमेश यांच्या हत्येचा निषेध म्हणून स्वत:ला जाळून घेतले होते.

हेही वाचा – यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवाराची माघार, गुजरातमध्ये काँग्रेसची पंचाईत करणारे रोहन गुप्ता कोण आहेत?

या घटनेचे राजकीय पडसाद कसे उमटले?

रमेश यांच्या हत्येनंतर संपूर्ण तमिळनाडूत भाजपा कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली होती. रमेश यांच्या हत्येच्या काही वर्षांपूर्वीच आरएसएस नेते राजगोपालन यांचीही हत्या करण्यात होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष होता. या घटनेनंतर तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन यांनी जयललिता यांचे सरकार आंधळे झाल्याचा आरोप केला होता. तसेच जयललिता यांचे सरकार हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्यांकडे काणाडोळा करीत असल्याचेही ते म्हणाले होते.

भाजपा नेत्यांच्या म्हणण्यानुसार, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रमेश यांच्या कुटुंबीयांना फोन करून दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर तिरुची येथे झालेल्या एका सभेत बोलताना रमेश यांच्या हत्येचा तपास संथ गतीने सुरू असल्याचे म्हणत असमाधान व्यक्त केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री जयललितादेखील व्यासपीठावर उपस्थित होत्या.

या तपासाची सद्य:स्थिती काय?

दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये विशेष न्यायालयाला लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणातील आरोपी सध्या तुरुंगात आहेत.

Story img Loader